आरूबेटे: इंडोनेशियाच्या मोल्यूकस प्रांतातील पूर्वेकडील द्वीपसमूह. हा पश्चिम न्यू गिनीच्या दक्षिणेस आहे. ६१०’ द. १३४ २०’ पू. क्षेत्रफळ ८,५५३ चौ. किमी. लोकसंख्या २९,६०४ (१९६१). या द्वीपसमूहात तानाबेसार या ९३ किमी. रुंद व १३४ किमी. लांब बेटाशिवाय १०० लहान बेटांचा समावेश होतो. चार आरपार खाड्यांमुळे तानाबेसारची ओकाम, कोला, कोब्रोअर, मैकूर व त्रांगान अशा पाच बेटांत विभागणी झाली आहे. पश्चिमेकडील वामार बेटावर डोबो ही राजधानी वसलेली आहे.

न्यू गिनीमधील भूभाग खचल्याने ही बेटे निर्माण झाली असावी. बेटे प्रवाळयुक्त चुनखडकांची, सखल व दाट जंगलयुक्त आहेत, किनारपट्ट्यात दलदली आहेत, केवडा, ताड, कनारी, नेचे या येथील वनस्पती असून त्रांगानमध्ये गवताळ मैदाने व किनाऱ्यावर कच्छवनश्री आढळते. बेटे आकर्षक रंगाच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहेत. सुंदर रंगीबेरंगी पिसाऱ्यांचे अनेक प्रकारचे पॅराडाइज पक्षी, कॅसोवरी, कबूतरे, काकाकुवा, पोपट, खंड्या हे पक्षी तसेच अँटइटर, कांगारू, वॅलाबी, बँडीकूट इ. प्राणी येथे आढळतात. भात, ऊस, मका, सॅगो, तंबाखू, नारळ ही येथील मुख्य पिके असून पोफळी आणि केवड्याची बने येथे आहेत.

लोक पापुअन-मलायन मिश्रवंशाचे आहेत. मोती, कासवाची कवचे, सुंदर पिसे, त्रेपांग (सीककुंबर), मोत्यासारखे चकाकणारे शिंपले यांसाठी ही बेटे प्रसिद्ध आहेत. १६०६ मध्ये डचांनी या बेटांचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात ही जपानकडे होती.

डिसूझा, आ. रे.