मध्ययुग, यूरोपीय : इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा दिली जाते. इ.स.४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत झाला आणि इ.स.१४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलचे पतन झाले व पूर्व रोमन साम्राज्याही संपुष्टात आले. या दोन्ही घटनांचे यूरोपवर महत्वाचे व दूरगामी परिणाम झाले. पहिलीने मध्ययुगाचा प्रारंभ व दुसरीने त्याचा अंत झाला, असे इतिहासकार मानतात. 

मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन लेखकांनी रूढ केली. रोमन साम्राज्यांनंतरचा सु. हजार वर्षाचा इतिहास प्रबोधनकाली विशेष ज्ञात नसल्याने मध्ययुगाला तमोयुग असेही म्हटले जाते.

इ.स.पाचव्या शतकाच्या अखेरीस भूमध्य समुद्राच्या परिसरातील ग्रीस, इटली इ. देशाचे महत्व कमी होऊन तीन नवीन संस्कृतिकेंद्रे विकसित झाली. पहिले कॉन्स्टँटिनोपलचे पूर्व रोमन साम्राज्य. यालाच ⇨वायझंटिन साम्राज्य म्हणतात. या भागात प्राचीन ग्रीक-रोमन संस्कृतीचा प्रभाव विशेष घटला नाही. दुसरे इस्लामच्या उदयाने अरबस्तानात निर्माण झाले व नंतर भारत, उत्तर आफ्रिका, स्पेन इ. भागांत त्याचा प्रभाव पडला. तिसरे केंद्र इटली व फ्रान्समध्ये रोमन साम्राज्याचा विध्वंस करणाऱ्या गॉल टोळ्यांच्या प्रयत्नाने उदयास आले व कालांतराने याचा प्रभाव सर्व यूरोपभर पडला. मध्ययुगीन यूरोपचा इतिहास प्रामुख्याने या तिसऱ्या केंद्राच्या प्रभावाने घडला. इ.स.५०० ते १००० या पाचशे वर्षात या नव्या संस्कृतीची वीजे यूरोपात रूजली व पुढील पाचशे वर्षात यांच्या शाखआ विस्तारल्या.

राजकीय स्थित्यंतरे : रोमन साम्राज्य व ख्रिस्ती धर्म या दोन संघटनांद्वारे प्राचीन काळी यूरोपीय ऐक्य साधण्याचे प्रयत्न झाले. परंतु दळणवळण व वाहतूक साधनांच्या अभावामुळे अतिविस्तारलेल्या साम्राज्याचे शासन चालविणे कठीण झाल्याने पूर्व व पश्चिम असे साम्राज्याचे दोन भाग पडले. काँन्स्टँटिनोपलचे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च व रोमचे रोमन कॅथलिक अशी दोन पीठे निर्माण झाली. तरीही धार्मिक व राजकीय एकतेचे उद्दिष्ट दृष्टीआड झाले नाही.

रानटी टोळ्यांशी झगडता झगडता इ.स.४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट झाले. तथापि रोमन साम्राज्याच्या एकतेचे कार्य पुढे चालविण्याची जबाबदारी बायझंटिन साम्राज्याला पेलता न आल्याने पश्चिम साम्राज्याची प्रतिष्ठा त्याला केव्हाच लाभली नाही.साहजिकच यूरोपच्या राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी काही शतके भरून निघाली नाही.

रोमन साम्राज्यांच्या पतनानंतर तीन शतके यूरोपभर अंगल्स, सॅक्सन, ज्यूट, ऑस्ट्रोगॉथ, व्हिसीगॉथ, फ्रँक, हूण इ. टोळ्या निरनिराळ्या भागांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात गुंतल्या होत्या . या टोळ्यांत सतत संघर्ष चालू होते. या संघर्षामुळे सामान्य जनांच्या जीवितवित्तास सुरक्षितता राहिली नव्हती. त्यामुळे मध्ययुगाचे वर्णन करणाऱ्या लेखकांपुढे बेबंदशाहीचा कालखंड उभा राहतो. ह्या अराजकाचा फायदा अरब, तुर्क इ. इस्लामी जमातींना मिळून त्यांचे साम्राज्य उत्तर आफ्रिकेत व स्पेनमध्ये पसरले. मध्य यूरोपात स्लाव्ह टोळ्यांनी आपले बस्तान बसविले. पश्चिम यूरोपीय देशांत फ्रँक टोळीने आपले आसन स्थिर केले. उत्तर इटलीत लोंबार्ड टोळीचे बस्तान बसले. तर अँगल्स, सॅक्सन, ज्यूट इ.टोळ्यानी इंग्लंड काबीज केले. स्कॉटलंड, आयर्लंड ,वेल्स यांत मूळच्या केस्ट जमातीचे वर्चस्व राहिले. [⟶ अँग्लो-सॅक्सन].

वरील टोळ्यांपैकी फ्रँक टोळीचे वर्चस्व वाढले व त्यांचा नेता क्लोव्हिस (कार. ४८१-५११) याने गॉलमध्ये (फ्रान्स) एक प्रबल राज्य स्थापन केले. पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीत क्लोव्हिसच्या राज्याची सरहद्द र्हाकईन नदीपलीकडे गेली. याच्याच कारकीर्दीत फ्रँक टोळीने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. क्लोव्हिसचे वारस दुर्बल निघाल्याने खरी सत्ता कर्तबगार मंत्र्यांच्या हाती गेली. या मंत्र्यापैकी शार्ल मार्तेल (कार.७१४-७४१) याने इ.स. ७३२ मध्ये तूरच्या लढाईत भूर लोकांचा पराभव करून यूरोपवरील इस्लामी आक्रमणास पायबंद घातला. पुढे शार्ल मार्तेलचा मुलगा पेपिन द शॉर्ट (कार.७१४-६८) याने क्लोव्हिसच्या वंशजांना (मेरोव्हिंजिअन वंश) बाजूस सारून गॉलचे राज्य बळकावले. ही क्रांती पोपच्या अनुमतीने झाली. पेपिननेही धर्मगूरू म्हणून पोपच्या अधिकारास मान्यता दिली व लोंबार्ड टोळ्यांविरूध्द पोपला लष्करी साहाय्य देऊन मध्य इटलीत पोपचे राज्य स्थापण्यात यश मिळविले. साहजिकच पेपिन व त्याचे वारस यांना धर्मपीठाचा पाठिंबा मिळाला व पेपिनच्या कॅरोलिंजिअन वंशाची प्रतिष्ठा वाढली.

पेपिनचा मुलगा चार्ल्सच्या वेळी गॉलच्या राज्याचे पवित्र रोमन साम्राज्यात रूपांतर झाले. हाच चार्ल्स किंवा चार्ल्स द ग्रेट पुढे ⇨शार्लमेन (कार. ७६८-८१४) म्हणून मध्ययुगात प्रसिध्दीस आला. २५ डिसेंबर ८०० रोजी पोप तिसरा लिओ याने सम्राटाचा मुकुट त्याच्या मस्तकी ठेवून पवित्र रोमन सम्राट म्हणून त्यास मान्यता दिली  या घटनेने यूरोपच्या एकतेचे स्वप्न साकार होऊन पश्चिम रोमन साम्राज्याची पुन्हा स्थापना झाल्याचा भास झाला. पण सरंजामशाहीतील फुटीर प्रवृत्ती ,धर्मसंस्था व राजसंस्था यांच्यातील संघर्ष यांच्यात वाढ होऊन त्यामधून विद्यमान यूरोपची जडणघडण झाली. शार्लमेनच्या निधनसमयी त्याचा मुलगा लूई व फेथफुल (कार.८१३-४०) हयात असल्याने कॅरोर्लिजिअन रिवाजानुसार साम्राज्याची विभागणी होण्याचा प्रसंग टळला. स्वतःलूईने साम्राज्य अविच्छिन्न रहावे. म्हणून कॅरोलिंजिअन वारसाचा कायदा बदलून वडील मुलाकडेच राज्याचा वारसा जावा, असा प्रयत्न केला. पंरतु त्याच्या मुलांनी याविरूध्द बंड केल्याने इ.स.८४३ च्या व्हर्डनच्या तहाने राज्याची विभागणी पुढीलप्रमाणे झाली. (१) चार्ल्स द बाल्डला पश्चिम फ्रँक राज्य-र्हााईनच्या पश्चिमेकडील मुलूख (आधुनिक फ्रान्स) (२) लूई द जर्मन याला पूर्व फ्रँक राज्य (आधुनिक जर्मनी व ऑस्ट्रीया) व (३) पहिला लोथेअर याला सम्राटपद व मध्य फ्रँक राज्य (आधुनिक उत्तर इटली, अँल्सेस –लॉरेन, बर्गडी व हॉलंड). लोथेअरनंतर त्याच्या मध्य फ्रँक राज्याचे आणखी तीन भाग होऊन इटली आणि मध्य यूरोपात अनेक राज्ये निर्माण झाली. अशा रीतीने शार्लमेननंतर अर्ध शतकात या साम्राज्याची अनेक शकले झाली. इ.स.९११ मध्ये कॅरोर्लिजिअन वंशातील शेवटचा राजा लूई द चाइल्ड निधन पावला व त्याचे राज्य ९१९ पर्यंत फ्रँकोनिआचा ड्यूक कॉनरॅड याजकडे व नंतर ९३६ पर्यंत सॅक्सनीचा ड्यूक हेन्री याजकडे गेले. हेन्रीने मध्य यूरोपातील अस्थिरतेला आळा घालून एक नवी प्रबल सत्ता स्थापन केली. हेन्रीचा मुलगा पहिला ऑटो मोठा कर्तबगार निघाला. त्याच्या नेतृत्वाखाली शार्लमेनच्या पवित्र रोमन साम्राज्याचे पुनरूज्जीवन झाले. (९३९). 

इ.स. नवव्या शतकात यूरोपवर मूर, मग्यार, हंगेरियन व व्हायकिंग किंवा नॉर्स या रानटी टोळ्यांची आक्रमणे सुरू झाली. रोमन साम्राज्यावर आक्रमण करणारे गॉथ-फ्रँक –हून वगैरे जसे पुढे सुसंस्कृत बनले, तसेच ते याही टोळ्यांच्या बाबतीत घडले. कालांतराने या नव्या टोळ्यापैकी मग्यार आणि व्हायकिंग टोळ्यांनी हंगेरी, इग्लंड ,फ्रान्स, इ. देशांत वसाहती स्थापन केल्या . त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला पण हे स्थित्यंतर होण्यास दोन –अडीच शतकांचा अवधी लागला आणि या काळात यूरोपात सतत धामधूम चालत राहिली.


