स्त्रीरोगविज्ञान : स्त्रीच्या जननेंद्रियांचा विकास, क्षमता, रचना-त्मक व कार्यात्मक बदल आणि विकार यांचा अभ्यास स्त्रीरोगविज्ञान या विषयात केला जातो. बाह्य जननेंद्रिये, योनिमार्ग, गर्भाशय, अंडवाहिनी व अंडकोश ( बीजांडकोश ) या भागांचा जननेंद्रियात समावेश होतो. विशेषज्ञ वैद्यकीय व्यावसायिकास या अवयवांखेरीज मूत्राशय, मूत्रवाहिनी, मलाशय व गुदद्वार यांचा आणि स्तनांचाही अभ्यास करणे आवश्यक ठरते. पौगंडावस्था ( वयात येणे ), ऋतुचक्राचा प्रारंभ, प्रत्येक ऋतु-चक्रातील निरनिराळ्या अवस्था, गर्भधारणा, प्रसूती व ऋतुनिवृत्ती या प्रसंगी जननेंद्रियात बदल होत असतात. हे बदल व्यवस्थितपणे घडून यावेत आणि त्या काळात स्त्रीला कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने स्त्रीरोगतज्ञ उपचार करतात व सल्ला देतात. [⟶ जनन तंत्र].

नैसर्गिकपणे नियमित आणि फारसा त्रास न होता चालणार्‍या जननें-द्रियांच्या कार्यातील दोष अनेक प्रकारचे असू शकतात. त्यांपैकी ऋतु-चक्रातील दोष, वंध्यत्व आणि प्रसूतीशी संबंधित अडचणी यांचा विचार अनुक्रमे ‘ ऋतुस्राव व ऋतुविकार , ‘ वंध्यत्व ’ आणि ‘ प्रसूतिविज्ञान ’ या मराठी विश्वकोशा तील स्वतंत्र नोंदींमध्ये केलेला आहे. इतर दोषांची संक्षिप्त माहिती येथे दिली आहे. या सर्व दोषांच्या निदानासाठी स्त्रीच्या ऋतुप्राप्तीपासूनची मासिक पाळीची माहिती, प्रसूतीसंबंधीचा इतिहास, जननेंद्रियांची बाहेरून व आतून तपासणी या गोष्टी नित्याच्या असतात. याशिवाय आवश्यकतेनुसार योनिमार्गात घालण्याच्या उपकरणाने अंतर्दर्शन, श्राव्यातीत प्रतिमादर्शन, क्ष-किरण चित्रण, अंतर्दर्शक ( दुर्बिण ) वापरून उदरगुहेचे निरीक्षण, गर्भाशयाचे निरीक्षण, ऊतकाचा नमुना ( गर्भशय्येचा म्हणजेच गर्भाशयाच्या आतील अस्तराचा नमुना ) घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शन, रक्तातील अंतःस्रावाचे मापन यांसारख्या चाचण्या केल्या जातात.

रचनेतील उपजत दोष : भ्रूणात दहाव्या ते बाराव्या आठवड्यांत आढळणार्‍या मुलेरियन वाहिनीद्वयांपासून जननेंद्रियांची निर्मिती होत असते हे दोन कोशिकासमुदाय ( डावा व उजवा ) एकत्र येऊन आणि त्यात पोकळी निर्माण होऊन योनिमार्गाचा वरचा तीनचतुर्थांश भाग, गर्भाशयाची ग्रीवा, गर्भाशय व दोन अंडवाहिन्या अशी खालून वर निर्मिती घडते. या प्रक्रियेतील विलंबामुळे जन्माच्या वेळी काही दोष आढळतात उदा., अल्पविकसित स्थितीमुळे प्रौढ स्त्रीमध्ये सर्व जननेंद्रिये बाल्यावस्थेतील किंवा पौगंडावस्थेतील आकाराचीच राहून गर्भाशय पुढे झुकलेला असणे किंवा मुलेरियन वाहिनीत पोकळी निर्माण न झाल्यामुळे जननमार्ग एखाद्या रज्जूसारखा भरीव असणे किंवा हीच अच्छिद्रतेची स्थिती ( संकोचता ) अंडवाहिनीपुरती मर्यादित राहिल्याने वंध्यत्व असणे. कधीकधी योनि-मुखावरील जाड पडद्याचे आवरण टिकून राहून त्यामुळे तो मार्ग बंद राहतो आणि ऋतुस्रावातील रक्त व इतर ऊतक बाहेर न पडता साचू लागते. योनिमार्ग व गर्भाशय फुगून अस्वस्थता जाणवते.

