वायुविश्लेषण : शुद्ध किंवा मिश्र रूपातील वायूचे घटक व गुणधर्म यांचे पृथक्करण, यात अधिशोषण (पृष्ठशोषण), ज्वलन, विद्युत् रासायनिक घट, दर्शक कागद, वर्णलेखन, द्रव्यमान वर्णपटविज्ञान इत्यादींच्या मदतीने घटकांचे मापन करतात तर वायूंचे उष्णतामूल्य, रेणुभार, घनता व श्यानता (दाटपणा) इ. गुणधर्म निश्चित करतात. वायुरूप पदार्थांच्या गुणात्मक आणि परिणामात्मक विश्लेषणासाठी अनेकविध पद्धती प्रचलित असून त्यांचे सामान्यपणे (१) रासायनिक शोषणात्मक व (२) भौतिकीय असे दोन गट पडतात. रासायनिक पद्धतीत विशिष्ट विक्रियाकारकात होणाऱ्या वायूच्या वेचक रासायनिक शोषणामुळे वायुमिश्रणाच्या आकारमान, दाब इ. गुणधर्मांत होणारे बदल मोजतात किंवा रासायनिक विक्रियेमुळे विक्रियाकारकांत होणाऱ्या वजन, घनता, रंग इ. गुणधर्मांतील बदल तपासले जातात व त्यावरून शोषित वायूचे परिमाण काढतात. भौतिकीय पद्धतींत मिश्रणातील घटक वायूंच्या विविध भौतिकीय गुणधर्मांचा उपयोग करतात उदा., घनता, विशिष्ट गुरुत्व, उकळबिंदू, विद्युत संवाहकता, उष्णता संवाहकता, चुंबकीय गुणधर्म, ध्वनितरंगाची वायूमधील गती, विक्रियेची ज्वलनात्मक उष्णता, रेणुभार तसेच जंबुपार (दृश्य वर्णपटाच्या जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य किरण) व अवरक्त (दृश्य वर्णपटाच्या तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य किरण) वर्णपटीय, अधिशोषणात्मक व विकिरणात्मक (कणांची – अणुरेणूंची – उस्फूर्त हालचाल व विखुरले जाण्याचा) गुणधर्म वगैरे भौतिकीय पद्धतींसाठी मुख्यतः उपकरणे लागत असल्यामुळे त्यांना उपकरणात्मक पद्धती असेही संबोधतात. खनिज तेल रसायन उद्योग व इतर रासायनिक उद्योगांत विक्रियेचे नियमन, विक्रियेतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे होणारे हवेचे प्रदूषण, वायुवाहक नळांतील दोष शोधणे यांसाठी तसेच औद्योगिक आणि मूलभूत संशोधनात वायू विश्लेषणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गरजेनुसार याच्या नवनवीन पद्धती विकसित होत असून त्यांकरिता लागणारी विशिष्ट उपकरणे उपलब्ध होत आहेत.

रासायनिक शोषणात्मक पद्धती : या प्रकारच्या पद्धतींमध्ये वायुमिश्रणातील विशिष्ट घटकच वेचकपणे शोषणाऱ्या वेगवेगळ्या रासायनिक विद्रावांचा वापर करतात. घटक वायूंच्या शोषणामुळे वायुमिश्रणाच्या मूळ आकारमानात होणारी घट (मूळ तापमान व दाब कायम ठेवून) किंवा दाबात होणारी घट (मूळ तापमान व आकारमान कायम ठेवून) ही त्या शोषित वायूचे परिमाण दर्शविते. यानुसार आयतनमापन किंवा दाबमापन या तंत्रांवर आधारित असे अनेक वायूंच्या क्रमशः शोषणमापनासाठी वापरावयाचे ऑरसॅट उपकरण प्रयोगशाळांतून फार पूर्वीपासून प्रचलित आहे.

