वैद्यकीय उपकरणे : वैद्यकामध्ये रोगनिदान, रोगाच्या स्थानाचे, स्थितीचे व विस्ताराचे अचूक मापन आणि उपचार यांसाठी अनेक प्रकारच्या उपकरणांचा उपयोग सतत वाढत आहे. भौतिकीच्या प्रगत ज्ञानावर आधारित नवीन तंत्रे अशा उपकरणांच्या मदतीने गेल्या दोन-तीन शतकांत वापरात येऊ लागली. त्यामुळे वैद्यकीय कौशल्यामधील अचूकपणा वाढू लागला तसेच वेळेची बचत होऊन वैद्यकीय सेवेचा फायदा कमी वेळात अधिक रुग्णांना देणे शक्य होऊ लागले. या प्रक्रियेमध्ये वैद्यकीय विज्ञान जास्त वस्तुनिष्ठ होत असले, तरीही आरोग्यविषयक सेवा अधिक खर्चिक होत आहे, असा आक्षेप अनेकदा घेतला जातो. तिचे यांत्रिकीकरण होत आहे, असेही मत व्यक्त केले जाते.

वैद्यकीय व्यावसायिकाच्या स्वत:च्या शारीरिक कौशल्याची आणि ज्ञानेंद्रियांच्या उपयुक्ततेची कक्षा वाढविणारी साधीसाधी आणि आज नित्योपयोगी वाटणारी अनेक उपकरणे गेल्या सु. तीन हजार वर्षांत शोधली गेली आहेत.

सुश्रुतांच्या शल्य चिकित्साशास्त्रात जवळजवळ १२० उपकरणे शरीराच्या बाहेरून किंवा आतून वापरण्यासाठी उपलब्ध होती, असे दिसते. सुऱ्या, शोधशलाका (एषणी, सळई), मूत्राचा निचरा करणाऱ्या नलिका, जलनिस्सारणासाठी पोकळ सुया, लोहचुंबक, दाहकर्मासाठी उपकरणे यांचा त्यांत समावेश होतो. तसेच मोतीबिंदू, मुतखडा, तुटलेल्या नाकाची वा कानाची दुरुस्ती, इतर सुघटन शस्त्रक्रिया (प्लॅस्टिक सर्जरी) यांच्यासाठी लागणारी विशेष उपकरणेही त्यांत आढळतात. भारतातून बाहेर गेलेल्या तंत्रज्ञानामुळे यांतील अनेक उपकरणे प्राचीन रोमन वैद्यकात समाविष्ट झाली. तेथील उपकरणांची संख्या जवळजवळ २०० होती. त्यांत योनिमार्गाच्या तपासणीचा निरीक्षण साहाय्यक, नीलांमधून रक्तस्राव थांबविण्याचे चिमटे, अवटू ग्रंथीच्या उत्पाटनाची हत्यारे यांचा उल्लेख प्रथमच आढळतो. शरीररचनेच्या मर्यादित ज्ञानामुळे उपकरणांच्या उपयोगाची (आणि शल्यकर्माची) प्रगती नंतर जवळजवळ सतराव्या शतकापर्यंत खुंटली होती. त्यानंतरच्या प्रबोधन युगात भौतिकी, रसायनशास्त्र आणि शरीरविज्ञान (शरीररचना व शरीरक्रियाविज्ञान) यांमधील अनेक शोधांमुळे वैद्यकीय क्षेत्राला विविध उपकरणे उपलब्ध झाली. त्यांच्या प्रगतीचे काही प्रमुख टप्पे पुढील होत : सतरावे शतक – संयुक्त सूक्ष्मदर्शक, शवविच्छेदनाची उपकरणे, चेंबरलेन प्रसूतिसाहाय्यक चिमटा अठरावे शतक – अल्कोहॉल तापमापक, पारा तापमापक एकोणिसावे शतक – अवर्णी सूक्ष्मदर्शक, नेत्रपरीक्षक, रक्तदाबमापक, श्वासमापक, स्टेथॉस्कोप, सहा इंची सुटसुटीत तापमापक, अंत:क्षेपकाची (इंजेक्शनची) पिचकारी व सुई विसावे शतक (पूर्वार्ध) – क्ष-किरण यंत्र, रक्तातील हीमोग्लोबिनाचे मापक व विद्रुत (विरघळलेल्या) वायूंचे मापक, शस्त्रक्रियेसाठी सूक्ष्मदर्शक, जंबुपार आणि इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, विद्युत्‌ हृल्लेखक, बॉइल बधिरीकरण यंत्र, जठर-श्वसनमार्ग यांचे अंतर्दर्शक विसावे शतक (उत्तरार्ध) – कृत्रिम मूत्रपिंड (अपोहन यंत्र), लेसर किरण, हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी हृदय-फुफ्फुस यंत्र, स्वनातीत लेखनयंत्र, सर्व प्रकारच्या अंतर्दर्शकांत तंतुप्रकाशकीचा म्हणजे प्रकाशवाहक तंतुतंत्राचा उपयोग, तंतुदर्शकांच्या मदतीने छेदविहीन किंवा कमीत कमी छेदाच्या शस्त्रक्रिया, अनेक प्रकारच्या मापनात व प्रतिमादर्शनात संगणकाचा उपयोग, किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) द्रव्यांचा उपयोग करणारी निदान व उपचार यंत्रे वगैरे.