मुलेरियन वाहिनी एकमेकींशी जोडण्याची क्रिया अपूर्ण राहिल्यास त्यांची स्वतंत्रपणे वाढ होऊ शकते. परिणामतः दोन गर्भाशय निर्माण होतात किंवा एकाच गर्भाशयात उभा पडदा होऊन त्याचे दोन भाग पडतात. असा पडदा पूर्ण किंवा वरच्या भागापुरता मर्यादित असतो. यांपैकी एका गर्भाशयात गर्भधारणा होऊ शकते. जननेंद्रिये पूर्णपणे अविकसित राहण्याची स्थिती क्वचितच उद्भवते. तशी असल्यास त्यासोबत मूत्र-मार्गाचेही दोष आढळतात. योनिमार्गाचा सर्वात खालचा भाग आणि गुदद्वार यांच्या विकासात अडथळा आल्यास कधीकधी मलाशयाची जोडणी योनिमार्गाशी होऊन गुदद्वार मात्र छिद्रहीन राहते.

संपूर्ण अविकसित जननेंद्रियाचा अपवाद सोडल्यास बाकी सर्व उपजत दोष शस्त्रक्रियेने बरे होऊ शकतात.

संक्रामणजन्य विकार : स्त्रीच्या जनन तंत्राची अनेक संक्रामणे लैंगिक संबंधांतून उद्भवलेली असतात. उपदंश ( गरमी ) आणि परमा ( गोनोरिक ) या दोन संक्रामणांचे प्रमाण प्रतिजैविके, आरोग्य-विषयक शिक्षण व कंडोमचा वापर यांमुळे गेल्या ५० वर्षांत खूप कमी झाले आहे. अन्यथा उपदंशामुळे योनिमार्गावर लाल कठीण फोड येणे ( रतिव्रण ), साधारण चार आठवड्यांनी लहानलहान पीटिका दिसणे, मातेपासून नवजात बालकास उपजत विकारामुळे त्याची वाढ खुंटणे इ. समस्या निर्माण होत असत. परमा संक्रामणामुळे ग्रीवा, बार्थोलिन ग्रंथी, मूत्रमार्ग यांचा दाह, विद्रधी, पू निर्माण होऊन मूत्रात तो आढळणे, वंध्यत्व, नवजात अर्भकात डोळ्यांमधील संक्रामण अशा तक्रारी असत. या दोन्ही रोगांची काही वर्षांनी आढळणारी सार्वदेहिक लक्षणेही आता फारशी आढळत नाहीत.

लैंगिक संबंधातून होणार्‍या इतर संक्रामणांमध्ये जघन कणार्बुद, ⇨ लसीका कणार्बुदी वंक्षण रोग व मृदु रतिव्रण या तीन प्रकारांचा समावेश होतो. पहिला प्रकार क्लोबसिएल्ला वर्गातील जंतूंमुळे होतो. जांघेमध्ये मोठी गाठ येऊन तिचे रूपांतर विद्रधीमध्ये होते. दुसर्‍या प्रकारास कोशिकांतर्गत वाढणारे क्लॅमिडीया वर्गाचे लहान जंतू कारणीभूत असतात. बाह्य जननेंद्रियांवर फोड किंवा विद्रधी निर्माण होऊन त्यामुळे जांघेतील अनेक लसीका ग्रंथी — खोलवरच्या तसेच त्वचेखालील – सुजून वेदना-दायक होतात. त्या फुटून व्रणही होण्याची शक्यता असते. आसपासच्या भागात संक्रामण पसरू शकते. तिसर्‍या प्रकारात हीमोफायलस दुक्रेयी सूक्ष्मजंतू मृदू आणि वेदनादायक विद्रधी निर्माण करतात. बाह्य जननेंद्रियावर ते आढळतात. [⟶ गुप्तरोग].