ऑटोला इ.स.९३६ मध्ये राजपद प्राप्त झाले. तेव्हा त्याला (१) रानटी मग्यार टोळ्यांचे आक्रमण थोपवून धरणे .(२) बंडखोर सरदारांना नमवून शासन सुस्थिर करणे आणि (३) व्हर्डनच्यातहाने लोथेअरकडे आलेला इटलीतील मुलुख पुन्हा जर्मन, स्वाभित्वाखाली आणणे, अशी तीन प्रमुख उद्दीष्टे साधावयाची होती. इ.स.९५५ मध्ये लेखफेल्टच्या लढाईत त्याने मग्यारांचा पराभव केला आणि त्यांच्या शिरकावाला यूरोपात पायबंद घालण्यासाठी पूर्वेकडे आपले राज्य रशियापर्यंत वाढविण्याचा चंग बांधला. यातूनच भावी काळातील जर्मन –स्लाव्ह वंशांचा दीर्घकालीन संघर्ष उदभवला. नंतर बंडखोर सरदारांना त्याने युध्द करूनच वठणीवर आणले. परंतु यामुळे नवीन राजवटीला स्थिरता येण्यासारखी नव्हती. मध्यवर्ती सत्तेशी एकनिष्ठ राहील व शासनयंत्रणा सुसूत्रपणे चालू ठेवील. असा नवा सरदारवर्ग ऑटोला हवा होता. धर्मसंस्थेतील अधिकारीवर्ग निष्ठावान, कार्यक्षम आणि कर्तव्यतत्पर असतो,  अशी त्याची समजूत होती. म्हणून बिशपादी धर्माधिकार्यांसस जमिनी देऊन त्यांच्यावर राज्य कारभाराचे काम त्याने सोपविले. ऑटोच्या या धोरणामुळे जर्मनीतील बिशपादी धर्माधिकारी राजसेवकच झाले आणि त्यांच्या पाठिंब्यावर ऑटोची सत्ता जर्मनीत स्थिरावली. 

व्हर्डनच्या तहाने लोथेअरकडे असलेला इटलीतील मुलूख जिंकून घेतल्याशिवाय साम्राज्याला पूर्णत्व नाही, अशी ऑटोची समजूत होती. कॅरोलिंजिअनांच्या आपसांतील संघर्षामुळे इटली देश विस्कळित झाला होता. शिवाय इस्लामी व मग्यार आक्रमणांनी जनता त्रस्त झाली होती. स्थानिक सरंजामदारांच्याजाचाला खुद्द पोपही कंटाळला होता. ऑटोचा पाठिंबा मिळविण्याच्या हेतूने पोपने त्याला पाचारण केले. तेव्हा इ.स.९५१ मध्ये ऑटोने इटलीवर स्वारी केली. व बराच मुलूख जिंकून घेतला . पुढे पोप बारावा जॉन याने त्यास पवित्र रोमन सम्राट म्हणून अभिषेक केला. (इ.स.९६२) शार्लमेनच्या अभिषेकापेक्षाही ऑटोच्या अभिषेकाला अधिक महत्व देऊन पवित्र रोमन साम्राज्याची खरी पुनःस्थापना याच प्रसंगी झाली, असे कित्येक इतिहासकार मानतात. ऑटो आणि त्यानंतरच्या सम्राटांनी फ्रान्स व यूरोपच्या अन्य भागांवर आपली सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र बहुतेक सम्राटांनी साम्राज्यातील इटली वगैरे देशांतील हितसंबंधांकडे जितके लक्ष पुरविले तितके जर्मन हितसंबंधाकडे पुरविले नाही. परिणामतः यूरोपातील बहूतेक देशांत राष्ट्र-राज्ये निर्माण होऊन ती सोळाव्या –सतराव्या शतकांपर्यंत स्थिरावली, तथापि जर्मन एकीकरण तसेच इटलीचे एकीकरण व स्वातंत्र्य साधण्यास पुढे आणखी दोन शतकांचा काळा लोटला.

ऑटोतर्फे इटलीत आपले आसन स्थिर करवून घ्यावे, एवढाच त्याला पाचारण करण्यात पोपचा हेतू होता. तथापि धर्मगुरीचा अधिकार धार्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित असावा व त्याने सामान्यता राजसत्तेच्या आश्रयानेच रहावे, असे ऑटोचे मत होते.

पोप जॉन बारावा याला हे पटेना, म्हणून ऑटोने त्याला पदच्युत केले व स्वतःला अनुकूल अशा पोपची म्हणजे आठव्या लिओची निवड करविली आणि बादशाहच्या संमतीशिवाय कोणत्याही पोपची यापुढे निवडच होऊ नये ,असा नियम त्याने मान्य करून घेतला. ऑटोनंतरच्या सु ८०-८५ वर्षाच्या काळात त्याच्या वंशातील एकूण पाच सम्राटांनी त्याच्या ध्येय धोरणांचा पाठपुरावा केला.

फ्रान्समधील क्लूनी येथील मठाच्या प्रभावाने इ.स.च्या दहाव्या –अकराव्या शतकांत धर्मसंस्थे अनेक सुधारणा होऊन ती प्रबल होऊ लागली होती. धर्मसंस्थेवर वर्चस्व ठेवण्याच्या सम्राटांच्या धोरणास कसून विरोध करण्याची नीती धर्मगुरीनी अवलंबिलेली होती. दहावा पोप लिओ याच्या कारकीर्दीत धर्मपीठाची प्रतिष्ठा पुष्कळच वाढली.

ऑटोच्या वंशातील सम्राटपद इ.स.११५२ मध्ये होएनटाऊफन घराण्याकडे राहिले. या घराण्याचा मूळ पुरूष पहिला फ्रेड्रिक (फ्रेड्रिख बारबरॉसा). सम्राटांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने बादशहाच्या खाजगी जमिनी वाढविल्या, तसेच सरंजाम सरदारांवर अवलंबून न राहता मुलकी नोकरशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमुख राजनिष्ठ सरदारांना विस्तृत अधिकार व जमिनी देऊन त्याने त्यांचा पाठिंबा मिळविण्याचे धोरण अंमलात आणले. धर्मपीठावर नियंत्रण ठेवण्याचे ऑटोचे धोरणच याने पुढे चालविले. इटलीतील नवोदित स्वायत्त व्यापारी शहरांवर नियंत्रण ठेवण्याच्या त्याच्या प्रयत्नास कसून विरोध होऊन तेथे अनेक बंडे झाली. पोप तिसरा अलेक्झांडर विरूध्द गेल्याने फ्रेड्रिकने त्यास पदच्युत करून दुसरा पोप निवडला. हा झगडा सु. वीस वर्षे चालला. शेवटी इ.स. ११८३ च्या कान्स्टन्सच्या तहाने उभय पक्षांत तडजोड झाली.

फ्रेड्रिकचा मुलगा सहावा हेन्री ह्याचा वारस दुसरा फ्रेड्रिक हा अज्ञान होता. अल्पवयीन सम्राटाचा पालक म्हणून तिसऱ्या इनोसंट पोपने भावी सम्राट धर्मपीठास सर्वथा अनुकूल राहील व सम्राटाची सत्ता प्रबल होऊ नये, म्हणून जर्मनीतील अंतर्गत यादवी वाढेल असे प्रयत्न चालू ठेवले. इ.स. १२१२ मध्ये दुसऱ्या फ्रेड्रिकला सम्राटपद प्राप्त झाले. जर्मनीतील धर्मसंस्थेची सूत्रे पोपच्या स्वाधीन करून फ्रेड्रीकने त्याच्या वर्चस्वास एक प्रकारे मान्यताच दिली. परंतु पोपच्या अपेक्षेप्रमाणे तो धर्मपीठाच्या हातचे बाहुले बनला नाही.

फ्रेड्रिकच्या मृत्यूनंतर इ.स. १२७३ मध्ये सम्राटपद हॅप्सबर्ग घराण्याकडे आले. ते पाचशे वर्षे राहिले. या घराण्याने ऑस्ट्रेयाचे राज्य मिळविल्याने त्याची प्रतिष्ठा पुढे वाढली. पण सम्राटपद अखेरपर्यंत दिखाऊच राहिले. रोमन साम्राज्याचा वारसा सांगणाऱ्या ह्या पवित्र रोमन साम्राज्यांची अशी अखेर होऊन यूरोपीय एकतेचे ध्येय असाध्य झाले ते कायमचेच.

फ्रेड्रिकचे सिसिलीराज्य इ.स. १२६६ मध्ये फ्रान्सचा शार्ल आंजू याजकडे गेले. मध्य व उत्तर इटलीत अनेक लहानलहान राज्ये निर्माण झाली. पूर्वेस स्लाव्ह वंशाची राज्ये व पश्चिमेस फ्रान्स, इंग्लंड इ. राष्ट्रराज्ये स्थापन होऊन आधुनिक यूरोपच्या राजकीय व्यवस्थेस प्रारंभ झाला. 

मध्य यूरोपात सम्राटाविरूध्द संस्थानिकांचा संघर्ष इटलीत लहान लहान जहागीरदारांचा स्वतंत्र राहण्याचा आग्रह जर्मनी ,फ्रान्स ,स्पेन, इंग्लंड इ. देशातील प्रस्थापित राजसत्तेविरूध्द अमीरउमरावांनी केलेली बंडे या घटनांनी मध्ययुगीन यूरोपचा इतिहास भरलेला आहे. मध्ययुगाच्या अखेरीस अनेक देशांत एक नवीन प्रकारची शासनसंस्था राष्ट्र-राज्य उदयास आली. प्रादेशिक भाषांचा विकास, व्यापारी आणि मध्यम वर्गाचा उदय, नव्या शहर राज्यांची स्थापना इत्यादींतून देशांत एकतेची भावना वाढीस लागली व प्रादेशिक अभिमान बळावला. या प्रादेशिक अभिमानाचा लाभ घेऊन सामान्यांच्या पाठिंब्यावर शासन संस्था उभारणारे , काळाची पावले अचूक ओळखणारे लोकनेते यूरोपातील अनेक देशांत जन्मले व त्यांनी निरनिराळी राष्ट्र-राज्ये स्थापन केली.

फ्रान्स : शार्लमेनच्या विस्तृत साम्राज्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे विद्यमान फ्रान्स, व्हर्डनच्या तहाने (इ.स.८४३) हा प्रांत शार्लमेनचा नातू चार्ल्स द बाल्डला मिळाला. इ.स.च्या दहाव्या शतकात हा कॅपेट हा फ्रान्सचा राजा झाला. काही संरजामी सरदारांचे इंग्लंडमधील राजघराण्याशी नाते होते. वारसाहक्कामुळे फ्रान्सचा काही मुलूख इंग्लंडकडे होता. राज्यसंस्था व धर्मसंस्था यांचा संघर्ष इंग्लंडशी झालेले ⇨शतवार्षिक युध्द यामुळे व धर्म युध्दामुळे सरंजामदारांचे पतन, प्रबल राजसत्तेचा उदय व स्टेटस जनरल या प्रातिनिधक संस्थेची स्थापना या फ्रान्सच्या मध्ययुगीन इतिहासातील काही ठळक घटना होत.


इंग्लंड : इ.स. पहिल्या शतकात ⇨जूलिअस सीझरने ब्रिटिश बेटे रोमन अंमलाखाली आणली, तेव्हा तेथे केल्ट जमातीची वस्ती होती. इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकांत अँगल्स, सॅक्सन, ज्यूट इ. रानटी टोळ्यांनी या बेटावर हल्ले चढवून आपली लहानलहान राज्ये स्थापन केली. वरील सर्व जमातींच्या व अकराव्या शतकात आलेल्या नॉर्मन लोकांच्या संकराने विद्यमान ग्रेट ब्रिटन किंवा इंग्लडमधील समाज तयार झाला. 