वैद्यकीय उपकरणांचे प्रकार : व्यावहारिक उपयोगानुसार वैद्यकीय उपकरणांचे पुढीलप्रमाणे स्थूल वर्ग पाडता येतात: (१) शरीराशी प्रत्यक्ष संबंध येणारी उपकरणे : (अ) निदानासाठी, (आ) उपचारासाठी (२) प्रयोगशाळेतील उपकरणे. पहिल्या वर्गातील उपकरणे वापरल्याने शरीराला कोणताही अपाय होता कामा नये. त्यांचा वरचेवर वापर करण्यातील धोके पूर्णपणे ज्ञात असल्याशिवाय भौतिक प्रगतीचे फायदे वैद्यकाला मिळणे शक्य होत नाही. दुसऱ्या वर्गातील उपकरणे जास्त मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. उदा., रक्त, लघवी इत्यादींच्या परीक्षणासाठी प्रयोगशाळेतील सुरक्षेच्या मर्यादेत राहून अशा उपकरणांचे वैद्यकेतर अनेक प्रकारचे उपयोग असू शकतात. उदा., किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असणाऱ्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) औद्योगिक, कृषी संशोधन, मूलभूत वैज्ञानिक संशोधन इ. क्षेत्रांतील उपयोग. प्रयोगशाळेतील उपकरणांचा विचार या लेखात नाममात्रच केलेला आहे.

निदानासाठी उपकरणे : निदानासाठी उपयुक्त अशा तंत्रज्ञानामध्ये शरीरातील प्राकृतिक प्रक्रियांमधून निर्माण होणारे बदल किंवा संरचनात्मक बदल निरीक्षकाला सुस्पष्टपणे समजण्याची व्यवस्था केलेली असते. उदा., पुढे काही प्रमुख प्रकारच्या उपकरणांची माहिती दिली आहे.

तापमापक : साध्या पारा भरलेल्या तापमापकात ९८·६० फॅरेनहाइट (किंवा ३७० सेल्सिअस) या माणसाच्या प्राकृत (सर्वसाधारण) तापमानापेक्षा सु. पाच अंश कमी व दहा अंश जास्त असे बदल दिसू शकतात. नळीच्या विशिष्ट रचनेमुळे एकदा वर चढलेला पारा शरीरापासून तापमापक दूर काढला, तरी सहजासहजी खाली येत नाही. काखेतील, तोंडात जिभेखालील किंवा गुदांत्रातील तापमान या मापकाने नोंदता येते. तापमानांतील चढ-उतारावर सतत नजर ठेवण्यासाठी किंवा त्वचेचे तापमान घेण्यासाठी उष्णतासंवेदक शलाका असलेला मापक वापरता येतो. त्यात तपयुग्मकाच्या अस्तित्वामुळे तापमानाचे रूपांतर विद्युत्‌ प्रवाहात होते. एकाच वेळी अनेक रुग्णांचे किंवा प्राण्यांचे तापमान मोजण्याची सोय असलेले असे तापमापक अतिदक्षता विभागात आणि प्रयोगशाळेत तापजनक पदार्थांच्या चाचणीसाठी अत्यंत सोईस्कर असतात. (→तापमापन).

दाबमापक : रोहिणी व नीलांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब, श्वसनमार्गातील वायूचा दाब, फुफ्फुसाभोवतालच्या (फुफ्फुसावरणीय) पोकळीमधील दाब, डोळ्यातील स्वच्छमंडलाखालील (पारपटल) नेत्रजलाचा दाब, मस्तिष्क – मेरुरज्जुद्रवाचा दाब यांसारख्या विविध ठिकाणी दाबमापक यंत्रे अप्रत्यक्ष रीत्या जोडून दाबाचे मापन करता येते. दाबाचे रूपांतर विद्युत्‌ प्रवाहात करणारे ऊर्जापरिवर्तक वापरून सतत फेरफार नोंदणारी उपकरणे संशोधनासाठी उपयुक्त ठरतात. (→दाब व दाबमापन).