विषाणुजन्य विकारातील एचआयव्ही ( HIV ) विषाणूंमुळे एड्स लैंगिक संबंधातून होत असला तरी त्याची जननेंद्रियात लक्षणे आढळतनाहीत [⟶ रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग ]. इतर लक्षणेही फार उशिरा दिसतात. रक्ताच्या परीक्षणातूनच त्याचे निदान होऊ शकते. परिसर्पचा सामान्य प्रकार लैंगिक संबंधातून जननेंद्रियांवर आक्रमण करण्याची शक्यता असली तरी इतरत्र प्राथमिक संक्रामणही होऊ शकते. चामखीळ निर्माण करणारा विषाणू लैंगिक संबंधातून स्त्रीच्या जनन-मार्गात प्रवेश करू शकतो. या विषाणूच्या संक्रामणानंतर काही काळाने जननेंद्रियावर बारीक फोड निर्माण होऊ शकतात. कधीकधी हे संक्रामण पूर्णपणे लक्षणविरहित असू शकते परंतु त्याचा संबंध नंतर निर्माण होणार्‍या ग्रीवेच्या कर्करोगाशी असू शकतो. यासाठी वयात आलेल्या सर्व स्त्रियांना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम आता काही देशांमध्ये राबविली जात आहे.


लैंगिक संबंधातून न उद्भवता इतर प्रकारे वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावातून निर्माण होणार्‍या संक्रामणांमध्ये ट्रिकोमोनास या एककोशिकीय जीवामुळे आणि कॅण्डिडा ( कवक ) या बुरशीमुळे होणारे विकार बर्‍याच वेळा आढळतात. ट्रिकोमोनास  पुरुषांतही आढळल्यामुळे लैंगिक शक्यता नाकारता येत नाही. जननेंद्रियाची सूज, दाह, विशिष्ट प्रकारचा प्रदर यामुळे त्याचे निदान करणे सोपे असते. स्रावाची सूक्ष्मपरीक्षा केल्यास हे जीव सापडू शकतात. मेट्रोनिडाझोल किंवा तत्सम औषधाच्या एक-दोन मात्रांनी हे संक्रामण बरे होते. कॅण्डिडा हा यीस्टचा एक प्रकार असून त्वचा व पचनमार्गात त्याचे अस्तित्व असते. तेथून जननमार्गात प्रवेश झाल्यास पांढर्‍या रंगाचे चट्टे निर्माण होतात. मधुमेह, प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर, गर्भनिरोधक औषधे, स्टेरॉइडे व प्रतिकारशक्ती कमी करणारी इतर द्रव्ये यांमुळे या कवकाच्या वाढीस संधी मिळते. त्यामुळे सूज, खाज, स्राव इ. लक्षणे निर्माण होतात. रोगग्रस्त भाग कोरडा ठेवून कवकरोधक प्रतिजैविके कीटोकोनाझोल किंवा तत्सम औषधे वापरून व लावून हे संक्रामण बरे होऊ शकते.

या संक्रामणांशिवाय मूत्रमार्गातील व मलाशयातील तसेच त्वचेवरील आणि सार्वदेहिक बरीच संक्रामणे स्त्रीच्या जननेंद्रियात प्रवेश करण्याचा धोका नेहमीच लक्षात घ्यावा लागतो.