काही सामान्य वायू व त्यांचे शोषक विद्राव असे आहेत : (१) कार्बन डाय-ऑक्साइड व अन्य अम्लधर्मी वायू : सोडियम अथवा पोटॅशियम हायड्रॉक्साइडचा पाण्यातील विद्राव (२) ऑक्सिजन : अल्कधर्मी पायरोगॅलॉल, क्रोमस क्लोराइड (३) कार्बन मोनॉक्साइड : अम्लधर्मी क्युप्रस क्लोराइड (४) असंपृक्त (ज्यांच्यात द्विबंध आहेत, अशी) हायड्रोकार्बने (ओलेफिने) : वाफाळ सल्फ्यूरिक अम्ल अगर ब्रोमिनाचा विद्राव (५) ॲसिटिलीन : पोटॅशिअम आयोडोमर्क्युरेट.

प्रत्येक शोषक विद्राव वायुमिश्रणांतील एकच एक वायू शोषून घेईल असे नाही. उदा., पोटॅशियम हायड्रॉक्साइडामध्ये सल्फर डाय- ऑक्साइडाचे देखील शोषण होते. त्यामुळे वायुमिश्रणात असलेल्या घटक वायूंचे गुणधर्म लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य अशा शोषक विद्रावांची निवड व त्यांच्यामधून वायुमिश्रण फिरवण्याचा क्रम निश्चित करणे आवश्यक असते. मिश्रणाचे संपूर्ण विश्लेषण करावयाचे असेल, तर आधी भागशः ऊर्ध्वपातन (ऊर्ध्वपातनाने निरनिराळे उकळबिंदू असलेल्या घटकांच्या मिश्रणातील घटक अलग करण्याच्या) क्रियेने घटक वायू अलग करून मगच त्यांचे विश्लेषण करतात.

ज्या वायूंचे प्रत्यक्ष शोषण होत नाही त्यांचे ज्वलनाने किंवा अन्य रासायनिक क्रियेने इतर पदार्थांत रूपांतर करून त्या पदार्थांचे शोषण करतात. उदा., हायड्रोजनाचे तप्त (२७० – २८० से.) कॉपर ऑक्साइडावर ज्वलन केल्याने त्यांचे पाण्यात रूपांतर होते. संपृक्त (द्विबंध वा त्रिबंध नसणारी) हायड्रोकार्बने व अन्य कार्बनी पदार्थांचा कॉपर ऑक्साइड व आयर्न ऑक्साइड यांच्या तप्त मिश्रणावरील ज्वलनामुळे हायड्रोजनाचे पाण्याच्या वाफेत व कार्बनाचे कार्बन डाय-ऑक्साइडामध्ये रूपांतर होते. वाफेच्या शोषणामुळे कॅल्शियम क्लोराइडाच्या वजनात होणारी वाढ व कार्बन डाय ऑक्साइडाच्या शोषणामुळे घन पोटॅशियम हायड्रॉक्साइडच्या किंवा बेरियम ऑक्साइडाच्या वजनात होणारी वाढ मोजून त्यावरून अनुक्रमे हायड्रोजनाचे आणि कार्बनाचे प्रमाण निश्चित करतात. कार्बनी पदार्थाच्या विश्लेषणासाठी अजून वापरली जाणारी ही पद्धत ‘लीविग पद्धत’ म्हणून ओळखली जाते. शोषित वायूचे प्रमाण निश्चित करण्याकरिता आयतनमापन व दाबमापन या दोन पद्धतींशिवाय अन्य रासायनिक विश्लेषण तंत्रांचाही वापर जरूरीप्रमाणे करतात. योग्य विक्रियाकारक वापरून अनुमापनाने [एखाद्या विद्रावात एखाद्या द्रव्याची मात्रा किती आहे हे त्या द्रव्याशी विक्रिया करील अशा दुसऱ्या एखाद्या द्रव्याचा विद्राव त्यात हळूहळू घालून ठरविण्याच्या पद्धतीने अनुमापन] शोषित वायूचे प्रमाण काढता येते. उदा., अम्लमापन, आयोडिनमापन. यांशिवाय वर्णमापनासारखी [⟶ वर्ण व वर्णमापन] भौतिकीय तंत्रेही वापरली जातात. विशिष्ट वायूसाठी विशिष्ट विक्रियाकारक शोधून काढणे हे वायू विश्लेषणविषयक संशोधनाचे महत्त्वाचे अंग असून त्या क्षेत्रात सातत्याने प्रयोग होत असतात.

