सार्दू, व्हीक्‌ तॉर्‌याँ : (५ सप्टेंबर १८३१–८ नोव्हेंबर १९०८).फ्रेंच नाटककार. जन्म पॅरिस शहरी. नाटककार होण्यासाठी त्याने वैद्यकाचा अभ्यास सोडून दिला. एकोणिसाव्या शतकातील ⇨ एमिल ओझ्ये आणि ⇨ आलेक्सांद्र द्यूमा (फीस ) ह्या फ्रेंच नाटककारांप्रमाणेच त्यालाही नाटककार म्हणून मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. त्याने विपुल नाट्यलेखन केले. La tavernedes etudiants (१८५४ इं.भा.द स्टुडन्ट इन टॅव्हर्न ) हे त्याचे पहिले नाटक. रंगभूमीच्या तांत्रिक बाजूंवर त्याचे उत्तम प्रभुत्व होते. जास्तीत जास्त नाटकीय परिणाम साधण्याच्या दृष्टीने ह्या प्रभुत्वाचा त्याने बराच उपयोग करून घेतला तथापि अस्सल नाट्यकृतीचा जिवंतपणा तो आपल्या नाटकांत आणू शकला नाही. त्यामुळे लोकप्रियता मिळाली, तरी श्रेष्ठ नाटककार म्हणून त्याला मान्यता मिळाली नाही. तसेच त्याची लोकप्रियता ही त्याच्या निधनानंतर वेगाने ओसरत गेली. १८६० ते १८६४ पर्यंत त्याने वीस नाटके लिहिली. Les pattes de mouche (१८६० इं.भा.ए स्क्रॅप ऑफ पेपर, १८८९), Nos intimes (१८६१ इं.भा. अवर फेंड्स, १८७९), Divorcons (१८८० इं. भा. लेट्स गेट ए डिव्होर्स) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके होत. मादाम सांस-जीन (१८९३) ह्या त्याच्या नाटकाचे प्रयोग त्याच्या मृत्यूनंतरही होत होते. १८७७ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची निवड झाली. पॅरिस येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.