  विद्युत प्रवाहमापक : स्नायू व तंत्रिका तंत्रामधील (मज्जासंस्थेमधील) कोशिकांची (पेशींची) बाह्य पटले उत्तेजनक्षम असतात. पटलाच्या दोन पृष्ठभागांवरील विद्युत्‌ भारांमध्ये फरक असल्यामुळे ही उत्तेजनक्षमता निर्माण होते. उत्तेजित स्थानापासून विद्युत्‌ आवेग सर्व दिशांनी पसरत जातो. या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांच्या) नेहमीच्या नैसर्गिक कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेले विद्युत्‌ आवेग म्हणजे अनेक कोशिकांच्या एकत्रित आवेगांची बेरीज असते. शरीराच्या पृष्ठभागावर टेकविलेल्या विद्युत्‌ अग्रांच्या मदतीने त्यांचे मापन सहज शक्य असते. अशा मापनांमधून मिळणारे आलेख प्रमाणीकृत केल्यास त्यांतील विकृतिजन्य बदल रोगनिदानासाठी उपयुक्त ठरतात. हृदयविकाराच्या आघातासारख्या स्थितीत हे बदल काही तासांतच दिसू लागतात आणि लवकर व अचूक निदान करण्यास त्यांची मदत होते.

विद्युत्‌ हृल्लेखन, विद्युत्‌ मस्तिष्कालेखन, विद्युत्‌ स्नायुलेखन यांसारखी तंत्रे अशा प्रवाहमापनावर आधारलेली आहेत. यासाठी आवश्यक उपकरणे आता सुटसुटीत, रुग्णशय्येपाशी सहज नेण्यासारखी आणि अविरत आलेखदर्शन घडविणारी देखील असतात. (→गॅल्व्हानोमीटर विद्युत्‌ मस्तिष्कालेखन विद्युत्‌ हृल्लेखन).

ध्वनिश्रवण आणि आलेखन :स्टेथॉस्कोपच्या मदतीने हृदयाच्या आणि श्वसनाच्या नियमित लयबद्ध हालचालींचे सूक्ष्म आवाज स्पष्ट ऐकता येतात. हृदयाच्या झडपांमधील अरुंद मार्गातून वाहणारा रक्तप्रवाह, महावाहिन्यांच्या तोंडाशी असणाऱ्या झडपांची उघड-झाप, श्वास – नलिकांमधून वरखाली ढकलली जाणारी हवा, तेथे असणारे स्राव आणि वायुकोशांमधील द्रव किंवा घनीभूत स्राव यांमुळे हे ध्वनी निर्माण होतात. त्यांचे आलेखनही (ध्वनिलेखन) करता येते परंतु विद्युत्‌ हृल्लेखन किंवा क्ष -किरण चित्रण यांच्या तुलनेने अशा आलेखांमधून मिळणारी माहिती फारच मर्यादित असल्यामुळे हे तंत्र मागे पडले आहे. परिहृद्‌, परिफुफ्फुस आणि पर्युदर या पटलांचा शोथ (दाहयुक्त सूज) आणि संबंधित गुहांमध्ये (पोकळ्यांत) पाणी साठणे यांचे निदान ध्वनिश्रवणाने शक्य असते. तसेच भ्रूणाचे रूपांतर गर्भात झाल्यावर गर्भश्रवण यंत्र वापरून त्याच्या सुस्थितीबद्दल अंदाज बांधणे, हे सोपे तंत्रही प्रसूतिपूर्व चिकित्सेचे एक महत्त्वाचे अंग आहे. (→श्रवणमिति).

श्राव्यातीत ध्वनिकी : (स्वनातीत तंत्रे). ध्वनितरंगांप्रमाणेच कंपनावर आधारित या तंत्रामध्ये स्वनातीत लेखन व प्रतिध्वनि – हल्लेखन यांचा समावेश होतो. १ ते १५ मेगॅहर्ट्‌झ इतकी उच्च कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येला कंप्रता म्हणतात) असलेली ही ऊर्जा (श्राव्य ध्वनितरंग सु. २०,००० हर्ट्‌झपर्यंत कंप्रतेचे असतात) एखाद्या विशिष्ट भागावर किरण शलाकांच्या रूपांत सोडली जाते. या किरणांचे विविध ऊतकांच्या आणि द्रवांच्या आंतरपृष्ठांपासून अंशत: परावर्तन होते. परावर्तित किरणांचे रूपांतर विद्युत्‌ आवेगांमध्ये करून त्यांच्या मदतीने आतील भागांचे चित्र ऋण किरण नलिका पडद्यावर पाहता येते. अंतर्भागातील रचनात्मक बदल (विशेषत: क्ष-किरणांनी जे दिसत नाहीत अशा मृदू भागांमधील बदल) या तंत्राने ऊतकांना इजा न पोहोचता सहज समजू शकतात.