रासायनिक अधिशोषणमापनाची उपकरणे : विश्लेषण करावयाच्या मिश्रणातील घटक पदार्थ व कामाचा प्रकार यांवर अधिशोषणमापनासाठी वापरावयाच्या उपकरणाची निवड अवलंबून असते. वर दिल्याप्रमाणे घटक वायूचे ज्वलन अधिशोषण मापनापूर्वी करावयाचे असते, तेव्हा ज्वलनाकरिता वापरण्यात येणाऱ्या सोसनळ्यांचे (पिपेटचे) काही प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत.

आ. १ (अ) मधील कॉपर ऑक्साइडाने भरलेल्या नलिकेचे तापमान २८० ते २९५ से. ठेवले असता कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजनाचे ऑक्सिडीकरण [⟶ऑक्सिडीभवन] होऊ शकते. ऑक्साइडाचे तापमान ३०५ से. वर जाऊ न देण्याची दक्षता घेतात.

हायड्रोकार्बन वायूंचे ऑक्सिडीकरण करण्याकिता आ. १ (आ) व १ (इ) मध्ये दाखविण्यात आलेले सोसनळ्यांचे प्रकार वापरतात. आ. १ (आ) मधील सोसनळी मंदगती ज्वलनाकरिता व आ. १ (इ) मधील  आ. १. ज्वलनासाठी वापरण्यात येणाऱ्या सोसनळ्या : (अ) कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजन यांच्याकरीता, (आ) व (इ) हायड्रोकार्बनांसाठी.सोसनळी स्फोट ज्वलनाकरिता आहे. पहिल्या प्रकारात एका ता पविलेल्या प्लॅटिनम तारेच्या वेटोळ्यावरून वायू व ऑक्सिजनाचे मिश्रण नेऊन ऑक्सिडीकरण करण्यात येते. आ. १ (इ) मधील सोसनळीमध्ये दोन प्लॅटिनम तारांची टोके एकमेकांच्या जवळ असतात आणि विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने त्यांच्यातून ठिणगी पाडण्यात येते. या प्रकारात ज्वलन चांगले होते परंतु स्फोटाचा धोका असतो.

  रासायनिक अधिशोषणमापनाच्या ऑरसॅट पद्धतीत वापरण्यात येणारे उपकरण दोन सोसनळ्या असलेले आणि लहान आकारमानाचे असते. तसेच प्रयोगशाळेतील वापराच्या दृष्टीने सहा अगर जास्त सोसनळ्यांचे मोठ्या आकारमानाचे उपकरणदेखील मिळते.