अर्बुदे : गर्भाशयात निर्माण होणार्‍या सौम्य अर्बुदांमध्ये मुख्यतः तंत्वार्बुद या नावाने ओळखले जाणारे, परंतु मुख्यतः अरेखित स्नायूंचे बनलेले अर्बुद मोठ्या प्रमाणावर आढळते. सुमारे २ ०% स्त्रियांमध्ये प्रौढ वयात हे अर्बुद ( स्नाय्यार्बुद ) दिसून येते. त्याचा आकार अगदी एखाद्या वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंत आढळलेला आहे. संख्याही एकापेक्षा अधिक असू शकते. अंतःस्तरापाशी किंवा स्नायूंच्या किंवा बाह्य आवरणाच्या समीप आणि ग्रीवा, मुख्यभाग, अंडवाहिनी यांपैकी कोणत्याही ठिकाणी ही स्नायु-अर्बुदे आढळतात. स्थानपरत्वे त्यांच्यामुळे लक्षणे निर्माण होतात किंवा पूर्णपणे लक्षणहीन असू शकतात. ऋतुस्रावाचे प्रमाण वाढणे, मध्येच रक्तस्राव होणे, कंबरेत वेदना होणे, जडपणा जाणवणे, वारंवार लघवी लागणे, वंध्यत्व, पोटात गोळा जाणवणे यांपैकी कोणतीही लक्षणे किंवा प्रसूतीसमयी किंवा गर्भारपणातील गुंतागुंती मोठ्या आकाराच्या अर्बुदां-मुळे होऊ शकतात. मोठ्या अर्बुदांच्या मध्यभागी ऊतकाचा र्‍हास, जंतु- संक्रामण किंवा कॅल्शियमाचे थर बसणे आणि अर्बुदांच्या देठाला पीळ बसणे यासारख्या गुंतागुंतींमुळे शस्त्रक्रिया करून अर्बुद काढून टाकावे लागते. कधीकधी पूर्ण गर्भाशयही काढणे अपरिहार्य ठरते.

गर्भाशयात निर्माण होणार्‍या मारक अर्बुदांपैकी ग्रीवेचा कर्करोग हा जास्त प्रमाणात आढळतो. तरुण किंवा मध्यम वयाच्या स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. नियमितपणे पॅप चाचणी ( जॉर्ज पापानिकोलाऊ यांनी शोधलेली ग्रीवेच्या कोशिकांची सूक्ष्मदर्शकाने करावयाची तपासणी ) केल्यास कोणतीही लक्षणे निर्माण होण्याआधी हा कर्करोग ओळखता येतो. वाढ थोडी मोठी झाल्यावर रक्तस्राव, इतर प्रकारचा स्राव, वेदना आणि अशक्तपणा जाणवू लागतो. उपचार न केल्यास ही वाढ आसपासच्या ऊतकांमध्ये पसरू लागते आणि कंबरेच्या लसीका ग्रंथींमध्येही जाणवते. औषधे, किरणोपचार आणि शस्त्रक्रिया यांच्या मदतीने प्रारंभीच्या अवस्थेत या कर्करोगाचा समूळ नाश करता येतो. विषाणू ( पॅपिलोमा निर्माण करणारे ), उशिरा विवाह, पहिली गर्भधारणा उशिरा, स्त्रीमदजनांचे प्रमाण अधिक असणारी गर्भविरोधके, ऋतुनिवृत्तीच्या लक्षणांसाठी हॉर्मोन प्रतियोजन उपचार इ. अनेक कारणांची संभाव्यता या कर्करोगाच्या बाबतीत वर्तविली जाते.

गर्भाशयाच्या वरच्या भागात आढळणारा अंतःस्तराचा कर्करोग त्यामानाने कमी प्रमाणात आढळतो. रक्तस्राव व अनियमित ऋतुस्राव यांमुळे त्याचे निदानही लवकर होऊ शकते. अंतःस्तरातून तो इतरत्र पसरतो आणि दूरवर त्याची प्रक्षेपित दुय्यम वाढ आढळू शकते. पोटात दुखणे, आवळल्यासारखे अथवा जड वाटणे, उदर पोकळीमध्ये पाणी साठणे यांसारखी लक्षणे गर्भाशयाचा कर्करोग दर्शवितात. पॅप चाचणी कधीकधी निदान करू शकत नाही. त्याऐवजी अंतःस्तराची ऊतकपरीक्षा ( गर्भा-शयाचा अंतर्भाग खरवडून म्हणजेच क्युरेटिंग करून घेतलेला नमुना ) अधिक निर्णायक ठरते. अंडवाहिनीतही हा कर्करोग प्रारंभी असू शकतो. ऋतुनिवृत्तीनंतर या कर्काची शक्यता अधिक असते. शस्त्रक्रिया आणि इतर उपचारांनी (  विशेषतः दुय्यम वाढ नसल्यास ) तो पूर्ण बरा होऊ शकतो.

