बार्ब्यूस, आंरी : (१७ मे १८७३–३० ऑगस्ट १९३५). फ्रेंच कादंबरीकार. पॅरिसजवळील आन्येअर या शहरी जन्म. शिक्षण सॉरबॉन विद्यापीठात. त्यानंतर पॅरिसमध्ये पत्रकार. आरंभी त्याने काव्यलेखन केले. ‘मोर्नर्स’(१८९५, इं.शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहावर फ्रेंच प्रतीकवाद्यांचा प्रभाव जाणवतो. पहिल्या महायुद्धात साधा सैनिक म्हणून फ्रेंच लष्करात शिरला. लढाईतील शौर्याबद्दल त्याला दोनदा सन्मानित करण्यात आले. तथापि युद्धातील दारुण अनुभवांमुळे तो कट्टर शांततावादी बनला. ल फ (१९१६, इं. भा. अंडर फायर, १९१७) ह्या त्याच्या कादंबरीत अशा अनुभवांचे अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी चित्रण केलेले आहे. या कादंबरीला फार मोठी लोकप्रियता मिळाली १९१७ मध्ये तिला गाँकूर पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट युद्धकादंबऱ्यांत ह्या कादंबरीची गणना आजही केली जाते. क्लार्ते (१९१९, इं. भा. लाइट, १९१९) ही त्याची आणखी एक युद्ध कादंबरी. कम्युनिस्ट पक्षाचा ते सदस्य होता. स्टालिनवर त्याने एक पुस्तकही लिहिले होते. (स्टालिन : ए न्यू वर्ल्ड सीन थ्रू वन मॅन, १९३५, इं. शी.). मॉस्को येथे तो निधन पावला.

 टोणगावकर, विजया