भैकेर: उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या वर्गातील प्राण्यांच्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या

भैकेर

पिल्लाला भैकेर म्हणतात. भैकेर ही या प्राण्यांची डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी पण प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) होय.

भैकेर दिसायला माशासारखा असतो. शरीराचे डोके, धड व शेपूट असे तीन भाग असतात. डोक्यावर दोन ठळक डोळे व मुख असते. जबडे श्रृंगी असून शेवाळ खरवडून खाण्याकरिता त्यांचा उपयोग होतो. डोक्याच्या खालच्या भागावर सुरुवातीला वनस्पतींना चिकटण्याकरिता चूषक असतो पण तो पुढे नाहीसा होतो. उदरात आंत्राची (आतड्याची) स्प्रिंगेप्रमाणे दिसणारी वेटोळी असतात. श्वसनाकरिता सुरुवातीला डोक्याच्या मागे बाह्य क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) तीन जोड्या असतात. नंतर त्यांच्या जागी आंतरक्लोम उत्पन्न होतात. शेपटी दोन्ही बाजूंनी चपटी व पातळ असून तिच्या साह्याने भैकेर पाण्यात पोहतो. काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी भैकेराचे रूपांतरण (डिंभावस्थेपासून प्रौढावस्था तयार होत असताना रूप व संरचना यांत होणारे बदल) होऊन प्रौढ प्राणी तयार होतो.

उभयचरांपैकी सपुच्छ जलस्थलचरांमध्ये डिंभ व प्रौढ यांत विशेष फरक नसतो आणि यांच्या रूपांतरणात मुख्यतः क्लोम, क्लोमकक्ष आणि शेपटीच्या चूडायुक्त कडा नाहीशा होतात. बेडूक, भेक वगैरेंचा भैकेर त्यांच्या प्रौढापेक्षा अगदी भिन्न असतो. याचे रूपांतरण जलद होऊन त्यात सगळ्या अंगाची पुनर्रचना होते. बहुतेक भैकेर पाण्यात राहतात. काही जातींत त्यांचा विकास जनकाच्या शरीरात, शरीरावर किंवा स्वतंत्रपणे होतो.

क्षीरसागर, व. ग.