फ्रांस, आनातॉल :  (१६ एप्रिल १८४४ – १३ ऑक्टोबर १९२४). विख्यात फ्रेंच कांदबरीकार. मूळ नाव आनातॉल फ्रांस्वा तीबो. पॅरिसमध्ये जन्म. शिक्षण पॅरिसमधील ‘कॉलेज स्तानिस्लास’ ह्या प्रसिद्ध रोमन कॅथलिक शाळेत. त्याच्या वडिलांचा व्यवसाय पुस्तक विक्रीचा असल्यामुळे आपली वाचनाची आवड त्याला मनसोक्त पुरवता आली आणि स्वतंत्रपणेही बरेचसे ज्ञानार्जन तो करू शकला. ग्रीक-लॅटिन साहित्यकृतींचा शिस्तबद्ध अभ्यास त्याने केला. त्यातून मानवतावादी विचारांचे संस्कार त्याच्या मनावर झाले; तथापि प्रत्येक बाबतीत परिपूर्णतेचा ध्यासही त्याने घेतला आणि धर्मासकट विविध मानवी संस्थांविषयी त्याची वृत्ती संदेहवादी बनली.

आरंभी फ्रांसने काव्यलेखन केले. ‘पार्‌नॅसिअन’ ह्या कलावादी फ्रेंच काव्यसंप्रदायाचा प्रभाव त्याच्या कवितेवर दिसून येतो. घाटाचा काटेकोरपणा, वस्तुनिष्ठता आणि संयमित अभिव्यक्ती ही ह्या संप्रदायाच्या कवितेची काही वैशिष्ट्ये. पोॲम दॉरे (१८७३, इं. शी. गोल्डन टेल्स) हा फ्रांसचा काव्यसंग्रह त्या दृष्टीने लक्षणीय आहे.

फ्रांसची ल क्रीम द सिल्व्हेस्त्र बॉनार (इं. शी. द क्राइम ऑफ सिल्व्हेस्त्र) ही कादंबरी १८८१ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कादंबरीकार म्हणूनच त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली.  फ्रांसच्या संदेहवादी वृत्तीचा प्रत्यय ह्या कांदबरीतून येतो. भाषाशास्त्रज्ञ असलेला ह्या कांदबरीचा नायक सतत गोंधळलेला दिसतो. त्याच्या पुढील कादंबऱ्‍यांतून त्याच्या संदेहवादाचे क्षेत्र विस्तारत गेलेले दिसते. एका दरबारी गणिकेची जीवनकथा सांगणाऱ्या ताईस (१८९०) ह्या कादंबरीत त्याने चर्चचा उपहास केला, तर ला रोतसिरी द ला रॅन पेदोकमध्ये (१८९३, इं. शी. ॲट द साइट ऑफ द क्वीन पेदोक) गूढविद्येवर टीका केलेली आहे. लेझोपनिआँ द मस्य जेरोम क्वान्यारमध्ये (१८९३, इं. शी. द ओपिन्यन्‌स ऑफ मस्य जेरोम क्वान्यार) अठराव्या शतकातील फ्रान्सचे उपरोधपूर्ण चित्रण आढळते. जेरोम क्वान्यार हा फ्रांसचाच प्रवक्ता होय. लिस्त्वार काँतांपॉरॅन  (इं. शी. कंटेपररी हिस्टरी) ह्या कादंबरीत आपली मते बोलून दाखविण्यासाठी फ्रांसने मस्य बॅर्‌जरॅ ह्या व्यक्तीरेखेची निर्मिती केली. ह्या कादंबरीचे चार खंड असून त्यांची नावे अशी : लॉर्म द्यू माय (१८९७, इं. शी. द एल्म ट्री ऑन द मॉल); ल मानकॅं दोझिए (१८९७, इं. शी. द ॲमिथिस्ट रिंग) व मस्य बॅर्‌जरॅ आ पारी (१९०१, इं. शी. मस्य बॅर्‌जरॅ इन पॅरिस). पॅरिसमधील आपल्या समकालीन समाजातील विविध वर्गांचा संकुचितपणा, पूर्वग्रहदूषित दृष्टी यांसारख्या दोषांवर फ्रांसने ह्या कादंबऱ्यांतून टीका केलीच; परंतु, फ्रेंच सैनिकी वर्गही ह्या टीकेतून सुटला नाही. त्याच्या काळी फ्रान्समध्ये गाजलेल्या ⇨ ड्रायफस प्रकरणचा प्रभाव ‘मस्य बॅर्‌जरॅ इन पॅरिस’मध्ये स्पष्टपणे दिसून येतो. फ्रेंच लष्करातील एक निरपराध ज्यू अधिकारी आल्फ्रेड ड्रायफस ह्याच्यावर, जर्मनीला लष्करी गुपिते कळविल्याचा आरोप लादून फ्रेंच लष्करातील श्रेष्ठींनी त्याला तुरुंगात डांबले होते. ड्रायफसला न्याय मिळवून देण्यासाठी एमिल झोलासारख्यांनी जी चळवळ आरंभली होती, तीत फ्रांसही सहभागी झालेला होता. लाफॅर क्रॅंकबीय (१९०१, इं. शी. क्रेंकबीय अफेअर) ह्या कथेत, त्याचप्रमाणे क्रेंकबीय (१९०३) ह्या नाट्यकृतीमध्ये अन्यायाचा बळी ठरलेला क्रेंकबीयही ड्रायफसचे स्मरण करून देतो. ले दियझाँ स्वाफ (१९१२, इं. शी. द गॉड्स आर ॲथर्स्ट) ह्या रूपकात्मक कादंबरीत फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या दहशतवादाच्या काळाचे दशर्न घडविले असून हिंसाचाराचा निषेध केलेला आहे. लील दे पॅंग्वँ (१९०८, इं. शी. पेंग्विन आयलंड) ही फ्रांसची आणखी एक रूपकात्मक कादंबरी. मानववंशाचा इतिहास सांगण्याच्या मिषाने ह्या कादंबरीत परिपूर्ण मानवी समाजाची निर्मिती करावयास निघालेल्यांची टर फ्रांसने उडविलेली आहे .

