झोला, एमिल : (२ एप्रिल १८४०–२९ सप्टेंबर १९०२). सुप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार. जन्म पॅरिस येथे. त्याचे वडील इटालियन होते. एमिलचे बालपण व प्राथमिक शिक्षण दक्षिणेकडील एक्स-आं-प्रॉव्हांस ह्या शहरात पार पडले. तो सात वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले. चरितार्थासाठी एमिल १८५४ मध्ये पॅरिसला आला. १८५९ मध्ये विज्ञानातील पदवी परीक्षेत त्याला अपयश आले. १८६२–६६ पर्यंत त्याने ‘आशॅत’ या प्रकाशनसंस्थेत काम केले.

एमिल झोला

काँत आ निनाँ (१८६४, इं. शी. टेल्स फॉर निनाँ) हा त्याचा पहिला कथासंग्रह आणि ला काँफेस्याँ द् क्लोद (१८६५, इं. शी. क्लोद्स कन्फेशन) ही त्याची पहिली कादंबरी. १८६६ पासून त्याने स्वतःस सर्वस्वी लेखनासच वाहून घेतले. १८६८ मध्ये तेरँझ राकँमादलॅन फेरा ह्या त्याच्या वास्तववादी कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्याच सुमारास त्याने वाङ्‌मयाचे इतिहासकार व विचारवंत इपॉलीत तॅन, डॉ. प्रॉस्पॅर ल्युका व डॉ. क्लोद बॅर्नार यांच्याकडून स्फूर्ती घेऊन साहित्यातील निसर्गवादाचा पुरस्कार केला. वस्तुतः बाल्झॅक आणि गाँकूर बंधू यांनी झोलाच्या आधीच निसर्गवादी चित्रणाचा पाया घातला होता तथापि निसर्गवादाची तात्त्विक भूमिका मांडण्याचे श्रेय झोलाकडेच जाते. विज्ञानाचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोण, लेखनविषयाचे सूक्ष्म निरीक्षण, आनुवंशिकता व आसमंत यांचे परिश्रमपूर्वक उभे केलेले संदर्भ आणि अगदी काटेकोरपणाने पुरविलेले वर्णनातील विपुल तपशील, ही निसर्गवादी साहित्याची वैशिष्ट्ये झोलाच्या कादंबऱ्यांत सतत आढळतात. या भूमिकेचे प्रत्याक्ष दर्शन घडविण्यासाठी त्याने १८७१–९३ ह्या काळात ले रूगाँ माकार (इं. अर्थ, द रूगाँ माकार) ह्या नावाखाली वीस कादंबऱ्यांची माला गुंफली. ह्या मालेस त्याने लिस्त्वार नात्युरॅल ए सोस्याल द्यून फामीय सु ल् सगाँतांपीर (इं. शी. नॅचरल अँड सोशल हिस्टरी ऑफ अ सेंकड एंपायर फॅमिली) असे उपशीर्षक दिलेले आहे. मूळ संकल्पाप्रमाणे दहा पण प्रत्यक्षात मात्र वीस झालेल्या ह्या कादंबऱ्यांच्या मालेत तत्कालीन फ्रेंच समाजातील शेतकरीकामगार वर्गापासून राजदरबारी लोकांपर्यंतचे विस्तृत समाजचित्रण केलेले आहे. धक्का देणाऱ्या सामाजिक दंभस्फोटाबरोबरच काव्यात्मता, भावपूर्णता, महाकाव्यसदृश वस्तुनिष्ठ कल्पकता इ. विशेष या मालेतील कांदबऱ्यांत आढळतात. या मालेतील सातव्या कादंबरीपासून (इं. शी. द ड्रॅम शॉप, १८७७) झोलाला अतिशय लोकप्रियता लाभली. प्रस्तुत कादंबरीत मद्यपानाच्या व्यसनाचे वास्तव चित्रण आहे.

ल्  रॉमां एक्स्पेरिमांताल (१८८०, इं. शी. द एक्स्‌पेरिमेंट्ल नॉव्हेल), रॉमांसिए नात्युरालिस्त (१८८१, इं. शी. द नॅचरॅलिस्टिक नॉव्हेलिस्ट्स) ह्या ग्रंथांतून झोलने निसर्गवादाची तत्त्वप्रणाली मांडली. त्यांच्या काही कांदबऱ्यांत ती अवास्तव आणि अनावश्यक स्वरूपात प्रकट झाल्याने त्यांच्या वाङ्‌मयीन मूल्यांची हानी झाल्याचे आढळते. तथापि झोलातील प्रतिभावंत साहित्यिक त्याच्यातील तत्त्वप्रतिपादक विचारवंताहून प्रभावी ठरला, यात शंकाच नाही. त्यामुळेच झोलाला एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून उच्च स्थान प्राप्त झाले. त्याच्या कादंबरीतील दरिद्री, व्यसनाधीन माणसांचे स्वभावरेखन अत्यंत प्रभावी वठले आहे. जनजीवनातील गडबड-गोंधळाचे वातावरण, जनसमूहांचा बंडखोर कल्लोळ यांची वर्णनेही तो प्रत्ययकारीपणे करतो. तत्कालीन फ्रेंच समाजजीवनाचे त्याने यथातथ्य वर्णन केले आहे. १८९४ मध्ये झोलाने सुप्रसिद्ध ⇨ ड्रायफस   प्रकरणात ड्रायफसची बाजू घेतली. ‘जाक्यूझ’ (आय अक्यूझ….) हे पत्रक प्रसिद्ध करून त्याने ड्रायफस ह्या निरपराधी ज्यूला झालेली शिक्षा किती अन्यायकारक आहे, हे दाखवून दिले. ह्यांमुळेच त्याला इंग्लंडमध्ये एक वर्षी हद्दपारी स्वीकारावी लागली. १९०२ मध्ये कार्बन मोनॉक्साइड वायूची विषबाधा होऊन त्याचा अंत झाला. निसर्गवादाचा प्रभावी प्रवर्तक व श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्याचे विश्वसाहित्यातील स्थान अढळ आहे. झोलाच्या जीवनावर काढलेला ‘द लाइफ ऑफ एमिल झोला’ हा चित्रपट (१९३७) प्रसिद्ध आहे.

संदर्भ : 1. Bernard, Marc Trans. Leblon, J. M. Zola, New York, 1960.

           2. Patterson, J. G. A Zola Dictionary, 1912.

           3. Sherard, R. H. Emile Zola: A Biographical and Critical Study. 1893.

           4. Wilson, Angus, Emile Zola, An Introductory Study of His Novels, New York, 1952.

सरदेसाय, मनोहरराय