आ. २ मध्ये ऑरसॅट वायुशोषक उपकरण दाखविले आहे. उपकरणाचे मुख्य भाग असे आहेतः (अ) प्रतिपूरक नलिकेसह मोजनळी (व्यूरेट), (२) सोसनळी, (३) दंडगोलाकार वेष्टन वा मोजनळी व प्रतिपूरक नलिका यांचे तापमान कायम ठेवण्यासाठी पाण्याची नळकांडी. यातील प्रतिपूरक नलिकेसह मोजनळी आ. ३ मध्ये स्वतंत्ररीत्या दाखविली आहे. मोजनळीची धारकशक्ती १०० घ. सेंमी. (मिलि.) असून तिच्यावर एका घ. सेंमी.हून कमी आकारमानाचेही नीट वाचन करता येईल अशा प्रकारे खुणा केलेल्या असतात, मोजनळीची आ.२. ऑरसॅट वायूशोषक उपकरण : (१) प्रतिपूरक नलिकेसह मोजनळी, (२) सोसनळी, (३) दंडगोलाकार वेष्टनवरची बाजू एका तोटीने बंद केलेली असते व तिच्या तळातून एक नलिका द्रवाचा साठा असलेल्या पात्रास जोडलेली असते. हे द्रव पाणी, मिठाचा विद्राव किंवा पारा यांपैंकी एक असते. काही वायू पाण्यात व मिठाच्या विद्रावात विरघळत असल्याने प्रयोगशाळेतील कामाकरिता त्यांऐवजी पारा वापरतात. या द्रवाचा उपयोग मोजनळीमध्ये वायुमिश्रणाचा नमुना ओढून घेण्याकडे व त्यानंतर त्यास वेगवेगळ्या सोसनळ्यांमध्ये सारण्याकडे करण्यात येतो. विश्लेषणाचे निष्कर्ष (फले) प्रत्येक शोषणानंतर होणाऱ्या आकारमानाच्या बदलावर अवलंबून असल्यामुळे तापमान, वातावरणाचा दाब व पाण्याची वाफ यांच्यातील घडून येणाऱ्या फरकांचा वायुमिश्रणाच्या आकारमानावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. प्रतिपूरक नलिकेभोवती असलेला पाण्याचा मंदप्रवाह तापमानावर नियंत्रण ठेवतो व विश्लेषण करताना होणाऱ्या तापमानातील थोड्याशा फरकामुळे दाब व पाण्याची वाफ यांच्यातील बदल प्रतिपूरक योजनेमुळे नियंत्रित करता येतात. मोज नळीमधील पाऱ्यावर व प्रतिपूरक नलिकेतही थोडेसे पाणी ठेवण्यात हा उद्देश असतो.

आ. ३. ऑरसॅट उपकरणातील प्रतिपूरक नलिकेतील मोजनळी.भौतिकीय पद्धती : वायूच्या वर उल्लेखिलेल्यांपैकी विशिष्ट भौतिकीय गुणधर्मांचे मापन विशिष्ट उपकरणांच्या साहाय्याने करावयाच्या तत्त्वावर आधारित अशा अनेक पद्धती विश्लेषणासाठी विकसित करण्यात आल्या आहेत. साध्या रोधतापमापकापासून ते गुंतागुंतीच्या वर्णपटमापकापर्यंत विविध प्रकारची उपकरणे या प्रकारच्या विश्लेषण पद्धतीमध्ये वापरली जातात. कारखान्यातील रासायनिक प्रक्रिया बंद भांड्यात होत असताना तिचे सुयोग्य नियमन बाहेरून म्हणजे पॅनेल फलकावरून करण्याकरिता अशा उपकरणात्मक पद्धतींचा विशेष उपयोग केला जातो. जंबुपार व अवरक्त वर्णपटमापन, क्ष-किरण शोषण-मापन, द्रव्यमान वर्णपटमापन, ध्रुवणलेखन (पोलॅरोग्राफी), व्यतिकरणमापन इ.  आधुनिक तंत्रांचा निर्देश या बाबतीत करता येईल.

प्रत्येक वायू विशिष्ट तापमाना पर्यंत थंड केल्यास दाब देऊन द्रवरूप करता येतो. विश्लेषण करावयाच्या मिश्रणातील दोन घटक वायूंच्या द्रवीभवनाच्या तापमानांत फरक असेल तेव्हा हे घटक अलग करण्यासाठी मिश्रणाचे द्रवीभवन– १९०से. किंवा त्याही खाली तापमान आणून केले जाते व या द्रवीभूत मिश्रणाचे भागशः ऊर्ध्वपातन करून त्यातील घटक वायू अलग केले जातात. या नीच तापमान ऊर्ध्वपातन क्रियेचा उपयोग वायू विश्लेषणात भौतिकीय पद्धती वापरताना केला जातो. नीच तापमान ऊर्ध्वपातन प्रक्रिया चालू असताना द्रवरूप मिश्रणातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक घटक वायूचा उकळबिंदू व ऊर्ध्वपातन उपकरणाच्या ग्राहकपात्रात गोळा झालेल्या वायूमुळे वाढलेला दाब यांच्या आलेखांच्या साहाय्याने घटक वायूंचे गुणात्मक तसेच परिमाणात्मक विश्लेषण करता येते.