फ्रान्समधील नॉर्मन टोळाचा पुढारी ⇨विल्यम द काँकरर (कार. १०६६-८७) याने इ.स. १०६६ मध्ये हेस्टिंगच्या लढाईत हॅरल्ड राजाचा पराभव करून इंग्लंडचे राज्य बळकाविले. नॉर्मन काळातच इंग्लंडमध्ये सरंजामशाहीचा प्रसार झाला. या घराण्यातील दुसऱ्या हेन्रिच्या कारकीर्दीत पंचप्रथा (ज्युरी पध्दत) न्यायदानात रूढ झाली व जॉनच्या (कार. ११९९-१२१६) वेळी ⇨मॅग्ना कार्टा (१२१५) ही हक्काची सनद मिळून ब्रिटनमध्ये लोकशाहीचा पाया घातला गेला. 

इ. स. १२६५ मधील सायमन डी माँटफर्डने बोलाविलेली लोकप्रतिनिधींची बैठक आणि १२९५ मधील ] पहिल्या एडवर्डंची आदर्श संसद यांमुळे  इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीची कल्पना रूजली. या कल्पनेचा विकास होऊन चौदाव्या शतकात हाउस ऑफ कॉमन्स (कनिष्ठ गृह) व हाउस ऑफ लॉर्ड् स (वरिष्ठ गृह) या दोन संसदेच्या गृहांची स्थापना झाली.

इतर यूरोपीय देशांप्रमाणेच मध्ययुगीन इंग्लंडमध्येही सरंजामदारांचे प्राबल्य होते. परंतु पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धातील गुलाबांच्या युध्दात (वॉर ऑफ रोझेस) प्रमुख सरदार घराणी दुर्बल झाली व लँकेस्टर घराण्यातील हेन्री ट्यूडर (कार.१४८५-१५०९) यास इंग्लंडचे राजपद मिळाले. याच्या कारकीर्दीपासूनच इंग्लंडमध्ये अर्वाचीन युग सुरू झाले. 

स्पेन पोर्तुगाल : येथील लोक केल्ट, फिनिशियन, रोमन, व्हिसी गॉथ यांच्या संमिश्रणाने झालेले आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकात स्पेन इस्लामी आक्रमणाला बळी पडला. तेथे अरब साम्राज्यातील मूर लोकांचे राज्य स्थापन झाले. मूर लोकांच्या संपर्कामुळे स्पॅनिश लोकांचा खूप फायदा झाला व विद्या-कला इत्यादीत पुष्कळ प्रगती झाली. मूर लोकांच्या जुलमी राजवटीविरूध्द स्पॅनिश लोकांनी अनेकदा बंडे केली व कालांतराने तेथे पोर्तुगाल, कॅस्टील, अँरगॉन इ. राज्ये स्थापन झाली. दक्षिणेकडील ग्रेनेडा प्रांत मात्र अरब अंमलाखालील राहिला. इसवी सनाच्या पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात कॅस्टीलच्या इझावेला. राणीचे अँरगॉनच्या फर्डिनांट राजाशी लग्न होऊन ही राज्ये एक झाली .पुढे ग्रेनेडा प्रांतही फर्डिनांटने जिंकून घेतला व स्पेनचे राज्य स्थापन झाले.

इतर राज्ये : इंग्लड –फ्रान्सप्रमाणेच डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, पोलंड, ऑस्ट्रीया, हंगेरी, रशिया ही राष्ट्र-राज्येही मध्ययुगाच्या अखेरीस उदयास येऊन यूरोपचे अर्वाचीन युगात पदार्पण झाले.

नगरराज्ये : नगरराज्य ही राजकीय संघटना ग्रीकांच्या वेळे पासूनच प्रचलित होती. मध्ययुगात जेनोआ, व्हेनिस, फ्लेरेन्स ही नगरराज्ये व्यापारामुळे इटलीत प्रसिध्दीस आली. वरवर पाहाता येथील राज्य व्यवस्था लोकशाही स्वरूपाची वाटली, तरी खरी सत्ता नगरांतील काही प्रतिष्ठित घराण्यांकडेच असल्याने यांना उमरावशाही राज्ये म्हणण्यास काहीत हरकत नाही. पूर्वेकडील देशांशी व आफ्रिकेशी यांचा व्यापार असल्याने या नगरराज्यांना प्रबल आरमार ठेवणे अपरिहार्य झाले. त्यांच्या प्रयत्नामुळे नौकानयन शास्त्राची पुष्कळ प्रगती होऊन पंधराव्या शतकातील भौगोलिक शोधांस त्यांचे साहाय्य झाले.

मध्ययुगीन धर्मसंस्था : मध्ययुगाच्या प्रारंभी रोमन साम्राज्याचा एकमात्र धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माला मान्यता मिळून बरीच वर्षे झाली होती. आशिया, आफ्रिका, व यूरोप खंडात पसरलेल्या या धर्माचे प्रमुख अधिकारी प्रांतोप्रांती राहून धर्मसंस्थेचा कारभार पहात व धर्मप्रसाराचे कार्य करीत. प्रारंभी विविध देशांतील बिशपांचा दर्जा समान होता. पुढे रोमन बिशपचे महत्व खूपच वाढले आणि पोप हे नाव केवळ रोमच्या बिशपलाच लावण्याची प्रथा पडली, तथापि कॅल्सिडॉन (इ.स.४५१) परिषदेत रोम व कॉन्स्टँटिनोपल येथील बिशपचा दर्जा समान राहिल, पूर्व व पश्चिमेकडील बिशप अनुक्रमे कॉन्स्टँटिनोपल व रोमच्या बिशपला आपला प्रमुख मानतील, अशी तडजोड झाली. मात्र रोमच्या बिशपने हा निर्णय मानण्यास नकार दिला. कालांतरांने दोन्ही पीठांत तात्विक मतभेद होऊन कॉन्स्टँटिनोपलचे सनातनी धर्मपाठ व रोमचे विश्वव्यापी उदारमतवादी धर्मपीठ असे दोन प्रमुख गट निर्माण झाले. कॉन्स्टँटिनोपल येथील पीठाला ग्रीक व रोमन पीठाला लॅटिन चर्च असेही संबोधण्यात येऊ लागले. 

मध्ययुगाच्या पूर्वार्धात अँगल्स , सॅक्सन, व्हीसीगॉथ ,फ्रँक, लोंबार्ड इ. जमातींनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. धर्मतत्वातील विसंगती काढून टाकून धर्मसंस्थेच्या कायदेकानूंना व्यवस्थित रूप देण्याचे कार्यही याच कालखंडात झाले. या काळात धर्मसंस्थेला मोठी प्रतिष्ठा लाभलेली होती. वैयक्तिक तथा सामाजिक जीवनाच्या अंगोपांगांवर धर्मगुरूंचे नियंत्रण असून कायद्याने व पंरपरेने धर्मपीठाला अनेक अधिकार प्राप्त झालेले होते. व्यक्तीला जीवनातील विवाह, वारसा, अज्ञानपालन, मृत्यूपत्र इ. विषयांवरील निर्बंध व कायदे धर्मसंस्थेच्या कक्षेत येत व प्रचलित धार्मिक विधिनियमांनुसार अशा बाबतीतील वादांचा निर्णय होई. धर्मबाह्य वर्तन करणाऱ्याला बहिष्कृत करण्याचा हक्क धर्मसंस्थेकडून वारंवार बजावला जाई . त्याला राजाही अपवाद नसे. राज्यसंस्थेपेक्षा धर्मसंस्था श्रेष्ठ आहे, असा सामान्य जनांचा समज होता. परंतु प्रत्यक्षात धर्मसंस्था व राज्यसंस्था यांचे कार्येक्षेत्र निश्चितपणे ठरलेले नव्हेत. धर्मसंस्था प्रबल व राज्यसंस्था दुर्बल अशी स्थिती होती. तेव्हा दोहोंच्या अधिकारक्षेत्राच्या अनिश्चिततेमुळे संभ्रण निर्माण झाला. तर त्यामुळे संघर्ष वाढला नाही. परंतु जसजसे राज्यसंस्थेचे कार्यक्षेत्र विस्तृत होत गेले. तसतसे आपले अधिकार संकुचित झाल्याची जाणीव धर्मगुरूंना होऊ लागली. साहजिकच राजसत्तेचा विस्तारास धर्मगुरू जोराचा विरोध करीत. मध्ययुगीन सरंजामशाहीत धर्मगुरूंनाही सरंजाम मिळू लागल्याने राज्यसंस्था व धर्मसंस्था यांच्यातील संबंध अधिकच गुंतागुंतीचे झाले आणि त्यामुळे दोहोंत दीर्घकालीन संघर्ष उदभवला. 

धर्मपीठाच्या कारभारात आपले महत्व वाढावे, म्हणून अनेक शासकांनी धर्मगुरूंना सरंजाम देण्याचे धोरण सर्रास स्वीकारले होते. कालांतराने बिशपांची नेमणूकही राज्यकर्त्याच्या मर्जीनुरूप होऊ लागली. हिल्डेब्राड याची पोप सातवा ग्रेगरी म्हणून नियुक्ती झाली. (इ.स.१०७३) धर्मपीठात आमूलाग्र सुधारणा करून त्याने परंपरागत प्राप्त झालेले सर्व अधिकार मिळवावयाचेच असे ठरविले आणि ह्या अधिकारचिन्हप्रदानाच्या बाबतीत धर्माधिकार्यां च्या अधिकारांकडे दुर्लक्ष होऊ नये, असा आग्रह धरला. त्यातूनच सम्राट व पोप यांच्यात संघर्ष उदभवला.याशिवाय सम्राट व पोप यांच्या दर्जाविषयी वाद होताच. पोपच्या निवडणुकीस सम्राटाची मान्यता आवश्यक मानली जाई. उलट सम्राटाच्या मस्तकी मुकूट ठेवण्याचा मान पोपचा अशी समजूत असल्याने, पोप स्वतःला सम्राटापेक्षा श्रेष्ठ समजत असे. पोपची निवडणूक करणारे धर्माधिकारी मंडळ त्याने स्थापन केले. पोपच्या निवडणुकीत शासनाचा हस्तक्षेप होऊ नये, अशी व्यवस्ता केली. ग्रेनरीच्या या सुधारणांमुळे सम्राटाला चिंता वाटू लागली. कारण यापुढे पोप स्वतंत्र होणार, राज्यकर्त्याचा प्रभाव त्याच्यावर राहणार नाही. याची त्याला स्पष्ट जाणीव झाली. सम्राटाच्या संभाव्य विरोधाची पर्वा न करता ग्रेगरीने इ.स.१९७५ मध्ये बिशपांना अधिकारचिन्हे अर्पण करण्याचा आधिकार राज्यकर्त्याना नाही, असा हुकूम काढला व बरेच दिवस धुमसत असलेल्या पोपविरूध्द सम्राटाच्या संघर्षाला तोंड फुटले. सम्राट चौथा हेन्री (कार.१०५६-११०६) याने पोपला असा हूकूम काढण्याचा अधिकार नाही, असे जाहीर केले व पोपच्या आज्ञेविरूध्द धर्मगुरूंना अधिकारचिन्हे  अर्पण करण्याचा सपाटा चालविला. सम्राटाच्या बंडखोरीवर जालीम उपाय म्हणून पोपने चौथ्या हेन्रीला बहिष्कृत केले व अन्य कोणाचीही सम्राट म्हणून निवड करावी, असा सरंजामदारांना आदेश दिला. पोपचा विरोध नष्ट केल्याशिवाय सम्राटपदी आपण स्थिर नाही. अशी मनाशी खूणगाठ बांधून हेन्रीने पोपची समजूत काढण्याचे ठरविले व तो मुत्सुद्दीपणा दाखवून इटलीतील कानॉसा गावी अनवाणी गेला. पोपने सम्राटास पापमुक्त केले व पुनित होऊन सम्राट जर्मनीस परतला. पोपच्या जर्मन समर्थकांची यामुळे मोठी निराशा झाली. पण धर्मसंस्थेचा नैतिक विजय झाला. सम्राटाने धर्मपीठाचे श्रेष्ठत्व मान्य केले. असाच त्याच्या शरणागतीचा व्यावहारिक अर्थ होता.


