अंकुशकृमि रोग : तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी’ असे म्हणतात. या कृमीमुळे मनुष्याला होणाऱ्‍या रोगाला अंकुशकृमी रोग म्हणतात. हा रोग उष्णकटिबंधात जास्त प्रमाणात आढळतो. हा कृमी केसासारखा असून सु. एक सेमी. लांब असतो. याच्या माथ्यावरील तोंडात आकड्यासारखे चार दात असतात. या आकड्यांमुळे तो आतड्याच्या श्लेष्मकलेला (आतल्या थराला) चिकटून तेथून रक्त शोषून घेत असल्यामुळे रोगोत्पत्ती होते. 

या कृमीच्या अंड्यामध्ये दोन किंवा चार कोशिका असतात. अंडी मलावाटे बाहेर पडून त्याच्यापासून दमट मातीमध्ये डिंभ (अळ्या) तयार होतात. हे डिंभ त्या मातीवरून चालाणाऱ्या मनुष्याच्या पायाच्या त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. त्वचेतील रक्तवाहिन्यांमधून नीलांवाटे फुप्फुसात जातात. तेथून वर सरकून कफावाटे ग्रसनीतून (घशातून) गिळले जाऊन आतड्यात पोचतात, तेथे त्यांची वाढ पूर्ण होते. आतड्यात नर आणि मादी यांच्या समागमापासून उत्पन्न होणारी (‘निषेचित’) अंडी मलावाटे बाहेर पडतात आणि या प्रकारे अंकुशकृमीचे जीवनचक्र पुरे होते. 

लक्षणे : डिंभाचा त्वचेत प्रवेश होतेवेळी पायाला, विशेषत: बोटांमधील बेचक्यांना, खाज सुटून फोड येतात. फुप्फुसांमधून जात असताना खोकला, कफ आणि ज्वर ही लक्षणे दिसतात. एकाच वेळी शेकडो, हजारो कृमी आतड्यात असल्यामुळे व ते वारंवार जागा बदलत असल्यामुळे आतड्यातून पुष्कळ रक्त शोषले जाते आणि श्लेष्मकलेतून वहात रहाते. त्यामुळे ⇨पांडुरोग होतो. रक्तातील रक्तनुरागी (लाल रंग घेणाऱ्या) श्वेतकोशिकांचे प्रमाण वाढते व लोहाचे प्रमाण कमी होते. चिरकारी (फार काळ टिकणाऱ्या) विकारात तंत्रिकाविकृती (संज्ञावाहक तंतूंची विकृती) होते. 

चिकित्सा : टेट्राक्लोरोएथिलीन अथवा बायफिनियम-हायड्रॉक्सिनॅप्‌थोएट ही औषधे खास गुणकारी आहेत.

देवधर, वा. वा.