तॅन, इपॉलित आदॉल्फ : (२१ एप्रिल १८२८–५ मार्च १८९३) फ्रेंच समीक्षक, इतिहासकार आणि तत्त्वज्ञ. आर्देन प्रदेशातील व्हुझिल येथे जन्म. त्याचे वडील वकील होते. तॅनचे आरंभीचे काही शिक्षण खाजगी रीत्या झाले तथापि वडिलांच्या मृत्यूनंतर पुढील सर्व शिक्षण त्याने पॅरिसला घेतले. तत्वज्ञान हा त्याचा अत्यंत आवडता विषय, परंतु ह्याच विषयाच्या विद्यापीठीय उच्च परीक्षेत, पारंपरिक वृत्तीच्या परीक्षकांना त्याची मते न रुचल्यामुळे तो उत्तीर्ण होऊ शकला नाही, सारे ज्ञान हे इंद्रियानुभवांवर अधिष्ठित असले पाहिजे, ह्या विचाराने तो प्रभावित झाला होता. हेगेल आणि स्पिनोझा ह्यांच्या तत्त्वज्ञानाचाही त्याच्या मनावर परिणाम झालेला होता. त्यानंतर काही काळ तो शिक्षक होता. १८५३ मध्ये त्याने साहित्य विषयातील ‘डॉक्टरेट’ संपादिली. १८५६ मध्ये त्याने लिव्ही ह्या रोमन इतिहासकारावर लिहिलेल्या निबंधाला (एसॅ स्यूर तीत–लीव्ह) फ्रेंच अकादमीचे पारितोषिक मिळाले. ह्याच सुमारास शारीरक्रियाविज्ञानाचाही त्याने अभ्यास केला. खाजगी शिकवण्या, प्रतिष्ठित नियतकालिकांतून साहित्य आणि इतिहास ह्यांसारख्या विषयांवरील लेखन अशा मार्गांनी त्याने उदरनिर्वाह केला. १८६४ मध्ये पॅरिसच्या कलाविद्यालयात सौंदर्यशास्त्राचा आणि कलेच्या इतिहासाचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. ह्या पदावर त्याने १८८३ पर्यंत काम केले. ह्या दीर्घ सेवेत १८७६–७७ ह्या एकाच वर्षाचा खंड पडला. १८७८ मध्ये फ्रेंच अकादमीचा सदस्य म्हणून त्याची नियुक्ती झाली. पॅरिस येथे तो निधन पावला.
तॅनच्या साहित्यसमीक्षणात्मक लेखनात फ्रेंच बोधकथाकार (फॅब्यूलिस्ट) ⇨ला फाँतेन ह्याच्यावर लिहिलेला ला फाँतेन एसे फाब्ल (१८५३), एसॅ स्यूर तीत–लीव्ह, इस्त्वार द् ला लितेरात्यूर आंग्लेझ (४ खंड १८६३–६४ इं. भा. हिस्टरी ऑफ इंग्लिश लिटरेचर, १८७१) ह्या ग्रंथाचा समावेश होतो. आपल्या इंग्रजी साहित्यविषयक ग्रंथाला तॅनने जोडलेल्या प्रस्तावनेतून त्याची साहित्यसमीक्षाविषयक भूमिका आणि वाङ्मयीन–सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भातील त्याचा दृष्टिकोण स्पष्ट होतो.
तॅनच्या मते साहित्यकृतीची चिकित्सा करण्यासाठी लेखकाच्या संदर्भात ‘वंश’, ‘परिस्थिती’ आणि क्षण ह्या तीन प्रमुख घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘वंश’ म्हणजे लेखकाचे उपजत, आनुवंशिक गुण. ‘परिस्थिती’ त त्याची सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी येते. ज्या विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत लेखक लिहीत असतो तो ‘क्षण’ ह्या संज्ञेने तॅनने निर्दिष्ट केलली आहे. ऐतिहासिक कार्यकारणभाव आणि मानसशास्त्र ह्यांविषयीच्या सैद्धांतिक भूमिकेचा त्यातून प्रत्यय येतो.
पॅरिसच्या कलाविद्यालयात प्राध्यापक असताना त्याने दिलेली व्याख्याने फिलोझोपी द् लार (४ खंड, १८६५–६९ इं. शी. द फिलॉसॉफी ऑफ आर्ट) ह्या नावाने संगृहीत झालेली असून त्यांतून त्याचा कलाविचार स्पष्ट झालेला आहे.