यानंतर जर्मनीस आल्यावर हेन्रीने बंडखोर सरदारांचा समाचार घेतला व लगेच इटलीवर स्वारी केली आणि प्रत्यक्ष रोमचा कब्जा मिळविला. पोप ग्रेगरीला पदच्युत करून त्याच्या जागी तिसऱ्या क्लेमेंटची निवड करविली. पुढे पदच्युत ग्रेगरी ख्रिस्तवासी झाल्याने सम्राटास अंतिम विजय मिळाल्याचा आभास झाला. मात्र प्रत्यक्षात सम्राटास अंतिम विजय मिळाल्याचा आभास झाला. मात्र प्रत्यक्षात सम्राटाचीही प्रतिष्ठा गेली व धर्मसंस्था ही दुर्बल झाली. याचा फायदा संरजामी सरदारांनी घेतला. ते सम्राट किंवा पोप यांना न जुमानता मन मानेल तसा कारभार करू लागले. शेवटी इ.स.११२२ मधील वर्म्झच्या तहाने या प्रकरणी तडजोड झाली.

बर्म्झच्या तहाने धर्मसंस्था व राज्यसंस्था यांच्यातील संघर्ष काही काळ स्थगित झाला. परंतु कायमचा मिटला नाही. कारण खरा वाद दोहोंत श्रेष्ठ कोण हाच होता. धर्मपीठाचा प्रमुख व मध्य इटलीतील काही संस्थानांचा अधिपती असल्याने पोप राजकारणापासून अलिप्त असणे शक्य नव्हते. आपणास धर्मपीठाचे धोरण अनुकूल असावे, म्हणून आपल्या पसंतीचा पोप निवडून आणण्यासाठी यूरोपातील अनेक शासक प्रयत्नशील असत. उलट देशोदेशींच्या राज्यकर्त्याचा धर्मपीठाला पाठिंबा असावा म्हणून कित्येक पोपही प्रयत्नशील असत. यांतूनच प्रस्थापित पोपला बाजूस सारून प्रतिस्पर्धी पोपशासन स्थापन झाल्याचे किंवा एखाद्या राजाला पदच्युत करून पोपला अनुकूल उमेदवाराची राजपदी नियुक्ती झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. उदा. तिसरा इनोसंट पोपपदी असताना त्याने धर्मकारणापेक्षा राजकारणाकडे अधिक लक्ष देऊन आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. [⟶ पोप शासन] . 

देशोदेशींच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याच्या प्रवृत्तीमुळे धर्मपीठाला आपले उत्पन्न वाढविणे अपरिहार्य झाले. निरनिराळ्या देशांवर धर्मसंस्थेसाठी विविध कर लागू करून आपली गरज भागविण्याचा धर्मपीठाने प्रयत्न करताच त्याला विरोध होऊ लागला. उलट देशोदेशींच्या राज्यकर्त्याना वाढत्या शासकीय गरजा भागविण्यासाठी पैसा पुरेना. तेव्हा विशेषतः इंग्लंड-फ्रान्समध्ये धर्मगुरूंच्या मालमत्तेच्या कर लादण्यास सुरूवात झाली. यामुळे पोप आठवा बॉनिफेस (कार. १२९४-१३०३). आणि फ्रेंच सम्राट फिलिप द फेअर यांच्यांत तंटा उदभवला.

पोपची राजधानी सु. बहात्तर वर्षे फ्रान्समध्ये अँव्हीन्यों. येथे होती. फ्रान्समधील अज्ञानवास संपतो न संपतो तोच धर्मपीठाची दोन शकले झाली. नंतर चाळीस वर्षे इटलीत एक व फ्रान्समध्ये दुसरा पोप असे दृश्य दिसले. काही देश एकाला मानीत तर काही दुसऱ्याला. शेवटी कॉन्स्टन्सच्या परिषदेने पांचवा मार्टिन यास पोप म्हणून निवडले व उभय पक्षांची याला मान्यता मिळून हे भांडण मिटले.धर्मपीठाची संघटना व ख्रिस्ती धर्माच्या तत्वज्ञानाचा विकास या कार्याबरोबर धर्मसंस्थेने शिक्षणकलादी सांस्कृतिक क्षेत्रांत महत्वाचे कार्य केले. या कार्यात प्रस्थापित धर्मपीठाला विविध मठांचे मोठेच सहाय्य झाले. 

अध्यात्मिक उन्नतीसाठी व मानवसेवेसाठी तळमळणाऱ्या व्यक्तींच्या प्रयत्नातून मठांची संघटना झाली. मठांच्या कार्याचे महत्व जाणून धर्मसंस्थेनेही त्यांना मान्यता देऊन प्रोत्साहन दिले. बेनेडिक्टीन, सिस्टरशन, फ्रॅन्सिस्कन, क्लूनियाक, डोमिनिफक हे प्रमुख मठ मध्ययुगाच्या उत्तरार्धात संघटित झाले . त्यांपैकी इटलीतील माँते कस्सीनो येथील बेनेडिक्टीन मठाचे विशेष महत्व आहे. 

फ्रान्समधील क्लूनी येथे अँक्किटेनच्या ड्यूकने इ.स. ९१० साली क्लूनियाक मठाची स्थापना केली. धर्माचा गाढा व्यासंग, धर्मसंस्थेतील दोषांची जाणीव व ते दूर करण्याची तळमळ, मानवी जीवन धर्माच्या बंधनानी नियंत्रित असावे, ही शिकवण या मठाची वैशिष्ट्ये सांगण्यासारखी आहेत.

सिस्टरशन मठाचा प्रमुख हाच क्लेव्होंचा बर्नाड याने व्यक्तीच्या आत्मिक शुध्दीवर भर दिला. दुराचारी पाद्यांची धर्मंसंस्थेतून हकालपट्टी व्हावी, म्हणून याने मोठी चळवळ केली. ख्रिस्ती धर्मसेवेसाठी याने दुसऱ्या धर्मयुध्दाच्या पुरस्कार केला.

डॉमनिक हा स्पॅनिश साधू (११७०-१२२१) डॉमिनिकन मठाचा संस्थापक होता. मठवासियांनी धर्माच्या तत्वज्ञानाचे तसेच विधिनियमांचे सखोल ज्ञान मिळवून पाखंडीपणाला आळा घालावा, या मताचा त्याने पुरस्कार केला. मठांच्या इतिहासात फ्रान्सिस ऑफ अँसिसी (आसीझी) यास आगळेच स्थान आहे. ख्रिस्तसदृश जीवन, त्याग व सेवेचा अखंड ध्यास, धर्मतत्वांचे सखोल ज्ञान, रसाळ पण विवेचक विवरण या गुणांमुळे सेंट फ्रान्सिस प्रख्यात आहे. यूरोप, आफ्रिका, आशिया खंडातील कित्येक देशांत या फ्रॅन्सिस्कन गटाने धर्मप्रचाराचे व लोकसेवेचे कार्य करून ख्रिस्ती धर्माची फार मोलाची सेवा केली. पुरूषांप्रमाणे स्त्रियांचेही बरेच मठ स्थापण्यात आले. धर्माच्या अभ्यासाव्यतिरिक्त शैक्षणिक व वैद्यकीय सेवाशुश्रुषा ही कामे मठातील जोगिणी करीत. बहुतेक सर्वच स्त्रीपुरूष मठवासियांना ब्रम्हचर्य, वरिष्ठांची आज्ञा पाळणे वगैरे समान नियम पाळावे लागत.

संघटित आणि शिस्तबध्द मठांव्यतिरिक्त कोणत्याही संघटनेत न राहता व्यक्तिशः धर्मसेवेचे व्रत घेऊन इतस्ततः भटकणारे सन्यासी मध्ययुगात पुष्कळच होते. संघटित संस्थांचा पाठिंबा नसूनही त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराचे व लोकसेवेचे पुष्कळच कार्य केले.

मठांना धर्मपीठाचा पाठिंबा असल्याने त्यांचे कार्य सुकर झाले. पण धर्मसंस्थेच्या शिस्तीत न बसणारे बॉल्डेनसीझ, अँल्बिजेनसीझ आदी मठही या काळात उदयास आले. एकंदरीत धर्मसंस्थेच्या प्रयत्नाने व वरील मठांच्या कार्याने मध्ययुगात ख्रिस्ती धर्माचा प्रसार यूरोपभर होऊन यूरोपची एकता साधण्याच्या बाबतीत फार मोठे कार्य झाले. [⟶ मठ] .

धर्मसंस्थेत हळूहळू अनेक दोष शिरले. संपत्ती व अधिकार यांमुळे धर्मगुरूंचे जीवन विलासी व दुराचारी बनले. स्त्रीपुरूषांच्या मठांतही अनाचार माजला. देशी भाषांच्या विकासामुळे ज्ञानप्रसार सुलभ झाला. विचारवंतांना धर्मसंस्थांतील अनेक दोष दिसू लागले. या विचारवंतांपैकी इंग्लंडमधील जॉन विक्लिफ हा ऑक्सफर्ड विद्यापीठात धर्मशास्त्राचा प्राध्यापक होता. त्याने बायबलचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे महत्कार्य केले. प्रत्येकाने बायबलच्या अध्ययनावरून आपले आचरण ठरवावे. असे त्यांने प्रतिपादन केले. धर्मसंस्थांतील अनाचारावरही सडकून टीका केली. धर्मसुधारणेच्या शुक्रतारा म्हणऊन त्याच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते. विक्लिफच्या प्रभावाने बोहीमियातील प्राध्यापक ⇨यास हुस याने धर्मसंस्थांतील अनेक प्रकारावर टीका केली. कॉन्स्टन्सच्या परिषदेने त्यास पाखंडी ठरवून जिवंत जाळण्याची शिक्षा देण्यात आली. अशा सुधारणावाद्यांच्या कार्याने पुढील काळातील धर्मसुधारणांचा पाया घातला गेला.