वायू विश्लेषणाच्या भौतिकीय पद्धतींपैकी काही पद्धती सामान्यपणे वापरल्या जातात त्यांसंबंधी माहिती थोडक्यात खाली दिली आहे.

ऊष्मीय संवाहकता : सर्व वायू उष्णता संवाहक असतात. प्रत्येक वायूची ऊष्मीय संवाहकता समान नसते. वायुमिश्रणाची ऊष्मीय संवाहकता मोजून त्यावरून असमान उष्णतासंवाहक असलेल्या दोन घटक वायूंचे मिश्रणातील परिमाण काढता येते. अशा ऊष्मीय संवाहकता मापनाच्या उपकरणात तप्त तार-अभिज्ञातक वापरतात. टंगस्टन किंवा अन्य तत्सम धातूच्या तारेतून सोडलेल्या विजेच्या प्रवाहाला होणाऱ्या विद्युत रोधामुळे ती तार तापते. तिच्यातून बाहेर पडणारी उष्णता सभोवतीच्या वातावरणास दिली जाते. त्यामुळे तारेचे तापमान कमी होऊन विद्युत् रोधात बदल होतो. तारेभोवती विश्लेषण करावयाच्या वायुमिश्रणाचे आवरण ठेवल्याने मिश्रणाच्या ऊष्मीय संवाहकतेच्या प्रमाणात तारेच्या तापमानात व पर्यायाने विद्युत् रोधात फरक दिसून येतो. प्रत्येक वायूची व वायूमिश्रणाची ऊष्मीय संवाहकता विशिष्ट असल्यामुळे विद्युत् रोधातील फरक तारेभोवती असलेल्या वायूंची ऊष्मीय संवाहकता दर्शवतो. या तत्त्वावर आधारित उपकरणात एकाच प्रकारच्या व सारख्या लांबीच्या दोन तारा असतात. एक तार प्रमाणित (संदर्भ) किंवा वाहक वायूच्या आवरणात ठेवलेली असते, तर तशाच दुसऱ्या तारेभोवती विश्लेषण करावयाच्या वायूने मिश्रित अशा वाहकवायूचे आवरण ठेवलेले असते. या दोन तारांच्या विद्युत् रोधांतील तौलनिक फरक ⇨ व्हीट्स्टन सेतू वापरून मोजला जातो व त्यावरून दुसऱ्या तारेभोवतालच्या मिश्रणातील विशिष्ट वायूंचे परिमाण काढले जाते.


निरनिराळ्या वायुमिश्रणांचे विश्लेषण करण्याकरिता प्रथमतः उपकरणाचे प्रमाण वायुमिश्रणे वापरून इयत्तीकरण (उपकरणावरील प्रत्येक मापन खुणेचे अचूक मूल्य निश्चित करण्याची क्रिया) केलेले असते व त्यामुळे वायूंचे गुणात्मक तसेच परिमाणात्मक विश्लेषण करता येते. विशिष्ट उपकरणाची अंतर्गत रचना त्याच्या नियोजित वापरावर अवलंबून असते. विश्लेषणाशिवाय रासायनिक प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी देखील अशा प्रकारची उपकरणे वापरली जातात. तप्त तार अभिज्ञात-कांच्या जागी ⇨ थर्मिस्टर अभिज्ञातकाचाही वाढता वापर आधुनिक उपकरणांतून केला जात आहे. थर्मिस्टर हे इलेक्ट्रॉनीय अर्धसंवाहक (ज्याची विद्युत् संवाहकता धातू व निरोधक यांच्या दरम्यान असते असे द्रव्य) असून त्याचा विद्युत् रोध तापमानातील थोड्याशा वाढीमुळेदेखील खूप प्रमाणात कमी होतो. या गुणधर्मामुळे थर्मिस्टर अभिज्ञातकाने तापमानांतील फरक अधिक बिनचूकपणे मोजता येतात. वायूच्या ऊष्मीय संवाहकतेतील फरकामुळे अभिज्ञातकाच्या तापमानात होणाऱ्या बदलांनुसार विद्युत् रोधात बदल होत असतो. धातूच्या तारेचे तापमान वाढले तर विद्युत रोध वाढतो. त्याची वाढ दर अंश सेल्सिअसला ०.४% इतकी असते.  थर्मिस्टरचे तापमान वाढले, तर त्याचा विद्युत् रोध उलट -४% इतक्या प्रमाणात कमी होतो. म्हणून कमी तापमानास थर्मिस्टरचे ऊष्मीय संवाहकता अभिज्ञातक तप्त तार अभिज्ञातकापेक्षा अधिक संवेदनाक्षम असतात परंतु उच्च तापमानात त्यांची कार्यक्षमता तुलनेने कमी होते. ऊष्मीय संवाहकतामापक उपकरणांचा उपयोग अनेक वायुमिश्रणांच्या विश्लेषणासाठी करतात. उदा., ऑक्सिजन-हायड्रोजन, नायट्रोजन-हीलियम, नायट्रोजन-कार्बन मोनॉक्साइड, हवेत मिसळलेले हायड्रोकार्बन, कार्बन डाय-ऑक्साइड, अमोनिया इत्यादी. वायू वर्णलेखनाच्या अत्याधुनिक उपकरणांत देखील ऊष्मीय संवाहकता अभिज्ञातकांचा वापर करतात. [⟶ वर्णलेखन].