तॅनचा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोण प्रत्यक्षार्थवादी, निसर्गवादी आणि नियतिवादी होता. तत्कालीन भौतिक विज्ञानात विश्वाच्या स्वरूपाचा आराखडा यथार्थपणे प्रतिबिंबीत झाला आहे, असे तो मानीत असे. विश्व एक आहे आणि एकात्म आहे भौतिक निसर्ग, मानसिक विश्व, सामाजिक अस्तित्व अशा कप्प्यांत त्याचे विभाजन करणे गैर आहे भौतिक घटना व मानसिक घटना हे एकाच तत्त्वाचे भिन्न आविष्कार असतात व म्हणून कोणतीही घटना, मग ती भौतिक, मानसिक किंवा सामाजिक असो, निश्चित कार्यकारणनियमांना अनुसरून अनिवार्यपणे घडून येते हे सिद्धांत त्याने दृढपणे स्वीकारले होते. ह्या विचारसरणीवर तत्कालीन भौतिक विज्ञानाप्रमाणे स्पिनोझा आणि हेगेल ह्यांच्या तत्त्वज्ञानाचाही प्रभाव आढळून येतो. ह्या दृष्टिकोणाला अनुसरून, कोणत्याही विशिष्ट मानसिक किंवा सामाजिक घटनेचे स्पष्टीकरण ती ‘विवेक’, ‘भावनाशीलता’ किंवा ‘ऐतिहासिक प्रवृत्ती’ ह्यांसारख्या एखाद्या अमूर्त शक्तीचा आविष्कार आहे एवढे म्हणून करणे अयोग्य आहे असे तॅन मानीत असे. विशिष्ट मानसिक किंवा सामाजिक घटना मूर्त असते, ती अनेक घटकांची एक दाट अशी वीण असते आणि म्हणून जे अनेक गुंतागुंतीचे कारण–घटक एकत्र येऊन ती निर्माण झालेली असते, त्यांचा निर्देश करून त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून तिचे मूर्त स्वरूप कसे सिद्ध होते हे दाखवून दिले पाहिजे, अशी त्याची भूमिका होती. व्यक्ती म्हणजे अशा विशिष्ट मानसिक घटनांची एक मालिका असते आणि समाज म्हणजे विशिष्ट संबंधांनी परस्परांशी निगडित असलेल्या व्यक्तींचा समूह असतो. तेव्हा मानसिक किंवा सामाजिक घटनांचे नियमन करणाऱ्या सर्व भौतिक, मानसिक आणि सामाजिक घटनांचा शोध घेऊन त्यांच्या साहाय्याने विशिष्ट घटकांचा उलगडा केला पाहिजे. ह्या घटकांत व्यक्तीचे आनुवंशिक गुण असतील, भौतिक आणि सामाजिक परिसराचे गुणविशेष असतील आणि विशिष्ट सामाजिक परिस्थितीही असेल. फिलोझोपी द् लार आणि लेझोरिजीन द् ला फ्रांस काँतांपॉरॅन (६ खंड, १८७५–९३, इं. शी. द ऑरिजिन ऑफ कंटेपररी फ्रान्स ) ह्या त्याच्या ग्रंथात आणि अन्य लिखाणात तॅनने ह्याच पद्धतीचा वापर केला आहे.
लेझोरिजीन द् ला फ्रांस काँतांपॉरॅन हा त्याचा विशेष प्रसिद्ध असा इतिहासग्रंथ. इतिहासकार म्हणून तॅनची कीर्ती ह्या ग्रंथावर अधिष्ठित आहे. क्रांतिपूर्व काळातील फ्रान्सपासून नेपोलियनोत्तर काळापर्यंतच्या फ्रान्सचा इतिहास त्यात आला आहे. आपल्या योजनेनुसार हा ग्रंथ पूर्ण करण्यापूर्वीच तॅन निधन पावला. ह्या बृहदृग्रंथाच्या पहिल्या ४ खंडापैकी प्रत्यक्ष फ्रेंच क्रांतीशी संबंधित असलेले खंड २, ३, ४ हेच मुख्यतः आज वाचले जातात. उत्तरकालीन इतिहासकारांनी तॅनच्या ह्या इतिहासग्रंथावर टीका केलेली आहे. त्याने दिलेले तपशील अपुरे असून ते पद्धतशीरपणे दिलेले नाहीत. इतिहासाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची त्याची भूमिका क्रांतिविरोधी मीमांसेत सुटलेली आहे अशी ही टीका आहे. तथापि ह्या ग्रंथात तॅनने विविध घटना व व्यक्ती ह्यांचे केलेले मानसशास्त्रीय विश्लेषण परिणामकारक आहे.
द् लँतॅलिजांस (१८७० इं. भा. ऑन इंटेलिजन्स, १८७१) हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ. मानवी व्यक्तित्वाच्या आकलनासाठी एक सुव्यवस्थित पद्धत त्याने ह्या ग्रंथात मांडलेली आहे. त्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाचा आणि मानसशास्त्रविषयक आस्थेचा प्रत्यय त्यातून विशेषत्वाने येतो. मानवाचा आत्यंतिक नियतिवादी आणि इहवादी दृष्टीने तॅनने विचार केल्याची टीका ह्या ग्रंथावर करण्यात आली होती.
समीक्षा, इतिहास आणि तत्त्वज्ञान ह्या तीनही विषयांबाबतच्या त्याच्या ग्रंथात एक सुस्पष्ट सुसूत्रता आढळून येते. मात्र वर्गीकरणाची आणि सुसंबद्ध दर्शनाची आवड हा त्याचा गुण कधी कधी दुर्गुण ठरतो. तॅनच्या विचारांचा एमिल झोलाच्या निसर्गवादी विचारसरणीवर लक्षणीय प्रभाव पडलेला आहे. तॅनचे अधिकृत चरित्र त्याच्या वेचक पत्रव्यवहारासह त्याच्या पत्नीने प्रसिद्ध केले (इं. शी. लाइफ एन्ड लेटर्स ऑफ एच्. तॅन, ३ खंड, १९०२–०८).
संदर्भ : Kahn, S. J. Science and Aesthetic Judgement : A study of Taine’s Critical Method, 1953.
सरदेसाय, मनोहरराय रेगे, मे. पुं.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..