कंडरा : (स्‍नायुरज्‍जू). ज्या तंतुसमूहाच्या दोरीसारख्या चकचकीत पांढऱ्या गठ्ठ्यांनी अस्थींना किंवा उपास्थींना (सांध्यातील हाडांच्या पृष्ठभागावर असणाऱ्या लवचिक पेशीसमूहांना) स्‍नायू घट्ट बांधले जातात त्यांना कंडरा म्हणतात. स्‍नायू एकत्र बांधणाऱ्या पातळ, रुंद व चपट्या कंडरेला कंडराकला म्हणतात.

स्‍नायू जाड, पुष्ट व पसरलेला असला तरी त्याची कंडरा चपटी व आटोपशीर असल्यामुळे अस्थीवरची लहान जागासुद्धा तिला पुरते. स्‍नायूचे आकुंचन झाल्याबरोबर त्याची कंडरा दोरीसारखी ओढली जाते, त्यामुळे ती ज्या अस्थीशी बांधलेली असते त्या अस्थीचे चलन होते. स्‍नायूंची तरफक्रिया त्यामुळे अधिक परिणामकारी होते. स्नायुतंतूंची टोके कंडरातंतूंना घट्ट बांधल्यासारखी असतात. स्‍नायूंच्या उगमापाशी व निवेशापाशी (स्‍नायू हाडांना जेथे चिकटलेला असतो तेथे) कंडरा असतात, त्यांना अनुक्रमे उद्‌गमकंडरा आणि निवेशकंडरा अशी नावे आहेत.

आ. १. पोटरीवरील मुख्य स्नायू व त्याची कंडरा : (१) घोड कंडरा.

कंडरा संश्लेषीजन (अस्थी व उपास्थी यांमध्ये आढळणाऱ्या विशिष्ट प्रथिनांच्या, कोलॅजनाच्या) तंतूंच्या बनलेल्या असून समांतर तंतूंचे मिळून समूह बनतात. अनेक समूहांच्या गठ्ठ्यांची कंडरा बनते. ते तंतू प्रत्यास्थ (लवचिक) नसतात. स्‍नायूंचे कार्य, स्थान, लांबी व जाडी यांवर कंडरांची  लांबी, जाडी व आकार अवलंबून असतात. काही कंडरा लांब, जाड व दोरीसारख्या गोल असतात तर काही आखूड, पातळ व चपट्या असतात. अनेक तंतूंचे मिळून समूह बनतात त्या समूहांभोवती अवकाशी ऊतक (संयोजी म्हणजे जोडणाऱ्या ऊतकांचा एक प्रकार, ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असणारा पेशीसमूह) असल्यामुळे तंतू एकत्र बांधलेले असतात. या अवकाशी ऊतकांतच कंडरेला रक्त पुरविणाऱ्या वाहिन्या असतात. असे अनेक समूह एकत्र बांधून त्यांच्या गठ्ठ्याचीच कंडरा बनते. कंडरेभोवती पोकळ असे पांढरे आवरण असते. त्या पांढऱ्या आवरणाच्या आतील बाजूस संधिद्रवासारखा स्‍निग्ध व चिकट द्रव पदार्थ असल्यामुळे कंडरांची हालचाल घर्षणाशिवाय होऊ शकते.

आ.२. कंडरेचा आडवा छेद (१) कंडरा तंतुसमूह, (२) अवकाशी ऊतक,(३) रक्तवाहिन्या.       

कंडरा तंतूंची उत्पत्ती भ्रूणमध्यस्तरापासून (विकासाच्या पूर्व अवस्थेत असणाऱ्या बालजीवाच्या तीन थरांपैकी ज्यापासून पुढे हाडे, स्‍नायू इ. बनतात अशा मधल्या थरापासून) होते. त्या स्तरातील  कोशिकांची (पेशींची)केंद्रे तंतूंच्या एका बाजूस चपटी त्रिकोणाकृती किंवा तारकाकृती दिसतात.

      

ढमढेरे, वा. रा.