वरील पद्धतीशिवाय वायूची घनता, ज्वलनाची उष्णता, चुंबकीय ग्रहणक्षमता इ. गुणधर्माच्या मापनावर आधारलेली व विशिष्ट वायुमिश्रणाच्या विश्लेषणासाठी प्रमाणित केलेली उपकरणे शास्त्रीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांकडून उपलब्ध होऊ शकतात.

वायू वर्णलेखन : १९५३ पासून विश्लेषणाच्या क्षेत्रात नव्याने विकसित झालेली व अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेली वायू वर्णलेखनाची पद्धती द्रव मिश्रणांच्या विश्लेषणासाठीदेखील विविध क्षेत्रांत वापरली जात आहे. तिच्या तुलनेत वर दिलेल्या जुन्या पद्धती मागे पडू लागल्या आहेत अगर त्यांची नव्या पद्धतींशी सांगड घातली जात आहे. नव्या पद्धतीत वायुमिश्रणातील घटक परस्परांपासून अलग केले जातात. त्याकरिता सच्छिद्र दाणेदार अशा पृष्ठशोषक पदार्थांने किंवा निष्क्रिय वा अक्रिय अशा घन पदार्थांवर पसरलेल्या द्रव पदार्थांच्या थराने भरलेला असा लांबलचक स्तंभ वापरतात. हा द्रव पदार्थ सामान्यतः अत्युच्च उकळबिंदू असलेले हायड्रोकार्बन किंवा त्याचा बहुवारिक असतो. काचेच्या अगर धातूच्या केशनलिकेत बसवलेल्या या स्तंभाचे तापमान एका विशिष्ट पातळीवर स्थिर ठेवले जाते. ही पातळी वायुमिश्रणातील घटकांच्या उकळबिंदूंच्या २५ते १००से. अधिक असते. या स्तंभातून हीलियम, हायड्रोजन, आरगॉन, नायट्रोजन यांसारख्या अक्रिय वायूला वाहक वायू म्हणतात. वाहक वायूचा प्रवाह स्तंभात प्रवेश करतो त्या ठिकाणी विश्लेषण करावयाच्या वायुमिश्रणाचा नमुना अंतःक्षेपण करून प्रवाहात सोडतात. उच्च तापमानामुळे घटक वायूंचे बाष्पीभवन होऊन सर्व घटक आपापल्या विशिष्ट गतीने वाहक वायूबरोबर स्तंभातून पुढे-पुढे सरकू लागतात. त्यांची ही गती त्या घटकाच्या पृष्ठशोषणांकावर अवलंबून असते [⟶अधिशोषण]. त्यामुळे स्तंभाच्या दुसऱ्या टोकाला वाहक वायू बाहेर पडतो तेव्हा घटक वायू अलग अलग होऊन एकामागून एक बाहेर पडू लागतात. वाहक वायूचा दाब, तापमान नियंत्रित करून व विशिष्ट द्रवाचा स्तंभ वापरून मिश्रणातील घटक संपूर्णपणे अलग करता येतात. स्तंभाच्या दुसऱ्या टोकाला बसवलेल्या अभिज्ञातकामुळे घटक वायू व त्यांचे मिश्रणातील प्रमाण काढता येते. वर उल्लेखिलेल्या ऊष्मीय संवाहकता-मापक अभिज्ञातकाशिवाय अन्य प्रकारचे अभिज्ञातकही (उदा., अवरक्त वर्णपटमापक, द्रव्यमान वर्णपटमापक इ.) वापरले जातात. अभिज्ञातकाबरोबर योग्य अशी संवेदनाशील आलेखन उपकरणे वापरून घटक वायूंच्या विश्लेषणाचा आलेख मिळविता येतो. वायू वर्णलेखन तंत्रामुळे जवळजवळ सर्व वायुमिश्रणांचे गुणात्मक व परिमाणात्मक विश्लेषण करता येणे शक्य आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

