त्रूबदूर : द. फ्रान्समधील मध्ययुगीन कवींचा वर्ग. द. फ्रान्समध्ये त्यावेळी प्रचलित असलेल्या प्रॉव्हांसाल (दॉक) ह्या साहित्य–भाषेत त्यांनी आपली गीते रचिली. अकराव्या शतकाच्याउत्तरार्धापासून तेराव्या शतकापर्यंत दरबारी गीतरचनेची एक परंपरा त्यांनी जोपासली उदात्त प्रेमाचा आणि नारीपूजनाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार घडविला. प्रेमाची मध्ययुगीन संकल्पना त्रूबदूरांच्या काव्यरचनेस पायाभूत होती. ह्या संकल्पनेनुसार सुंदर, सद्‌गुणी स्त्रीचे प्रेम उत्कट सेवावृत्तीने आणि विनयशीलतेने प्राप्त करून घेणे, ही खऱ्‍या प्रेमिकाची भूमिका प्रेमासाठी त्याने कोणत्याही दिव्याला तोंड द्यायला हवे आणि हे प्रेम विवाहबाह्य संबंधातून निर्माण झाले असले पाहिजे, विवाहात त्याची परिणतीही होता कामा नये. पतिपत्नीसंबंध हा प्रेमावर नव्हे, तर फक्त कर्तव्यावर अधिष्ठीत असतो, असे मध्ययुगीन ख्रिस्ती नीतिमूल्यांनुसार मानले जाई. प्रेमाला त्यात वाव नव्हता. तथापि विवाहबाह्य संबंध ह्या मूल्यसंदर्भाच्या पलीकडेच असल्यामुळे ते ठेवणाऱ्‍या स्त्री–पुरुषांतील प्रेम त्याच्याशी विरोधी नव्हते. त्रूबदूरांना अभिप्रेत असलेले प्रेमिक मुख्यतः सरदारवर्गातील होते. सरदारांच्या दरबारी त्रूबदूरांचे चांगले स्वागत होत असे.

त्रूबदूरांनी मुख्यतः पाच किंवा सहा कडव्यांचा ‘कांझो’ हा काव्यप्रकार हाताळला. सामाजिक किंवा राजकीय विषयांवरील कांझोला ‘सिर्व्हेन्तेस’ असे म्हणत. ह्याशिवाय बालादा (नृत्यगीत), पास्तोरॅला (ग्रामीण धनगर स्त्रीचे सरदाराने केलेले प्रियाराधन हा ह्याचा मुख्य विषय), आल्बा (प्रभातगीत), सेरेनादा (सांजगीत) असे काही काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. प्रभातगीत प्रणयिनीच्या तोंडी घातले जाई. एखाद्या पानमळ्यात किंवा फळबागेत चोरटेपणाने रात्र घालविणाऱ्‍या प्रणयी युगुलास पहारेकऱ्‍याने फुंकलेल्या शिंगातून मिळणारी प्रभातसमयाची दुःखद जाणीव आल्बात वारंवार व्यक्त केली जाते.

त्रूबदूरांच्या काव्यरचना संगीतबद्ध करून गाणाऱ्‍यांना ‘जाँग्‍लर’ असे म्हणत. त्रूबदूरही आपल्या रचना संगीतबद्ध करीत. सु  ४०० त्रूबदूर होऊन गेले. तत्कालीन समाजावर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांना बरेच स्वातंत्र्य असल्यामुळे ते राजकीय विषयांवरही भाष्य करू शकत. दरबारांत, विशेषतः दरबारी स्त्रियांभोवती, सेवाभावाचे आणि दाक्षिण्याचे प्रसन्न, सुसंस्कृत वातावरण ते निर्माण करीत. त्रूबदूरांच्या काव्यापासून प्रेरणा व स्फूर्ती मिळविणाऱ्‍यांत दान्ते आणि पीत्रार्क ह्यांसारख्या सर्व यूरोपीय साहित्यश्रेष्ठींचा अंतर्भाव होतो.

बेर्नार द व्हांतादूर, गीरो द बॉर्नेय, बेर्त्रां द बॉर्न (सर्व बाराव्या शतकातील) हे काही सुप्रसिद्ध त्रूबदूर.

सरदेसाय, मनोहरराय