मांकर (मंकर) : (पंधरावे-सोळावे शतक). एक लोकप्रिय प्राचीन असमिया कवी. त्याची चरित्रपर माहिती फारशी उपलब्ध होत नाही तथापि त्याने रचलेला पद्‌मपुराण वा मनसा-काव्य हा एकमेव काव्यग्रंथ उपलब्ध असून तो विशेष प्रसिद्ध आहे. मांकर हा कोच राजा विश्वसिंग (कार. सु. १५१०–४०) याचा आश्रित होता. आपल्या आईचे नाव कालिंदी असल्याचा उल्लेख त्याने आपल्या काव्यात केला आहे. आपल्या काव्यातून नागदेवता मनसाची कथा गुंफणारा मांकर हाच आद्य असमिया कवी होय. तो शैव मार्गी तांत्रिक पंथाचा अनुयायी असून त्याने आपल्या काव्यात तांत्रिक मंत्र, विधी व कर्मकांडाचा पुरस्कार केलेला आहे. मनसा-काव्यात विश्वोत्पत्ती, हर-गौरी विवाह व शेवटी नागदेवता मनसाच्या लीला हे विषय असून आख्यानात्मक-भावगीतात्मक अशी दुहेरी काव्यशैली आढळते. आशयात शृंगारपरता अधिक आहे. सर्वसामान्यास सहज आकलन होणारी सुबोधताही त्यात आहे. सध्याच्या कामरूप व गोआलपाडा जिल्ह्यांतील बोली भाषेचा वापर त्याच्या काव्यात असल्याने तो लोकप्रिय असा जनकवी ठरला.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा.ग.(म.)