गवती साप : हा एक बिनविषारी साप असून कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅकॉपिस्थोडॉन प्‍लंबिकलर असे आहे. हा सामन्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी त्याच्या लगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. १,८३० मी. उंचीपर्यंतही हा आढळलेला आहे. गवत व झुडपे यांत तो असतो, पण पुष्कळदा तो  घरातही येतो.

हा साप काहीसा जाड असतो. नराची लांबी सु. ५० सेंमी. आणि मादीची ७० सेंमी. असते. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा असल्यामुळे ती खरखरीत लागते. पाठ गवती हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. प्रत्येक डोळ्याच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. हनुवटी, गळा आणि अधर पृष्ठ यांचा रंग पांढरा असतो. दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेघा असतात. शेपूट लहान असते. हिरव्या गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग संरक्षक असतो.

हा सौम्य वृत्तीचा,निरुपद्रवी पण चपळ साप आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, तथापि क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फण्याचा भास उत्पन्न करतो. बेडूक आणि भेक याचे भक्ष्य होय, पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो.          

कर्वे, ज. नी.