स्यूली-प्य्रूदॉमस्यूली-प्य्रूदॉम ( रने फ्रांस्वा आर्मां ) : (१६ मार्च १८३९—७ सप्टेंबर १९०७). फ्रेंच कवी. जन्म पॅरिस येथे. रने फ्रांस्वा आर्मां प्य्रूदॉम हे त्याचे खरे नाव. ‘ स्यूली-प्य्रूदॉम ’ या नावाने त्याने काव्य-लेखन केले. स्वच्छंदतावादी फ्रेंच कवींच्या अतिरेकी भावविवशतेविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून अस्तित्वात आलेल्या ‘ ल पार्नास ’ या साहित्य संप्रदायाच्या महत्त्वाच्या सदस्यांपैकी तो एक. प्य्रूदॉमचा ओढा विज्ञानाकडे होता तथापि डोळ्यांचा आजार झाल्यामुळे त्याला विज्ञानाभ्यासाकडे जाता आले नाही. एका कारखान्याच्या कार्यालयात त्याने कारकुनाची नोकरी धरली तथापि १८६० मध्ये ती सोडून तो कायद्याचा अभ्यास करू लागला. त्याच्या आयुष्यात घडून आलेल्या प्रेमप्रकरणात तो अपयशी ठरला होता. १८६५ पासून तो काव्यलेखन करू लागला. उदास भाववृत्तीने भारलेल्या त्याच्या कवितांना या असफल प्रेमाचा संदर्भ आहे. Stances et poemes (१८६५) या त्याच्या काव्यसंग्रहात त्याच्या उत्कृष्ट कविता अंतर्भूत आहेत. ‘ द ब्रोकन व्हाझ ’ (१८६६, इं. शी. ), ‘ ट्रायल्स ’ (१८६६, इं. शी. ) आणि ‘ सॉलिट्यूड ’ (१८६९, इं. शी. ) ह्या संग्रहांतील कवितांमध्येही उत्कट भावव्याकुलता आहेच तथापि नंतरच्या काळात मात्र आत्मपरता टाळून ‘ ल पार्नास ’ च्या काव्यविचारांशी सुसंगत अशी वस्तुनिष्ठता त्याने आपल्या काव्यातून जोपासली. परिपूर्ण घाट हे ‘ ल पार्नास ’ चे आणखी एक वैशिष्ट्यही त्याच्या कवितांत आढळते. न्याय, सुख यांसारख्या अमूर्त संकल्पनाही त्याने आपल्या कवितेतून मांडल्या ( जस्टिस , १८७८, इं. शी. ‘ हॅपिनेस , १८८८, इं. शी. ). १८८१ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची निवड झाली. तसेच १९०१ सालचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.

स्यूली प्य्रूदॉमची कविता पुढे दुर्बोध होऊ लागली. १८७५ —१९०० या काळात त्याच्या कवितेला मिळालेला प्रतिसाद पुढे ओसरत गेला. फ्रान्समधील शाटने येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.