कानिटकर,काशीबाई : (१८६१-१९४८). मराठीतील आरंभीच्या स्त्री-कादंबरीकारांपैकी एक. जन्म सांगली जिल्ह्यातील अष्टे या गावी. शालेय शिक्षण त्यांना मिळू शकले नाही तथापी त्यांचे पती कवी गोविंद वासुदेव कानिटकर यांच्या उत्तेजनाने घरीच विद्याभ्यास करून त्यांनी इंग्रजी व मराठी या भाषांचे चांगले ज्ञान मिळविले. हरिभाऊ आपट्यांशी या पती-पत्नींचा जिव्हाळ्याचा संबंध होता.

काशीबाई कानिटकर

काशीबाई कानिटकर

रंगराव (१९०३), पालखीचा गोंडा (१९२८), या त्यांच्या कादंबऱ्या. यांपैकी रंगराव ही विशेष प्रसिध्द आहे. तत्कालीन कादंबरी लेखनाचे पाल्हाळादी दोष त्यांच्या कादंबरी लेखनातही आढळत असले, तरी त्यांतील सफाईदार भाषाशैली, वेधक स्वभावचित्रण आणि तत्कालीन स्त्रीजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण लक्षणीय आहे. शेवट तर गोड झाला (१८८९). आणि चांदण्यातील गप्पा (१९२१), हे त्यांचे कथासंग्रह. यांतील बऱ्याच कथा बोधवादी स्वरूपाच्या आहेत. त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांचे परीश्रमपूर्वक लिहीलेले चरित्र (१८९१), मराठी चरित्रवाङ्‌मयात महत्वपूर्ण ठरले आहे. जे. कृष्णमूर्तींच्या ॲट द फीट ऑफ द मास्टर या पुस्तकाचे भाषांतर गुरूपदेश (साधन-चतुष्टय), या नावाने केले (१९२७). यांशिवाय काशीबाईंनी मनोरंजन, नवयुग, विविधज्ञानविस्तार या नियतकालिकांतून स्फुट लेखनही केले आहे. त्यापैकी विविधज्ञानविस्तारात त्यांनी हरी नारायण आपटे यांचे आठवणीवजा लिहिलेले चरित्र विशेष प्रसिद्ध आहे. त्या थिऑसॉफिस्ट होत्या. त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे काशी येथे ब्रह्मचिंतनात घालवली.

जगताप, बापुराव