रनार, झ्यूल : (२२ फेब्रुवारी १८६४–२२ मे १९१०). फ्रेंच कादंबरीकार आणि नाटककार. जन्म शालॉनस्यूर-मायेन येथे. नेव्हर्स आणि पॅरिस येथे त्याचे शिक्षण झाले. नंतर लेखन आणि खाजगी अध्यापन ह्यांच्या आधारे तो पॅरिसमध्ये राहू लागला. १८९० साली मेर्क्यूर फ्रांस ह्या कला-साहित्यविषयक नियतकालिकात तो काम करू लागला. फ्रान्समधील वाङ्ममयीन संस्था ‘अकादमी गाँकूर’ हिच्या आरंभीच्या सदस्यांपैकी रनार हा एक होय.

रनारने ले क्लॉपॉर्त (१९१९) ही आपली पहिली कादंबरी १८८८ च्या सुमारास लिहून पूर्ण केली. लेकॉर्निफ्लर (१८९२) आणि प्वाल कार्रोत (१८९४, इं. भा. कॅरट्स, १९४६) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या. त्यांपैकी प्वाल कार्रोत ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. रनारच्या वाट्याला आलेल्या प्रेमशून्य बालपणाचे उदास रंग ह्या कादंबरीत ठसठशीतपणे उमटले आहेत. फ्रांस्वा हा आई असून मातृवात्सल्याला वंचित झालेला मुलगा ह्या कादंबरीचा नायक. ‘प्वाल द कार्रोत’ हे त्याला त्याच्या केसांच्या रंगावरून मिळालेले टोपण नाव. ह्या कादंबरीवरून प्वाल कार्रोत ह्याच नावाने त्याने लिहिलेली (१९००) नाट्यकृतीही यशस्वी ठरली.

रनारच्या लेखनावर आरंभी निसर्गवादाचा प्रभाव होता. तथापि पुढे तो ओसरला. कारुण्य, विनोद, उपरोध ह्यांचा प्रत्यय सारख्याच परिणामकारकतेने देण्याचे सामर्थ्य रनारच्या शैलीत आहे. नेमक्या आणि पर्याप्त शब्दांचा वापर हे त्याच्या शैलीचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. समाजचित्रणापेक्षा व्यक्त्तींच्या सखोल मनोविश्लेषणावर त्याचा भर आहे.

रनारने लिहिलेला इस्वार नात्युरॅल (१८९६) हा ग्रंथही प्रसिद्ध आहे. प्राणिजीवनाची जिवंत शब्दचित्रे त्यात त्याने रेखाटली आहेत.

रनारचे बरेचसे साहित्य एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लिहिले गेले असले, तरी त्याचे नाते विसाव्या शतकाशीच जास्त जवळचे आहे. पॅरिस येथे तो निधन पावला.

टोणगावकर, विजया