आर्थिक स्थिती : मध्ययुगीन यूरोपीय जीवनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे सरंजामशाही होय. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर निर्माण झालेल्या बेबंदशाहीत ही पदवी जवळजवळ सर्व यूरोपभर पसरली व मान्यताही पावली. सरंजामीपध्दतीचे स्वरूप राजकीय, सामाजिक व आर्थिक असे त्रिविध होते. काहीतरी सेवेच्या मोबदल्यात एखाद्या समर्थ व्यक्तिचा आश्रय मिळविण्याची प्रथा रोमन काळात रूढ झाली. दुर्बलाने प्रबलाचा आधार मिळवावयाचा व त्याच्याकडून प्राप्त होणाऱ्या सुरक्षिततेच्या मोबदल्यात त्याची एकनिष्ठपणे सेवा करावयाची असे या पध्दतीचे मूळ स्वरूप होते. शेती हा मानवाचा आद्य उद्योग व उपजीविकेचे एकमात्र साधन असल्याने अशा व्यवहारात जमिनीच्या माध्यमाचा उपयोग अपरिहार्य झाला हे उघडच आहे. यावरून श्रेष्ठकनिष्ठ दर्जा असणाऱ्या सामाजिक समूहांची उतरंड, परस्परांतील सेव्यसेवकभाव व तदंगभूत जमिनीची वाटणी ही सरंजामशाहीची लक्षणे असल्याचे दिसून येईल. या सामाजिक उतरंडीतील श्रेष्ठतम स्थान शासनप्रमुख राजाचे असे व तळाशी राजाच्या वरीष्ठ जमीनदाराची कुळे असावयाची .देशातील सर्व जमीन राजाच्या मालकीची असे. वैयक्तिक निष्ठेचा व लष्करी सेवेचा मोबदला म्हणून त्याने जमिनीचा काही भाग निरनिराळ्या सरदारांत वाटन द्यावयाचा . अशा सरदारांना प्रमुख कुळ अशी संज्ञा असे. या वर्गात राजाचे प्रमुख सरदार व आर्चबिशप असत. बिशप हे धर्मसंस्थेतील प्रमुख अधिकारी असत. ही प्रमुख कुळे राजाकडून मिळालेल्या जमिनीचा काही भाग उपकुळात वाटून देत व त्यांच्याकडून लष्करी सेवा व अन्य काम करून घेत. त्यांना कौंट, व्हायकौंट,बॅरन अशा संज्ञा असत.ही दुय्यम कुळेही वरीलप्रमाणेच आपल्या जमिनीचे वाटप करीत .आवश्यकतेनुसार राजा आपल्या प्रमुख सरदारांना लष्करासहा कामगिरीवर बोलावी. साधारणतः वर्षातून ४० दिवस लष्करी सेवा करण्याचा करार असे व प्रमुख सरदार आपापल्या उपकुळासंह सेवेला हजर होत.सेवेचा मोबदला म्हणून या जमीनदारांस जमिनीची उत्पन्न मिळे व आपापल्या मुलूखांत- जहागिरीत प्रशासन व न्यायदान यांचे हक्क प्राप्त होत. जमिनीप्रमाणे इतर धनोत्पादक साधनांचीही वाटणी करण्याच्या करारावर सरंजामी संबंध प्रस्तापित करणे शक्य होते. पवन चक्क्या , पाणचक्क्या, टोलनाकी, रस्ते , पूल यांच्या उत्पन्नाची वाटणी केल्याची किंवा एखाद्या जंगलातील मध गोळा करण्याच्या हक्काच्या वाटणीवर सरंजामी संबंध प्रस्थापित झाल्याची अनेक उदाहरणे तत्कालीन इतिहासात नमूद आहेत.

हळूहळू सरंजामी करार विशिष्ट विधिनियमानुसार होऊ लागले. समर्पण, निष्ठेची शपथ (प्रतिज्ञा) व स्वीकृती असे तीन विधी या करारासाठी आवश्यक झाले. समर्पण ,पतिज्ञा व स्वीकृती यांतून स्वामी व सेवक यांच्यातील हक्ककर्तव्याची निर्मिती होई. कुळाचे व त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्याची, आपल्या जहागिरीत कार्यक्षम प्रशासन प्रस्थापित करण्याची व न्यायनिवाड्यातील व्यवस्थआ करण्याची जबाबदारी स्वामीची व निष्ठेने सेवा करण्याचे कर्तव्य सेवकाचे, असे परस्पर हक्ककर्व्यांचे स्वरूप होते. कालांतराने ह्यांना वंशपरंपरागत स्वरूप आले. तात्कालिन गरजांतून उदभवलेल्या ह्या करारांना अपरिवर्तनीय नैतिक अधिष्ठान प्राप्त होऊन सर्व समाजच सरंजामी झाला. एकूण सरंजामी पध्दतीत मालकाला सर्व प्रकारचा लाभ व अल्प कर्तव्य, तर सेवकाला सर्व प्रकारे आर्थिक तोशीस व अल्प हक्क अशी हक्क-कर्तव्यांची विभागणी होती.

सरंजामीपध्दत ही मुख्यतः राजकीय होती. सैध्दांतीक दृष्ट्या राजा हा सर्वश्रेष्ठ स्वामी असे. प्रत्यक्षात मात्र सरंजामी समाजातील राजाची परिस्थिती समाधानकारक नव्हती. गरजेनुसार प्रमुख सरदारांनी ससैन्य राजसेवेसाठी उपस्थित रहावे, असा करार असला, तरी त्याचे पालन क्वचितच होई. एकतर राजसत्ता दुर्बल राहण्यातच सरदारांचा फायदा असे. दुसरे असे की प्रमुख सरदारही आपापल्या जमिनी आपल्या अनुयायांत वाटत असल्यामुळे प्रमुख कुळे व उपकुळे यांच्या तील संबंध अत्यंत गुंतागुंतीचे झाले आणि परस्परविरोधी हितसंबंध निर्माण होऊन निष्ठानिष्ठांतील संघर्ष होण्याचे अनेक प्रसंग उदभवले.

व्यापारउदीम वाढल्यामुळे निरनिराळ्या देशांत प्रबल मध्यमवर्ग उदयास आला. शांतता सुव्यवस्था राहण्यातच व्यापारवृध्दी व तज्जन्य उत्कर्ष शक्य असल्याने या नव्या वर्गाचे सरदारांच्या विरूध्द राजसत्तेला उचलून धरले. [⟶ सरंजामशाही, यूरोपीय].

धर्मयुध्दे ,मध्य यूरोपातील विविध संघर्ष , इंग्लंड, फ्रान्समधील शतवार्षिक युध्द,  इंग्लंडमधील दीर्घकालीन गुलाबांची युध्दे इत्यादीमुळे अमीर-उमरावांच्या सत्तेस मोठाच धक्का बसला. बंदुकीच्या दारूसारख्या शोधामुळे सरदारांचे कोटकिल्ले पूर्वीइतके अभेद्य राहिले नाहीत. वस्तुविनिमयाच्या ऐवजी पैशाचा वापर होऊ लागल्याने पगारी सैन्य उभारणे शासनाला शक्य होऊ लागले. यामुळे सरंजामी सरदारांचे प्राबल्य क्रमशः कमी होऊन यूरोप खंडात राष्ट्र-राज्ये उदयास आली. साहजिकच सरंजामशाहीची पीछेहाट व प्रबल केंद्रीय राजसत्तेचा उदय हे मध्ययुगाच्या अंताचे व अर्वाचीन युगाच्या उदयाचे प्रमुख लक्षण ठरले.

सरंजामपध्दतीचा धर्मसंस्थांवरही मोठा परिणाम झाला. धर्मसंस्थेच्या विस्तृत जमिनी होत्या. राजकर्त्यानी देणगी म्हणून दिलेल्या जमिनीव्यतिरिक्त सामान्य नागरिकही धर्मसंस्थेला जमिनीच्या देणग्या देत.राज्यकर्त्याकडून जमिनी मिळाल्याने धर्मगुरूही सरंजामदार झाले. सरंजामदारांच्या हक्ककर्तव्याची बंधने त्यांनाही आपोआपच लागू झाली. साहजिकच निव्वळ धार्मिक कर्तव्ये मागे पडली. धर्मसंस्थेतील अधिकारपदांचा दुरूपयोग होऊ लागला. पोपच्या निवडणुकाही राजकीय दृष्टीने होऊ लागल्या. धर्मकारण व राजकारण यांची मोठीच गल्लत होऊन अनेक देशांत गोंधळ माजला.

गढ्यांच्या (फोर्ट्रेस) विकास हे मध्ययुगीन सरंजामी जीवनपध्दतीचे एक प्रमुख अंग आहे. रोमन साम्राज्याच्या अखेरीस सुरक्षिततेसाठी एखाद्या उमराव्यांच्या किल्लेवजा वाड्याचा आश्रय घेण्याची प्रवृत्ती वाढली. अशा रीतीने एखाद्या प्रबल उमरावाच्या वाड्याभोवती एकत्र राहणाऱ्या स्वंयपूर्ण मानवगटांच्या वस्त्या निर्माण झाल्या. या जीवनपध्दतीला जमिनदारी किंवा वाडीपध्दत (द मनॉरीअल सिस्टिम) म्हणत. आवश्यकतेनुसार सुपीक, जमीन, कुरणे, जंगले व पाणीपुरवठा जेथे उपलब्ध असेल, तेथे एखाद्या प्रबल उमरावांच्या आश्रयाने त्याची कुळे राहू लागली. वाडीच्या जमिनीपैकी दुसरा किंवा तिसरा हिस्सा जमीन उमरावांची असे. वाडीकर उमरावाच्या सर्व जमिनींची मशागत कुळांनाच करावी लागे. या शेतीवर श्रम करणाऱ्या श्रमिकांत स्वतःची मुळीच जमीन नसणारे भूदासही होते. कुळांना आठवड्यातील ठराविक दिवस मालकाच्या शेतीवर राबावे लागे. सुगीच्या हंगामात मालकाची कामे विनामूल्य करावी लागत. शिवाय आपल्या उत्पन्नापैकी ठराविक हिस्सा मालकाला द्यावा लागे. वाडीतील रहिवाशांतील भांडणतंट्यांचा निकाल वाडीकर उमरावाच्या न्यायालयात होई. एकूण वाडीतील जीवन संकुचित ,स्थिर व संथ असे. मध्ययुगाच्या उत्तरार्धात शहरांचा विकास होऊ लागला. शेतीच्या नव्या पध्दती अंमलात आल्या. व्यापार व्यवसाय वाढला. ,राष्ट्र-राज्यांचा विकास होऊ लागला व हळूहळू ही वाडीपध्दत लुप्त झाली.


