व्हॅलेंशिया-२ : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशातील काराबोबो राज्याची राजधानी. लोकसंख्या ९,०३,०७६ (१९९१) महानगरीय १२,७४,३५४ (१९९० अंदाज). देशाच्या उत्तर भागात व्हॅलेंशिया सरोवराच्या पश्चिम किनाऱ्याजवळ, रिओ काब्रीएल्स नदीतीरावर हे शहर वसले आहे. हा संपूर्ण प्रदेश उच्चभूमीचा असून व्हॅलेंशियाची स.स.पासूनची उंची ४९० मी. आहे.

इ. स. १५५५ मध्ये आलॉंन्सो दीआद मेरिनो याच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश वसाहतकारांनी या शहराची स्थापना केली. तेव्हापासून व्हॅलेंशियाची काराकास या शहराशी स्पर्धा चालू होती. इ.स. १८१४ मधील व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्ययुद्धात राफाएल उर्दानेता याच्या नेतृत्वाखालील २०० सैनिक व ४,००० स्पॅनिश सैनिक यांच्यातील इतिहासप्रसिद्ध लढाई येथेच झाली. जून १८२१ मधील अंतिम निर्णायक लढाई शहराच्या नैर्ऋत्येस २९ किमी.वर असलेल्या काराबोबो येथे झाली. युद्धकाळात तसेच युद्धोत्तर काळात (१८१२,१८३० व १८५८) तीन वेळा व्हॅलेंशिया ही देशाची राजधानी होती. हे शहर कॉर्डिलेरा देल कारोबो खोरे, या देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित प्रदेशात असून, व्हेनेझुएलातील दोन मुख्य औद्योगिक केंद्रांपैकी ते एक आहे. मध्य व पश्चिम व्हेनेझुएला यांदरम्यानचे वाहतूकमार्ग व्हॅलेंशियावरून जातात. दक्षिणेकडील गुरचराईचा लानोज मैदानी प्रदेश व उत्तरेकडील उच्चभूमीतील नागरी बाजारपेठेचे क्षेत्र यांदरम्यान व्हॅलेंशियाचे स्थान आहे. तसेच उत्तरेस ५५ किमी. अंतरावरील कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावरील प्वेर्तो काबेलो शहराशी व्हॅलेंशियाचे सुगम दळणवळण आहे. प्वेर्तो काबेलो बंदरातून येथील उत्पादने निऱ्या केली जातात. देशातील सर्वांत सुपीक व कृषिउत्पादक प्रदेशात या शहराचे स्थान असून येथे विविध प्रकारची कृषिउत्पादने होतात. पशुखाद्य उत्पादने, खते, अन्नप्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ-निर्मिती, वनस्पती तेल, साबण, साखर, कापड, औषधे, कागद, कार्डबोर्ड, लाकूड-चिरकाम, रबर-उत्पादने, मोटर-जुळणी, यंत्रांचे सुटे भाग, ओतकाम, सिमेंट, प्लॅस्टिके, कातडी कमावणे, उपभोग्य वस्तु-उत्पादने इ. उद्योगधंदे शहरात चालतात. शहरातील औद्योगिक विभागाचा विस्तार अतिशय नियोजनबद्ध रीतीने केलेला असल्याने शहरातील जुने वसाहतकालीन वातावरण टिकून राहिले आहे. कॉफी व साखर वितरणाचे हे मुख्य केंद्र आहे.

ईशान्येस १२० किमी. अंतरावर असलेल्या काराकास शहराशी हे जलद लोहमार्ग व रस्त्याने जोडलेले आहे. कॅथीड्रल, सॅन फ्रॅन्सिसको चर्च, सेलिस हाउस या शहरातील उल्लेखनीय वसाहतकालीन वास्तू आहेत. शहरात काराबोबो विद्यापीठ तसेच मानवशास्त्र व ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे. बैलांच्या झुंजीचा दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठा आखाडा व्हॅलेंशियामध्ये आहे.

चौधरी, वसंत