म्यूसे, आल्फ्रेद द : (११ डिसेंबर १८१०–२ मे १८५७) फ्रेंच कवी व नाटककार. फ्रान्सच्या उत्कृष्ट प्रेमकवींपैकी एक पॅरिस मध्ये जन्मला. तेथेच त्याचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. अठराव्या वर्षीच म्यूसे शार्ल नोद्ये या फ्रेंच लेखकाच्या तरुण स्वच्छंदतावादी कवी-मंडळाकडे ओढला गेला. सुरुवातीला इतर सर्व तरुण फ्रेंच कवींप्रमाणेच म्यूसे देखील व्हिक्टर ह्यूगो या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाच्या प्रभावाखाली होता. त्याचा पहिला कवितासंग्रह काँत देस्पान्य ये दिताली (इ. शी. रोमान्सेस ऑफ स्पेन अँड इटली) १८२९ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर मात्र त्याने इंग्रज कवी बायरन याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कविता व नाटके लिहिली. बायरनप्रमाणेच औपरोधिक शैली आणि उमरावी जीवनदृष्टी त्याच्याही लिखाणात दिसून येते. पोयेझी दि व्हेर्स (१८३१, इं. शी., इन्‌सिडेंटल पोएम्स) आणि ल् स्पॅक्ताक्ल दां झ्यून फोतय (१८३३, इ. शी. अ शो फ्रॉम ॲन इझी चेअर) हे त्याचे नंतरचे उल्लेखनीय नाट्य व नाट्यमय कवितासंग्रह आहेत. त्याचे पहिले नाटक ला न्युई व्हेनिसियॅन (१८३१, इ. शी., व्हेनिसियन नाइट) सुरुवातीस अयशस्वी ठरले. यानंतर त्याने आँ न बादीन पा आव्हॅक लामूर (१८३४, इं. शी. नो ट्रायफलिंग विथ लव्ह), लॉरेंझाचियो (१८३४) आणि इलन फो झुरे फो झुरे द्‌ ऱ्यँ (१८३६, इं. शी. वन नेव्हर कॅन टेल) ही चमकदार संवाद आणि गमतीदार पात्रप्रसंगांनी भरलेली नाटके लिहिली. त्या वेळची प्रसिद्ध फ्रेंच नटी मादाम ॲलां-देओ हिच्या प्रयत्नामुळे ही नाटके रंगमंचावर आली व यशस्वी ठरली. जॉर्ज सां द (खरे नाव बॅरोनेस दुदेव्हां) या फ्रेंच लेखिकेबरोबरचे त्याचे वादळी प्रेमप्रकरण, त्यांचा इटलीचा प्रवास, भांडण व वियोग या अनुभवातूनच त्याने ले न्युईं (१८३५–३७, इ. शी. द नाइट्‌स) ही अत्यंत सुंदर प्रेम कवितांची मालिका लिहिली. त्याचे आत्मचरित्माक लिखाण काँफेस्यों दांनांफा द्यु सियॅक्ल (१८३६, इं. शी. कन्फेशन्स ऑफ चाइल्ड ऑफ सेंच्युरी) हे ह्या अनुभवातूनच लिहिले गेले. १८५२ मध्ये अकादमी फ्रांसेजवर त्याची निवड झाली. म्यूसेची स्वच्छंदतावादी जीवनदृष्टी म्हणजे आदर्श जीवनानंदाचा शोध घेणे आणि तो न मिळाल्यास तितक्याच तीव्र दुःखात बुडून जाणे ही होती. मुळचीच अशक्त प्रकृती. त्यातून आत्यंतिक शरीरसुख व मद्यसेवन यांमुळे म्यूसे अकाली वयस्क झाला. पॅरिसमध्ये तो निधन पावला.

संदर्भ : 1. Sedgwick, Henry D. Alfred de Musset, 1932. Reprint, Kennikat, 1973.

            2. Sices, David, Theatre of Solitude The Drama of Alfred de Musset, Univ. Press of New England, 1974.

कमळकर, य. शं.