उपयोग : एखाद्या बोगद्यातून वाहनांची वाहतूक चालू असल्यामुळे विवक्षित ठिकाणी जमा होणाऱ्या कार्बन मोनॉक्साइडासारख्या विषारी वायूंची संहती (प्रमाण) जाणून घेण्याकरिता, तसेच खाणीतील वायुमिश्रणांमुळे संभाव्य स्फोटांचा धोका समजून येण्यासाठी वायू विश्लेषणाचा उपयोग करतात.

ज्वलनाकरिता वापरण्यात येणाऱ्या वायूंचे उष्णतेच्या दृष्टीने मूल्यमापन करण्याकरिता, तसेच अनेक ठिकाणी काही उद्योगधंद्यांतील प्रक्रियांतील वातावरणात सोडून देण्यात येणाऱ्या वाहिनी वायूंची ज्वलनाच्या दृष्टीने योग्यता ठरविण्याकरिता हे विश्लेषण वापरता येते. मोटारगाड्यांतील अंतर्ज्वलन (एंजिनाच्या आतच इंधन जाळण्याची व्यवस्था असलेल्या) एंजिनाच्या निष्कास (बाहेर टाकल्या जाणाऱ्या) वायूंचे विश्लेषण करून एंजिनाच्या जास्तीत जास्त कार्यक्षमतेकरिता लागणारी अनुयोजना (जुळवाजुळव) कारब्युरेटरमध्ये करता येते. निरनिराळ्या पदार्थाच्या ज्वलनामुळे जे विषारी वायू तयार होतात, त्यांचे मापन करणेही या पद्धतीने शक्य असते.

जीववैज्ञानिक व जीवरासायनिक विक्रियेत ज्या वायू विश्लेषण पद्धती अंगीकारण्यात येतात, त्या अगदी खास प्रकारच्या असून त्यांचे उद्देशही वेगळे असतात. उदाहरण म्हणून रक्तातील वायूंच्या निश्चितीच्या व्हॅनस्लाइक उपकरणाचा व पेशींनी शोषलेल्या ऑक्सिजनाच्या मापनाच्या वारबुर्ग उपकरणाचा निर्देश करता येईल.

पहा : अनुमापन उष्णता संवाहक द्रव्यमान वर्णपटविज्ञान वर्णलेखन वर्ण व वर्णमापन वायुशोषण वैश्लेषिक रसायनशास्त्र.

संदर्भ : 1. Matuszak, M. P. Fisher Gas-Analysis Manual, Pitsburg, 1962,

           2. Mullen, P. W. Modern Gas Analysis, New York, 1955.

           3. Thorpe, J. F. Whiteley, M. S. Thorpe’s Dictionary of Applied Chemistry, Vol.II, London, 1966.

          4. Willard, H. B. Merritt, L. L Dean, J. A. Instrumental Methods of Analysis, London, 1988.

पानसरे, व. स. खेडेकर,आ. वि.