अंडकोशातील अर्बुदांचे प्रमाण गर्भाशयातील अर्बुदांपेक्षा कमी असते परंतु अंडकोशातील कोशिकांची विविधता लक्षात घेता अशा अर्बुदांचे विविध प्रकार असू शकतात. त्यांतील काही सौम्य असतात, तर काही केवळ द्रवाने भरलेले कोश ( द्रवार्बुद ) असतात. मारक अर्बुदांचे निदान सहजासहजी होत नाही. कारण रक्तस्राव, वेदना, पॅप चाचणी अशा निकषांमध्ये ती सापडू शकत नाहीत. अंडकोशाची वाढ, पोटात संदिग्ध अस्वस्थता ( अपचनाप्रमाणे ), उदरपोकळीत द्रव साठणे असे परिणाम कर्करोगाचा संशय निर्माण करीत नाहीत. कोशिकांचा थेट प्रसार आस-पासच्या इंद्रियांत होतो किंवा रक्तावाटे वा लसीका तंत्रातून शरीरात दूरवर होऊ लागतो. अशक्तपणा जाणवतो व उदरातील द्रव वाढत जातो. शस्त्र-क्रिया करून अंडकोश व आसपासचा बराच भाग काढून टाकावा लागतो. श्राव्यातीत चित्रण किंवा संगणकी छेददर्शनाच्या ( सीटी स्कॅनच्या ) मदतीने लवकर निदान केले असल्यास शस्त्रक्रियेची व्याप्ती मर्यादित ठेवता येते [⟶ वैद्यकीय प्रतिमादर्शन ] आणि किरणोपचार व औषधे यांमुळे संपूर्ण उच्चाटन शक्य होते.

याखेरीज योनिमार्ग व योनिमुख ( भग स्त्रीविटप ) यांमध्येही कर्क-रोगाची वाढ आढळू शकते. अनेकदा ही वाढ प्रक्षेपित किंवा सौम्य असते किंवा संक्रामणजन्य दीर्घकालिक बदलाचे स्वरूप असते.

विस्थापने : प्राकृत अवस्थेत गर्भाशयाची स्थिती कंबरेच्या आतील ( द्रोणीमधील ) विविध बंध आणि स्नायू यांच्या आधारामुळे अबाधित असते. प्रसूतीमुळे किंवा अशक्तपणामुळे स्नायूंना आलेला थकवा लवकरच भरून निघतो, त्यामुळे गर्भाशय सुस्थापित राहते. उतार वयात आणि अनेक प्रसूतीनंतर काही स्त्रियांचे गर्भाशय खाली किंवा एका दिशेने ( पुढे वा मागे ) सरकते, त्याला विस्थापन म्हणतात. खाली सरकणे किंवा अंग बाहेर येणे हा विस्थापनाचा प्रकार अधिक वेळा आढळतो, त्यास स्खलन म्हणतात. उभे राहिले असता किंवा शौचाचे वेळी कुंथल्यावर हे विस्थापन अधिक वाढते. त्याबरोबरच लघवीला किंवा शौचाला अडथळा जाणवणे, वारंवार जावे लागणे, कंबरेत सर्वात खालच्या भागा-मध्ये — माकड हाडाच्यावर — अस्वस्थता वाटणे किंवा कंबर दुखणे अशी लक्षणे जाणवतात.

