रॉस्तां, एदमाँ : (१ एप्रिल १८६८−२ डिसेंबर १९१८). फ्रेंच नाटककार. जन्म मार्से येथे. त्याचे वडील अर्थतज्ञ होते. ते कविकाही करीत. मार्से अकादमीचे ते सदस्य होते. आरंभीचे शिक्षण मार्से येथे घेतल्यानंतर रॉस्ता पुढील शिक्षणासाठी पॅरिसला आला. तेथे कॉलेज स्तानिस्लासमध्ये त्याने साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचा अभ्यास केला. पॅरिसमध्ये असतानाच तो लेखन करू लागला. ल् गां रूज (१८८८, इं. शी. द रेड ग्लव्ह) हे एकांकी प्रहसन त्याची पहिली नाटक नाट्यकृती होय. तथापि नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेणारे त्याचे पहिले नाटक म्हणजे ले रोमानस्क (प्रयोग−१८९४, इं. शी. द रोमॅन्सर्स−१८९९). ही एक स्वैर कल्पनारंजित अशी तीन अंकी सुखात्मिका आहे. प्रँसेस ल्वाँतॅन (प्रयोग−१८९५, इ. शी.द प्रिन्सेस फार अवे−१८९९) व ला सामोरितॅन (प्रयोग−१८९५, इं. शी. द वूमन ऑफ सामारिया−१९२३) ही त्याची त्यानंतरची नाटके. तथापि नाटककार म्हणून त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती सिरानो द बेर्जेराक (१८९८, इ. भा. १९२३) ह्या वीररसपूर्ण पद्य सुखात्मिकेवर. ह्या नाट्यकृतीचा पहिला प्रयोग १८९७ मध्ये झाला. क्षीण होत चाललेल्या स्वच्छंदतावादाचा तो शेवटचा स्फुल्लिंग होता. १९५० मध्ये या नाट्यकृतीवर बोलपट काढला गेला.

सिरानो द बेर्जेराक हा एक पराक्रमी योद्धा. असामान्य कल्पकता आणि बुद्धिमत्ता ह्यांची देणगी त्याला लाभलेली असली, तरी अवाढव्य नाकामुळे तो बेढब दिसत होता. प्रेमात तो असफल होतो. त्याचा मनाचा उमेदपणा मात्र मोठा असतो. ज्या स्त्रीवर तो प्रेम करीत असतो, तिच्या प्रियकराला तो सर्व प्रकारची मदत करतो. त्या प्रियकराच्या मृत्यूनंतर त्या स्त्रीलाही तो सतत साहाय्य करतो. तिच्याबद्दल त्याला त्याला वाटणारे प्रेमही तो मृत्यूशय्येवर असतानाच उघड करतो. वीर, शृंगार, करुण व हास्य अशा चारही रसांचे हृदयंगम मिश्रण एदमाँने ह्या नाट्यकृतीत केलेले आहे. फ्रेंच साहित्यातील ती एक अतुलनीय काव्यकृती म्हणून वाखाणली जाते.

लेग्लाँ (म. शी. गरुड−पुत्र, प्रयोग−१९०१) या नाट्यकृतीत त्याने नेपोलियनाचा पुत्र द्यूक द राइखश्टाट ह्याच्या जीवनाची शोकांतिका उभी केली आहे. ला दॅनिंयेर न्युई द दाँ ज्वां (प्रयोग−१९२२, इं. शी. द लास्ट नाइट ऑफ डॉन वॉन) हे त्याचे अखेरचे नाटक. तरल कल्पनाशक्ती आणि उत्कट काव्यात्मता ही त्याच्या नाट्यलेखनाची लक्षणीय वैशिष्ट्ये. फ्रान्समधील निसर्गवादी आणि प्रतिकवादी सादित्यिकांनी निर्माण केलेल्या वैफल्यग्रस्त वातावरण रॉस्तांने आपल्य प्रभावी नाट्यकृतींच्या द्वारा नवा उत्साह, नवी मूल्ये आणि नवा जीवनश्रद्धा ठेवल्या. १९०१ साली त्याला फ्रेंच अकादमीचे सदस्यत्व देण्यात आले.

पॅरिस येथे तो निधन पावला.

टोणगावकर, विजया