सांस्कृतिक प्रगती :  मध्ययुगीन समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने एकूण तत्कालीन संस्कृतीचे स्वरूप ग्रामीण होते. दळणवळणाची साधने अविकसित व वाहतुकीच्या सोयीही नाममात्र होत्या. साहजिकच व्यापउद्दीम अगदी प्राथमिक अवस्थेत होता धर्मसंस्थेचा विरोध हा व्यापारवृध्दीच्या मार्गातील एक मोठा अडथळा होता आणि व्यापारीवर्गात समाजात फारशी मान्यता नव्हती. मध्ययुगाच्या उत्तरार्धात धर्मयुध्दामुळे ही स्थिती काहीशी पालटली. हजारो नागरिकांचा व अमीर-उमरावांचा धर्मयुध्दामुळे मध्यपूर्वेशी संबंध आला. अनेक उपभोग्य वस्तूंची त्यांना माहिती झाला. पूर्वी अप्राप्य असलेल्या कित्येक वस्तूंची यूरोपात आवक होऊ लागली. मागणी वाढल्यामुळे या वस्तूंचा व्यापार वाढली. विनिमयासाठी नाण्यांचा उपयोग, वाढत्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पेढ्यांची वाढ, दळणवळाची व वाहतुकीची सुधारलेली साधने व राज्यसंस्थेकडून व्यापारीवर्गाला मिळणारे उत्तेजन यांमुळे मध्ययुगाच्या अखेरीस यूरोप खंडाच्या आर्थिक स्थितीत बदल झाला. कृषिप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थआ हळूहळू मागे पडून व्यापारी शहरी जीवनाचा विकास होऊन शहरांची वाढ होऊ लागली. इटलीत व्हेनिस, जेनोआ, पीसा, बोलोन्या, मिलान, फ्ल्रारेन्स, फ्रान्समध्ये तूलूझ ,मार्से, नॉबॉर्न, उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्राच्या परिसरात हँबर्ग, ब्रेमेन, ल्यूबेक, इंग्लंडमध्ये लंडन अशी अनेक शहरे अकराव्या –तेराव्या शतकाच्या दरम्यान विकसित झाली. या बदलाने महत्वाचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम झाले.

वायापारीवर्गाने संघटित प्रयत्न केले. तरच शहराचे संरक्षण सुसाध्य होते. अशा संघटित प्रयत्नातूनच शहराशहरांच्या स्थानिक संस्थांतून प्रातिनिधित शासनाचे प्राथमिक प्रयोग झाले व आधुनिक युगातील अनेक लोकशाही संकेताचा उगम झाला. शहरांच्या शासनात नव्या व्यापारी वर्गाचे महत्व वाढून नवा अभिजनवर्ग अस्तित्वात आला. या वर्गाने आपल्या नागरी संघटनातून व्यापाराचे नियंत्रण ,शहरांचे संरक्षण ,कायद्याची निर्मिती, कर आकारणी, न्यायालयीन कार्यपध्दती वगैरे अनेक महत्वाचे विषय हाताळले व भावी काळातील शासनकर्त्याना उपयुक्त ठरणाऱ्या अनेक प्रथा प्रचारात आणल्या. व्यापार विस्ताराबरोरबर नवेनवे प्रश्नही  उत्पन्न होऊ लागले व एका शहरी संघटनेऐवजी शहरांचे संघ स्थापून सामुदायिक रीत्या आपल्या अडचणीवर मात करण्याची कल्पना प्रसृत होऊन कित्येक शहरांचे यूरोपातील हॅन्सीयॉटिक संघ. हँबर्ग व ल्यूबेक या शहरांनी परस्परांच्या संरक्षणासाठी इ.स. १२४१ मध्ये स्थापन केलेला संघच पुढे हॅन्सीयॉटिक संघ म्हणून प्रसिध्दीस आला. या संघाने स्वतःचे सैन्य व आरमार उभारून चाचेगिरीविरूध्द युध्दच पुकारले आणि अपघातात सापडलेल्या खलाशांना संरक्षण देण्याच्या योजना आखल्या. लंडन, नॉव्हगरॉडसारख्या दूरदूरच्या शहरांत व्यापारी केंद्रे स्थापन केली व बाल्टीक समुदावरील सर्व व्यापारावर स्वतःचे नियंत्रण बसविले. यूरोपीय साम्राज्यावादाचे हे प्राथमिक स्वरूप समजण्यास हरकत नाही. 

व्यापारी व सावकारी पेशांना धर्मसंस्थेचा तात्विक विरोध असल्याने या व्यावसायिकांना समाजात विशेष मानाचे स्थान नव्हते. संघटित झाल्यास व्यवसाय सुलभपणे चालेल, हे जाणून या वर्गाने आपल्या संघटना उभारल्या. त्यांना व्यापारी श्रेणी म्हणजे महाजन संघ किंवा श्रेणी असे नाव आहे. बाजाराची एकूण संघटना, खरेदीविक्रीचे नियम, मालाचा दर्जा व भाव नियंत्रण ,नियमभंगाबद्दल शिक्षा इ. विषयांबद्दल नियमोपनियम करून त्याची अंमलबजावणी करण्याची काम श्रेणीच्या कार्यकारी मंडळाचे असे व ही कार्यकारी मंडळे सभासदांनी निवडलेली असत. व्यावसायिकांच्या श्रेण्या आपापल्या धंद्यांचे शिक्षण देण्याची व्यवस्था करीत. श्रेणीच्या मान्यतेशिवाय कोणताही व्यवसाय करणे शक्य नसल्याने व शिक्षणाशिवाय अशी मान्यता सामान्यतः नसल्याने प्रत्येक इच्छुकाला धंद्याचे शिक्षण घ्यावे लागे व ते प्रत्यक्ष त्या धंद्यातील एखाद्या व्यावसायिकाकडे उमेदवारी करूनच घ्यावे लागे. उमेदवारीची मुदत संपली म्हणजे उमेदवार मालकाच्या हाताखाली व्यवसाय करण्यास पात्र समजला जाई. अशा व्यक्तीना जर्नीमन म्हणत. या अनुभवेच्छू उमेदवारांना कामाची अल्प मजुरीही मिळे. स्वतंत्र व्यवसाय करण्याची पात्रता आपणात आहे. हे दाखविण्यासाठी अशा अनुभवेच्छूला आपले कसब सिध्द तरण्यासाठी नमुना म्हणून एखादी वस्तू तयार करावी लागे. नमुन्याची वस्तू परीक्षक मंडळाच्या कसोटीत उतरल्यास उमेदवारास स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी मिळे व मग तो श्रेणीचा सभासद होण्यास पात्र समजला जाई.

वरील संघ केवळ विशिष्ट धंद्यातील मजुरांचे किंवा मालकांचे नसत, तर व्यवसायाशी निगडीत असलेल्या सर्वच संबंधिताचे असून कालांतराने जर्नीमन लोकांचे स्वतंत्र संघ स्थापन झाले. या जर्नीमन लोकांनी मजुरीचे दर वाढविण्यासाठी व कामाचे तास कमी करण्यासाठी संघटित प्रयत्न केले .यांनी संपाचे हत्याही वापरल्याचे नमूद आहे. आधुनिक मजूरसंघटनांचे प्राथमिक स्वरूप यांतूनच आढळते. पुढे राज्यसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढले व औद्योगिक क्रांतीनंतर एकंदर व्यापार उद्योगधंद्यांचे स्वरूपच पालटल्याने ह्या मध्ययुगीन संघटना हळूहळू नष्ट झाल्या. 

मध्ययुगाच्या प्रारंभी नाण्यांचा प्रचार जवळजवळ नव्हताच. धर्मसंस्थेच्या तात्विक विरोधामुळे व्यापारी लोक सावकारीसारख्या व्यवसायात फारसे नसत. यहुर्दीसारखे लोकच प्रामुख्याने सावकारी करीत. व्यावसायिक किंवा वैयक्तिक सौदे करण्याची पध्दती प्राथमिक अवस्थेत होती. मध्ययुगाच्या उत्तरार्धात व्हेनिस, फ्लॉरेन्स या इटलीतील शहरांच्या प्रशासकांनी डकट,फ्लॉरिन इ. नाणी प्रचारात आणली. ती अनेक युरोपीय देशांत सर्वमान्य झाली. चालू खात्याची व्यवस्था असलेल्या पेढ्या , बँका-प्रथमतः फ्रान्समधील नार्ट टेम्पलर्स या संघटनेने सुरू केल्या. इटलीतील फ्लॉरेन्स, सिएन्ना इ. शहरांनी या प्रथेचे अनुकरण केले. धर्मपीठाचे व्यवहारी पुढे या संस्थामार्फत होऊ लागल्याने यांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली. ऋणपत्रे व हुंड्याची प्रथाही उत्तर इटलीतील शहरांनी चौदाव्या शतकाच्या अखेरीस अंमलात आणली व अशा रीतीने अर्वाचीन आर्थिक व्यवहारांचा प्रारंभ झाला. नाण्यांचे चलन व्यवहारात आल्याने संरजामशाहीची पीछेहाट होण्यास मदत झाली. सर्वमान्य चलनाला राजमान्यतेची आवश्यकता असल्याने राज्यसंस्थेचे महत्व वाढण्यासाठी या प्रथेची मदत झाली व आर्थिक व्यवहारातील धर्मसंस्थेची पकड हळूहळू कमी होऊन भांडवलशाही अर्थव्यवस्थेला सुरूवात झाली.

दळणवळण व वाहतूक साधनांच्या अभावामुळे मध्ययुगात आयात-निर्यात व्यापारही यथातथाच होता. ही अडचण दूर करण्याचे कामत्या काळच्या जत्रांनी केले. जनतेच्या करमणुकीबरोबर अनेक आवश्यक वस्तू मिळण्याचे व बाह्य जगाच्या माहितीचे साधन म्हणून जत्रांना त्या वेळच्या समाजजीवनात महत्वाचे स्थान होते.

सामाजिक स्थिती : अमीर –उमराव ,वरिष्ठ धर्मगुरू, सामान्य शेतकरी –कामकरी, धर्मसंस्थांतील कनिष्ठ पाद्री, व्यापारी, भूदास हे मध्ययुगातील प्रमुख समाजघटक होते. समाजाचे पुढारीपण सरदार व धर्मगुरी यांच्याकडे होते. हे मुख्यतः सरंजामदार असत व त्यांच्या जमिनीची मशागत कुळांनी करावयाची असे. सामान्य जनांची स्थिती हलाखीची होती. यांपैकी भूदास हे कायद्याने गुलाम नसले, तरी जमिनीला बांधलेले असत. म्हणजे जमिनीचा मालक बदलल्यास ते आपोआपच नव्या मालकाचे भूदास होते. श्रम भरपूर पण वेतन अल्प असल्याने सामान्यांची राहणी निकृष्ट प्रकारची होती.

शिलेदार हा मध्ययुगीन समाजातील एक महत्वाचा घटक. दीन-दुर्बलाबद्दलची आस्था व अदभूत पराक्रम गाजविण्याची इर्षा ही शिलेदारांची प्रमुख लक्षणे .रणभूमी ही यांच्या जीवनातील स्थायीभाव. लष्करी वृत्तीतील बेछूटपणा त्यांच्या रोमारोमांत भरलेला असते. मध्य युगाच्या उत्तरार्धात व्यापारव्यवसाय वाढून एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग उदयास आला आणि त्याचे भावी समाजजीवनावर दूरगामी परिणाम झाले.


शैक्षणिक, वैज्ञानिक व वाडमयीन विकास : रोमन साम्राज्याच्या र्हाषसानंतर शिक्षणकार्याची फार हानी झाली. ग्रामर स्कूल्स म्हणजे रोमनांच्या प्राथमिक शाळासुध्दा बंद पडल्या. पुढे शार्लमेनने धर्मगुरूव सामान्य नागरिक यांच्या शिक्षणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्याने बरीच शैक्षणिक प्रगती झाली. शार्लमेननंतर धर्मसंस्थेने शिक्षणकार्य काही अंशी पुढे चालविले. सरदारपुत्रांना शिलेदारीचे शिक्षण घरीच शिक्षकांच्या देखरेखीखाली दिले जाई. खाजगी शिक्षणात विविधता व गुणवत्ता पुष्कळच होती.

