नयन (तिबेटी मेंढी)

नयन: ही मोठी तिबेटी मेंढी तिबेटच्या पठारावर लडाखच्या उत्तर भागापासून पूर्वेकडे सिक्कीमच्या उत्तरेस असलेल्या प्रदेशापर्यंत आढळते. कधीकधी चाऱ्याच्या शोधार्य या मेंढ्या स्पिटी, नेपाळ आणि कुमाऊँमध्येही शिरतात. नयन ही ⇨ आर्गली या मेंढीची एक उपजाती असून हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन हॉग्‌सनाय असे आहे. मार्कोपोलो मेंढी म्हणून ओळखली जाणारी आर्गलीची आणखी एक उपजाती आहे, ती भारतामध्ये जम्मू व काश्मीरमधील फक्त हुंझा भागात आढळते. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन पोलिआय असे आहे.

रानटी मेंढ्यांमध्ये नयन ही सगळ्यांत मोठी मेंढी आहे. हिची खांद्यापाशी उंची ११०–१२० सेंमी. असते व शिंगे ९०–१०० सेंमी. लांब असतात पण शिंगे १४५ सेंमी. लांब असल्याचीही नोंद आढळते.

ही डौलदार व चपळ असून अंगकाठी हरणाची आठवण करून देते. नराचा रंग भुरकट तपकिरी असतो, पण खांद्यावर तो गडद असतो. ढुंगण, शेपटीच्या भोवतालची मंडलाकृती जागा, गळा, छाती, पोट व पायांची आतील बाजू पांढरी असते. वयस्क नराला आयाळ असते, पण ती हिवाळ्यात गळून पडते. मादीला नावापुरतीच आयाळ असते किंवा मुळीच नसते. तिच्या पोटाचा रंग भुरकट पांढरा आणि शेपटीभोवतालचे मंडल पुसट असते. हिवाळ्यात नर व मादी यांचा रंग फिकट असतो. नराची शिंगे चपटी व रुंद असून त्यांना एकच पूर्ण वेढा असतो.

तिबेटी पठाराच्या ज्या भागात या मेंढ्या रहातात तो भाग उंचसखल असून उजाड व निर्जन आहे. या मेंढ्यांना हिमवृष्टी आणि कडक ऊन यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे साहजिकच पाणी आणि अन्न मिळविण्यासाठी त्या वरचेवर स्थलांतर करतात. वसंत ऋतूत बर्फ वितळू लागताच उगवणारे गवत खाण्यासाठी त्या हिमरेषेजवळ (ज्या रेषेच्यावर कायमचे हिम असते त्या रेषेजवळ) जातात किंवा दऱ्याखोऱ्यांत ज्या ठिकाणी पाण्याचे प्रवाह, बसकी झुडपे व हिरवळ असेल तेथे जातात. उन्हाळ्यात त्या ४,६०० मी. पेक्षाही जास्त उंचीवर जातात आणि हिवाळ्यात निवाऱ्यासाठी खोल दऱ्यांत जातात. पहाट आणि संध्याकाळ या त्यांच्या चरण्याच्या वेळा होत. एखादी कोरडी जागा पाहून तेथील जमीन खुरांनी उकरून त्या लहानसा खळगा करतात व त्यात पडून विसावा घेतात. त्यांचा रंग भोवतालच्या परिसराशी मिळताजुळता असल्यामुळे त्या दिसून येत नाहीत.

वसंत ऋतूत नर व माद्या वेगळ्या होतात. उन्हाळ्यात वयस्क नर लहान गट करतात आणि सामान्यतः माद्या व कोकरे यांच्यापासून दूर रहातात. शरद ऋतूच्या अखेरीअखेरीस जेव्हा समागमाच्या काळाला सुरुवात होते, तेव्हा ते परत येऊन त्यांच्यात मिसळतात. मे आणि जून महिन्यांत पिल्ले जन्मतात. विण्याकरिता मादी निर्जन दरीचा आसरा घेते.

दातार, म. चिं.