योनिमार्गाच्या पुढच्या बाजूचा भाग अशक्त झाल्यामुळे गर्भाशय पुढे सरकते, त्याचा दाब मूत्राशयावर किंवा मूत्रवाहिनीवर पडतो. असाच प्रकार मागच्या बाजूस घडल्यास उदरपोकळीत ( डग्लस कोष्ठ ) किंवा मलाशयात गर्भाशयाचा भार पडतो. दाब कोठे जास्त पडतो त्यावर लक्षणे अवलंबून असतात.

विस्थापनाची कारणे पुढीलप्रमाणे अनेक असू शकतात : उदरपोकळी-तील दाब वाढविणारे विकार, प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर व्यायामांचा अभाव, पाठोपाठ विनाविलंब झालेल्या अनेक प्रसूती, ग्रीवा विस्फारण पूर्ण होण्याआधीच चिमटा लावून केलेली प्रसूती, भ्रूणाचा फार मोठा आकार, भगच्छेदन न केल्यामुळे योनिमार्गास व आसपासच्या ऊतकास झालेली इजा इत्यादी. सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण आता वाढल्यामुळे यातील काही कारणे आता कालबाह्य झाली आहेत परंतु त्याचवेळी प्रसूतीनंतर विश्रांतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे योग्य तेवढा व्यायाम घेणेही जमत नाही. निदान लवकर झाल्यास योग्य ते व्यायाम आणि पेसरीसारखी साधने वापरून विस्थापन कमी करता येते. अन्यथा शस्त्रक्रियेने गर्भाशय पूर्वस्थितीत बद्ध करणे किंवा काढून टाकणे असे पर्याय असतात.

विस्थापनाचा आणखी एक प्रकार पश्चनतन किंवा पश्चनमन या स्थितीत आढळतो. गर्भाशय सरकलेला नसतो परंतु ग्रीवा मार्गाचा अक्ष पुढे झुकलेला असण्याऐवजी मागे झुकलेला आढळतो. गर्भाशयाच्या अंगाचा अक्ष पुढे ( प्राकृतावस्थेत ) किंवा मागे झुकलेला असतो. ही स्थिती   उपजत किंवा तरुण वयात आढळते. कष्टार्तव, अपत्यहीनता, गर्भपात किंवा वेदनाजनक समागम यांपैकी काही लक्षणांनी या स्थितीकडे लक्ष जाते. आतून तपासणी करताना वेदना होतात. यावर उपचार म्हणून स्त्रीरोगतज्ञ बोटांनी गर्भाशय ग्रीवा पुढे ढकलून पेसरीने ती स्थिर करतात. या उपचारास यश आले, तर काही दिवसांनी शस्त्रक्रिया करून ही स्थिती कायमची दुरुस्त होऊ शकते. या शस्त्रक्रियेस पुरोनिलंबन असे म्हणतात. गर्भाशयाच्या अंगाचे पश्चनतन आपोआपच बरे होते.

ऋतुनिवृत्तीच्या वेळी निर्माण होणारे शारीरिक व मानसिक बदल आणि त्यापासून स्त्रीला होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने अंतःस्रावी पदार्थांचा वापर करता येतो. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी ( HRT ) या नावाने ओळखल्या जाणार्‍या हॉर्मोन प्रतियोजन या उपचारांचे नियोजन आणि प्रत्येक स्त्रीमधील त्याची समर्थनीयता पडताळून पाहणे हे काम स्त्रीरोगतज्ञाला करावे लागते. दीर्घकाळ उपचार केल्यास त्याचे संभाव्य दुष्परिणाम ( उदा., कर्करोगाची शक्यता ) शक्य तेवढ्या लवकर लक्षात येणे इष्ट ठरते. 

 

पहा : अंडकोश अंडवाहिनी ऋतुनिवृत्ति ऋतुस्राव व ऋतुविकार गर्भधारणा व गर्भबाहुल्य गर्भपात गर्भारपणा गर्भाशय गुप्तरोग जनन तंत्र प्रसूतिविज्ञान योनिमार्ग वंध्यत्व.                  

श्रोत्री, दि. शं.