राज्यसंस्था व धर्मसंस्था यांच्या प्रशिक्षित सेवकांच्या गरजेतून त्या वेळच्या उच्च शिक्षणाचा विकास झालेलाआहे. ऑक्सफर्ड ,केंब्रिज, पॅरिस, हायड्रलबर्ग, बोलोन्या, सालेर्नो, व्हिएन्ना वगैरे जगप्रसिध्द विद्यापीठे मध्ययुगाच्या उत्तरार्धात स्थापन झाली . बोलोन्या विद्यापीठात कायदा, सालेर्नो येथे वैद्यक व पॅरिस येथे धर्मशास्त्र शिकण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येत.

मध्ययुगीन विद्यापीठे सुसंघटित नसली, तरी त्यांत ज्ञानाची व्यापकता आणि सखोलता याबद्दल बरीच दक्षता घेतली जाई. सामान्य अभ्यासक्रमात उदार शिक्षणाला महत्व होते. त्यात दोन प्रकार होते. पहिल्यात व्याकरण ,अलंकारशास्त्र, तर्कशास्त्र, तर दुसऱ्यात गायन, अंकगणित भूमिती व ज्योतिष यांचा समावेश होता.

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात अँलबर्टस मॅग्नस, टॉमस अक्कायनस यांच्या प्रयत्नाने अँरिस्टाटल आदी प्राचीन पंडिताचे ग्रंथ अभ्यासिले जाऊ लागले. पीत्रार्कच्या प्रयत्नाने लॅटिन भाषेचाही अभ्यासक्रमात समावेश होऊन ग्रीकबरोबर तिलाही उच्च भाषेचा दर्जा प्राप्त झाला. कायद्याचे विद्यार्थी मुख्यतः जस्टिनिअनच्या विधिसंहितेचा व त्यांवरील टीकेचा अभ्यास करीत. वैद्यकाचा अभ्यास गेलेन , हिपॉक्रटीझ यांच्या ग्रंथांच्या आधारे होई. सालेर्नो विद्यापीठातील वैद्यकशास्त्राच्या अभ्यासात स्त्रीरोगचिकित्सा व नेत्ररोगचिकित्सा हे विषयही शिकविले जात. कायदा, धर्मशास्त्र यांच्या अभ्यासाने राजकीय तथा विधी न्याय विषयांना चांगलीच चालना मिळाली . यूरोपाच्या सांस्कृतिक विकासात मध्ययुगीन विद्यापीठांची कामगिरी मोलाची आहे. विद्यापीठांव्यतिरिक्त मठांसारख्या संस्थांतून विचार प्रसाराचे व संशोधनाचे जे कार्य झाले, तेही महत्वाचे होते.

धर्मसंस्थेच्या विरोधामुळे प्रायोगिक शास्त्रांचा विकास खुंटला नाही. यूरोपातील विज्ञानाच्या प्रगतीचे श्रेय मुख्यतः अरबांना दिले पाहिजे. अंरिस्टॉटल ,गेलेन आदी ग्रीक पंडितांचे ग्रंथ यूरोपला मिळाले ते अरबांच्या मार्फतच . त्याशिवाय अरबांनी बीजगणितातील द्विघात समीकरण , भूमिती, त्रिकोणमिती, दशांशपध्दती , अक्षांश-रेशांश, दकसूचक, अनेक औषधी वनस्पती यांचे ज्ञान याच काळात यूरोपला दिले. 

सर्व दृश्य गोष्टींचे कार्यकारणभाव समजावून घेण्याची उत्सुकता वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने उपकारक होती. मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत ⇨रॉजर वेकन हा होय. अँरिस्टॉटलचे सिध्दांत आंधळेपणाने न स्वीकारता सृष्टीच्या प्रत्यक्ष निरीक्षणाने व अभ्यासाने ज्ञान मिळवावे. असा प्रयत्न त्याने व इटालियन शास्त्रज्ञ ⇨अँड्रिअस व्हिसेलिअस यांने केला. पूर्वसूरींना केलेली विधाने प्रत्यक्ष प्रयोगाच्या निकषावर घासून पाहिल्याशिवाय ती स्वीकारू नका, असा आग्रह त्यांनी धरल्यामुळे खऱ्या वैज्ञानिक दृष्टीच्या वाढीस मोठे साहाय्य झाले. किमया व फलज्योतिष यांचाही त्या काळी विशेष अभ्यास होई. त्यांतून अर्वाचीन रसायनशास्त्र आणि ज्योतिष यांचा विकास झाला. 

मध्ययुगातील धर्मसंस्था व शासन यांचे व्यवहार प्रामुख्याने लॅटिन भाषेत चालत. त्या वेळच्या ⇨त्रूबदूरांनी प्रसृत केलेल्या काव्यकथांचे विश्लेषण करता यूरोपच्या निरनिराळ्या भागांत रोमान्स, जर्मानिक किंवा ट्यूटॉनिक व स्लाव्हिक अशा तीन गटांतील भाषा प्रचलित असलेल्या दिसतात. लॅटिन ग्रीक आणि प्रांताप्रांतातील बोलीभाषा यांच्या संमिश्रणाने प्रांतिक व राष्ट्रभाषा विकसित झाल्या सुरूवातीला या भाषांतील साहित्य मौखिकच होते व ते त्रूबदूर , मिनर्स्येगर या व्यावसायिकांद्वारे प्रसृत होत राहिले. यांनी गायलेल्या कथा मुख्यतः पूर्वसूरीच्या पराक्रमांचे वर्णन करणाऱ्या असत. देशाभिमान जागृत करण्याचे महत्वाचे कार्य या त्रूबदूरांनी केले. नीबलुडगनलीड हे जर्मन राष्ट्रीय महाकाव्य व बेअवुल्फ हे अँग्लो-सॅक्सन महाकाव्य याच सदरात येतात. इंग्लंडमधील ⇨जेफ्री चॉसरचा कॅन्टरबरी टेल्स हा काव्यकथांचा संग्रह व विल्यम लँग्लंडचे द व्हिजन ऑफ विल्यम कन्सरनिंग पिअर्स द प्लाउमन या काव्यात तत्कालीन समाजस्थितीचे सुरेख चित्रण आहे. इटालियन भाषेतील दिव्हीना कोम्मदीआ हे आलिग्येअरी दान्तेचे महाकाव्य मध्ययुगातील श्रेष्ठतम साहित्यकृती म्हणून विख्यात आहे.  स्वर्ग नरकातून आत्म्याने केलेल्या प्रवासाच्या वर्णनाच्या निमित्ताने दान्तेने तत्कालीन समाजापुढील धार्मिक व नैतिक मूल्यांचे चांगले रेखाटन केले आहे. ऐतिहासिक साहित्य आणि चरित्रवाडःमय या शाखांत मध्ययुगात काही महत्वाच्या ग्रंथांची भर पडली. ग्रेगरी ऑफ तूरचे हिस्सोरिया फ्रँकोरम, झॉफ्रूवा द व्हीलापगँते कॉकॅस द काँस्तोंतिनॉल्प हा फ्रेंच व सेंट बीडकृत हिस्टोरिया इक्लिझिअँस्तिका… हे प्रसिध्द ऐतिहासिक ग्रंथ मध्ययुगातलेच .चरित्र ग्रंथांत आइनहार्टकृत शार्लमेनचे चरित्र आणि झां इवँव्हिलचे इस्त्यार द सँ लूर्ड ही चरित्रे प्रसिध्द आहेत.

लॅटिन ग्रीक भाषा मागेपुढे पडून प्रांतिक भाषांचा वापर मध्ययुगात सर्वत्र होऊ लागला. यामुळे सामान्य माणसाचे विचारक्षेत्र निश्चितच रूंदावले व भावी इतिहासावर त्याचा महत्वाचा परिणाम झाला. राष्ट्रराज्यांचा उदय, धर्मसुधारणेची चळवळ यांसारख्या विश्वेतिहासाला कलाटणी देणार्य़ाा घटनांच्या बाबतीत प्रांतिक भाषासाहित्यांनी केलेले कार्य महत्वाचे आहे. [⟶ इंग्रजी साहित्य, जर्मन साहित्य].

कला : मध्ययुगीन यूरोपातील कला ही विविध संस्कृतीच्या संमिश्र संस्कारातून निर्माण झाली आहे. मेदीसारख्या श्रीमंत घराण्यांच्या व धर्मसंस्थाचा आश्रम त्या काळी कलांना मिळाला. मात्र सामान्य जनतेला कलास्वाद घेण्याइतकी फुरसदही नव्हती व सांस्कृतिक दृष्ट्या जनता इतकी प्रगतही नव्हती. 

रोमन ,बायझंटिन त्याचप्रमाणे प्रदेश विशिष्ट लोककला क्षेत्रातील कलाविषयक संकल्पनांच्या संयोगाने मध्ययुगातील यूरोपीय कलेचा विकास झाला. गॉलवरील रोमनांच्या आधिपत्यामुळे भव्य वास्तूंचा वारसा यूरोपला मिळाल. कॅथड्रील हे मध्ययुगातील कलाविकासाचे प्रतीक समजण्यास हरकत नाही . हे केवळ प्रार्थनास्थान नसून कलात्मक वस्तूंचे आणि युध्दातील विजयचिन्हांचे संग्रहालय सन्माननीय नागरिकांचे स्मारक असे त्याचे सर्वस्पर्शी स्वरूप आहे. फ्रान्समधील प्वाते येथील अवशिष्ट चर्च टेंपल ऑफ सेंट झा. (६८२-९६) हे सर्वात जुने असून त्यानंतर वास्तुकलेत अनेक परिवर्तने झाली. बॅसिलिका या रोमन सभागृहाचा विकसित आविष्कार मध्ययुगात आढळतो.

मध्ययुगाच्या प्रारंभी रोमनेस्क गृहशिल्पाचा प्रचार झाला होता. रोमन कमानीच्या मुक्त उपयोगामुळे या पध्दतीला ⇨रोमनेक्स वास्तुकला हे नाव पडले असले, तरी यात रोमन, बांयझटिन आणि ख्रिस्ती कल्पनांचे मिश्रण आणि प्रभाव दिसतो. अवशिष्ट कॅरोलिंजअन वास्तुंच्या प्रभावातूनच ही वास्तुशैली विकसित झाली. मिलान शहरातील सेंट आम्ब्रोजिओ चर्च , पीसा येथील कॅथीड्रल, फ्लॉरेन्स मधील सॅन मिन्याटो कॅथीड्रल हे चर्च फ्रान्समधील सँ त्रॉफीम व आबेई ओ झॉम ही रोमनेस्क वास्तुशैलीची प्रसिध्द उदाहरणे होते. या काळातच फ्रेंच ⇨ गॉथिक कलेचा सर्वत्र प्रसार झाला.