फ्रांसने १८८६ ते १८९३ ह्या कालखंडात ल तां  (इं. शी. द टाइम) ह्या नियतकालिकासाठी लेख लिहिले. ह्यांतील आरंभीचे लेख वाङ्‌मयीन विषयांना वाहिलेले होते. तथापि हळूहळू चर्च आणि प्रस्थापित सामाजिक-राजकीय संस्थांवर धारदार टीका करणारे लेख तो लिहू लागला. ला व्ही लितेरॅर (४ खंड, १८८८–९२, इं. शी. ऑन लाइफ अँड लेटर्स) ह्या नावाने ल तांसाठी त्याने लिहिलेले काही लेख संगृहीत आहेत.

फ्रांसच्या अन्य लेखनात ल लिव्ह्र द माँ अमी (१८८५, इं. शी. माय फ्रेंड्स बुक) आणि ल पती प्येअर (१९१८, इं. शी. लिट्ल प्येअर) अशा स्मृतिचित्रांचा समावेश होतो.

फ्रांसची लेखनशैली मुख्यतः उपरोधप्रधान असली, तरी ती डौलदार आणि नादमधुर आहे. उत्तम शैली सात रंगांच्या एकात्मतेतून निर्माण होणाऱ्या शुभ्र प्रकाशकिरणासारखी असते;  ती संकुल असूनही साधीच भासते, अशा आशयाचे विचार फ्रांसने व्यक्त केले आहेत. ते त्याच्या भाषाशैलीच्या बाबतीत खरे ठरतात. त्याच्या हयातीत त्याला टीकेला तोंड द्यावे लागलेच; परंतु, त्याच्या आयुष्याच्या अखेरीस पश्चिमी जगात त्याच्याबद्दलचा आदर वाढीला लागला होता.

फ्रेंच अकादमीवर १८९६ मध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली होती. १९२१ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव जागतिक पातळीवर करण्यात आला. तूर येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Axelrad, Jacob, Anatole France A Life Without Illusions, 1844–1929, New York, 1944.

2. Jefferson, Carter, Anatole France : The Politics of Scepticism, New Brunswick, N. J., 1965.

3. Tyiden – Wright, David, Anatole France, New York, 1967.

4. Virtanen, Reino Anatole France, New York, 1968.

कुलकर्णी, अ. र.