अकराव्या शतकातील उल्लेखनीय वास्तूमध्ये प्वाते येथील सँ ईलेअर (१०१८-५९) का येथील अबोई ओ दाम (१०६२-११४०) व आबेई ओ झॉम (१०६६-८६) तूलूझ येथील सेंट सेनीन (१०८०-९६) इत्यादींची गणना होते. बाराव्या शतकात फ्रान्समध्ये सँ दनी (पॅरिस) सँ मादलेन इ. वास्तू बांधल्या गेल्या. रोमनेस्क शैलीने मध्ययुगातील आदर्शवाद्यांचे समाधान होईना. या असमाधानातून गॉयिक वास्तुशैलीचा जन्म झाला. या पध्दतीत तळमजल्यावरील रचना रोमनेस्क पध्दतीची असे आणि इमारतीची शोभा वाढविण्यासाठी निरनिराळ्या रचनाविशेषांचा अवलंब केला जाई. टोकदार कमान ,कमानी उपकमानीचे टेकावे व गोलाकार गुलाब पुष्पाकार सुशोभित खिडक्या ही गॉथिक कॅथीड्रलची प्रमुख वैशिष्ट्ये होती. या खिडक्या विविध प्रकारे सजविलेल्या असल्याने गॉथिक शिल्पाचे मोठेच आकर्षण म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 

चर्च व कॅथीड्रलच्या प्रवेशद्वावरील उत्थित शिल्पांच्या स्वरूपात मूर्तिकला प्रकटू लागली. कमानी-उपकमानींचे बांधकाम, दारे –खिडक्या वरील बारीक नक्षीकाम व भिंतीवरील चित्रे या सर्वांच्या मिश्र परिणामाने गॉथिक कॅथीड्रलचे वैभव वाढलेले दिसते. कोरीव संतचित्रे, विविध गोमुखे, प्रासादशृंग इ. सजावटीतल्या गोष्टी योजनापूर्वक बसविलेल्या दिसतात.

कॅथड्रलमधील शिल्पासाठी धार्मिक विषय़ांची निवड होई. बाराव्या शतकातील शिल्पात अर्केथस या पानांच्या नक्षींचे स्तंभशीर्ष, भिती वरील कोरीव शिल्पपट्ट यांसारख्या अभिजात शैलीचा प्रभाव दर्शविणाऱ्या अलंकारणाबरोरबच रोमनेस्क मूर्तिकलेत पूर्वकालीन संकल्पना आणि कॅरोलिंजिअन भौमितिक आकार व गुंतागुंतीची गुंफण असलेली नक्षी दिसू लागली. एकंदरीत व्यक्तिचित्रण श्रध्दापूर्ण असे. क्लाउस स्लूटर,⇨दोनातेल्लो हे मध्ययुगातील काही प्रमुख शिल्पकार, त्यांपैकी दोनातेलोने शिलेदारी ,संतविभूती , आदी मध्ययुगीन विषय प्रामुख्याने हाताळले असले, तरी सेंट जॉर्ज ,सेंट मार्क आदी कृती ग्रीको-रोमन परंपरेतल्या वाटतात ,म्हणून पुष्कळदा प्रबोधनाचा आद्य शिल्पी असा दोनातेलोचा गौरव करण्यात येतो.

कॅथड्रलमधील धार्मिक चित्रे सोडल्यास इतरत्र निसर्ग दृश्ये, शिकार खेळ, शिलेदारांची स्पर्धा इ. विषयच चित्रकारांनी प्रामुख्याने हाताळलेले दिसतात. जोव्हान्नी ची माबूए ,दतचो दी ब्वॉनीनेसन्या जॉत्तो दी योंदोने, फ्रा अँजेलिको हे मध्ययुगातील प्रमुख चित्रकार. जॉत्तोने निसर्गविषय़च मुख्यतः हाताळलेले दिसतात. सेंट फ्रान्सिसची पक्ष्यांच्या थव्याबरोबर प्रवचन ही तत्कालीन श्रेष्ठ चित्राकृती समजली जाते. 

विविधरंगी काचांच्या वापराने कलाकुसरीची शोभा वाढविणे, हे मध्ययुगातील कलाविलासाचे प्रमुख अंग होते. पाने फुले, निरनिराळ्या आकृत्या व बायबलमधील विविध प्रसंगही विविधरंगी काचांच्या तुकड्यांची जुळणी करून चित्रकाम केलेले आहे. शार्त्र येथील कॅथीड्रलमधील गोलाकार खिडक्यांत अशा प्रकारे एक अप्रतिम उदाहरण आहे. [⟶ चित्रकाच].

ईश्वरोपासनेत संगीताचा उपयोग मध्ययुगातच सुरू झाला. आरेत्सो येथील दारेत्सो ग्वीदो या मठवासियाने संगीताचे स्वरलेखन करण्याची प्रथा सुरू केली. वाद्यांच्या बाबतीत बरीच क्रांती होऊन ⇨गिटार, गिटार फिडल व ⇨क्लॅव्हिकॉर्ड़ ही वाद्ये वापरात आली. गिटार, फिडल व ⇨उत्कांत होऊन आजचे व्हायोलिन व क्लॅव्हिकॉर्डपासून ⇨पियानो ही वाद्ये अर्वाचीन काळात रूढ झाली.

तत्वज्ञान :  मध्ययुगाच्या प्रारंभी ग्रीक व रोमन विचार व विद्या यांना यूरोपखंड पारखा झालेला होता. साहजिकच विश्वाची उत्पत्ती, विकास वगैरे बाबतीत बायबलमधील विधाने सर्वमान्य समजली जात. ही मते म्हणजे साक्षात्काराने ज्ञात झालेली व श्रध्देमुळे मान्यता पावलेली होती. काही पंडितांनी अँरिस्टॉटलच्या तर्कशास्त्रीय पध्दतीच्या आधारे ख्रिस्ती धर्मग्रंथातील तात्विक विसंगतीचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. अशा पंडितांना पीठ पंडित (स्कॉलॅस्टिक) व त्यांनी प्रसृत केलेल्या तत्वप्रणालीला पीठ पांडित्य (स्कॉवॅल्टिसिझम) असे म्हणतात. या पंडितांनी आपल्या कुशाग्र बुध्दीच्या प्रभावाने आतापर्यंत केवळ श्रध्देने मान्य केलेली तत्वे बुध्दीला पटतील, अशी त्यांची मांडणी केली. तर्कशास्त्रीय पध्दतीने धर्मशास्त्रातील सिध्दांताचा खुलासा करून त्यात दिसणारी विसंगती हीच वरवरची आहे. असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तत्ववेत्यांत ⇨पीटर अँबेलार्ड (१०७९-११४८) व ⇨सेंट टॉमस अक्वायनस (१२२५-१२७४) हे अग्रगण्य मानले जातात. सेंट अक्कायनस हा मध्ययुगीन सर्वश्रेष्ठ दार्शनिक व त्याचा सुमाथिऑलॉजिया हा तत्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. 

मूल्यमापन : मध्ययुगाचा प्रारंभी रोमन साम्राज्याचे पतन व अंति पवित्र रोमन साम्राज्याचे विघटन आणि पूर्ण रोमन साम्राज्याचा विनाश अशा इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना घडल्याने मध्यवनस्पति हा सर्व कालखंड सकृतदर्शनी राजकीय दृष्ट्या बेबंदशाहीचा वाटतो. या काळाच्या उत्तरार्धातील सरंजामदार व प्रस्थापित राजसत्ता यांच्यातील संघर्षामुळए अराजकाचे चित्र विशेष प्राबल्याने जाणवते. यामुळेच काही अंशी या कालखंडाला तमोयुग असे नाव दिले गेले. धार्मिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रांतही विविध प्रकारे संघर्ष होतच होते. या संघर्षातून कित्येक जुन्या संघटना मोडकळीला आल्या व नव्या उत्कांत होत राहिल्या. यामुळे या कालखंडाला एक प्रकारच्या संधिकाळाचे स्वरूप प्राप्त झाले.

राजकीय दृष्ट्या यूरोपिय एकतेचे ध्येय असाध्य राहिले हे खरे पण सरंजामी संघर्षातून प्रबल राजवंश व नवी राष्ट्र-राज्ये निर्माण होऊन अर्वाचीन यूरोपच्या राजकीय संघटनेचा पाया याच युगाच्या उत्तरार्धात घातला गेला. 

धार्मिक दृष्ट्या रोमन कॅथलिक पंथाचा विकास याच युगातला. यूरोपातील सर्व ख्रिस्तातर जमातींना ख्रिस्ती धर्मात आणण्याची महान कामगिरी याच काळातली हे कार्य चालू असता धर्मसंस्थेत अनेक अंतःस्थ संघर्ष झाले व प्रस्थापित धर्मपीठाचे सिध्दांत अमान्य करण्याची वृत्ती निर्माण होऊन पुढील काळातली धर्मसुधारणा आंदोलनाची चाहूल याच काळात लागली.


जन्मजात उच्चनीचतेवर आधारलेला समाज अमान्य होऊन व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारलेला नवा समाज याच काळात दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागला होता. व्यावसायिक संघटनांवर आधारलेली अर्थव्यवस्था लयाला जाऊ लागली आणि खुल्या स्पर्धच्या तत्वावर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदगम व प्रारंभिक विकास याच काळाच्या अखेरीस झाला. 

याच कालखंडात शार्लमेनसारख्या राज्यकर्त्यानी, निरनिराळ्या मठवासियांनी आणि विद्यापीठांनी विद्याप्रसाराचे मोठेच कार्य केले. इतकेच नव्हे ,तर विविध क्षेत्रात मौलिक संशोधन करून यूरोपीय संस्कृतीचे बीजारोपण केले.

विज्ञान, साहित्य,विविध कला व तत्वज्ञान या क्षेत्रातील मध्ययुगाची कामगिरी उपेक्षणीय नाही. ज्या काळाने गॉथिक वास्तुशिल्पशैली, जॉत्तोची चित्रकला, भारतीय दशांशपध्दती , होकायंत्र, ज्योतिष ,भौगोलिक समन्वेषण, छपाईचा शोध इ. अनेक शोधांची देणगी भावी काळाला दिली व ज्या कालखंडात दान्तेसारखे महाकवी, रॉजर बेकन सारखा अष्टपैलू विद्वान, टॉमस अक्कायनसारखे दार्शनिक होऊन गेले. तो काळ तमोमय होता, असे म्हणणए वस्तुस्थितिनिदर्शक ठरणार नाही. 

पहा : धर्मसुधारणा आंदोलन, धर्मयुध्दे, प्रबोधनकाल, सरंजामशाही, यूरोपीय.

संदर्भ : 1. Barraclough, Geoffrey Ed, &amp Trans, Medieval Germany-911-1250, Essays by German Historans, Oxford, 1961.

            2. Durant, Will The Age of Faith, New York, 1973.  

            3. Flick, A.C. The Rise of the Mediaeval Church and its Influence on the Civilsation of Western Europe From the First to the Thirteen Century, New York, 1959.  

            4. Gwatkin, H.M. Whitney J.P. Previte-Orton C.W. &amp Others, Ed, Cambridge Medieval History , 8Vols, Cambridge , 1966,

            5. Heard Nigel Tull G.K. The Beginnign of European Supermacy, London, 1969.

            6. Postan, M.M. Ed, Cambridge Economic History of Europe, Vols I&ampIII , Cambridge1966&amp1970.

            7. Sorthern, R.W. The Making of the Middle ages, Oxford, 1962.

            8. Southern R.W. Western Society and the Church in the Middle ages, London. 1970.

            9. Wernick R. The Vikings, Alexandria, 1979.

           10. Windrow, M.C. The Invaders, New York, 1979.

 ओक, द. ह.