प्रतिध्वनि – हृल्लेखन हा याच तंत्राचा एक विशेष प्रकार आहे. छातीवर टेकविलेल्या उपकरणातून उच्च कंप्रतेचे तरंग हृदयावर सोडले जातात. परावर्तित तरंग त्याच उपकरणाकडे परत येतात. त्यांच्यापासून मिळालेल्या प्रतिमेत हृदयाच्या झडपांची रचनाविकृती, परिहृदामधील जलसंचय, उपजत दोष यांचे चित्रण होते.

श्राव्यातील ध्वनिकीच्या तंत्रात इंद्रियांच्या हालचाली स्पष्ट समजण्यासाठी ⇨डॉप्लर परिणामाचा उपयोग करून घेतला जातो. संगणकाच्या मदतीने परावर्तित तरंगांमधील कंप्रतेच्या बदलाचे विश्लेषण करून रक्तप्रवाह, हृदय किंवा आतड्याच्या हालचाली यांसारख्या गतिमान घटनांचा सूक्ष्म शोध घेणे डॉप्लर पद्धतीच्या उपकरणामुळे शक्य होते. (→ श्राव्यातीत ध्वनिकी).

शरीरातून आरपार जाणाऱ्या किरणांचा उपयोग करून होणारे प्रतिमादर्शन : विविध प्रकारचे ऊतक, विकारग्रस्त इंद्रिये, द्रव पदार्थ, वायू आणि शरीरात बाहेरून घुसलेले किंवा मुद्दाम देण्यात आलेले धातुजन्य पदार्थ यांची किरणांना अडविण्याची (अथवा शोषून घेण्याची) क्षमता निरनिराळी असू शकते. या गुणधर्माचा उपयोग करून शरीराच्या कोणत्याही भागाचे भेददर्शी चित्रण करणे शक्य असते. सुरुवातीला यासांठी क्ष-किरणांचा उपयोग करून हाडे आणि सांधे यांच्या छायाचित्रप्रतिमा काढण्यात येऊ लागल्या. आता हे तंत्र अत्यंत गुंतागुंतीचे परंतु निदानाच्या दृष्टीने व्यापक उपयुक्ततेचे ठरले आहे.

साध्या क्ष-किरण चित्रणात क्ष-किरण नलिकेतून बाहेर पडणारे विकिरण सर्व दिशांनी सारख्या प्रमाणात पसरते. शरीराच्या सलग (अखंड) पृष्ठभागातून आत प्रवेश करणारे किरण हाडांसारख्या अपारदर्शक भागांकडून पूर्णपणे अडविले जातात. त्यामुळे त्यांची दाट छाया संवेदनशील छायाचित्रीय फिल्मवर तयार होते. इतर पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक भागांमधून जाणारे किरण विविध ऊतकांकडून कमीजास्त प्रमाणात शोषले जातात. त्यामुळे दुसऱ्या पृष्ठभागातून बाहेर पडलेले किरण जी प्रतिमा किंवा छाया निर्माण करतात, ती संपूर्ण मार्गातील सर्व ऊतकांच्या एकूण पारगम्यतेवर अवलंबून असते. अशा चित्रांमधून विविध स्तरांची माहिती अंदाजाने निष्कर्ष काढूनच मिळते. उदा., छातीच्या चित्रामध्ये फुफ्फुसातील एखादा विकृत वाटणारा ठिपका किती खोलीवर आहे. त्याचा नक्की विस्तार किती आहे, त्यात कोणत्या प्रकारचे ऊतक आहे, याचा निर्णय घेण्यात असापासच्या ऊतकांचा (हृदय, बरगड्या, पाठीचा कणा, छातीत साठलेले पाणी) अडथळा अपरिहार्यपणे येतो. या अडचणीवर मात करण्यासाठी छेदचित्रण (टोमोग्राफी) हे तंत्र शोधून काढले गेले. या पद्धतीत किरणोत्सर्ग नलिका, रुग्णाचे शरीर आणि संवेदनशील छायाचित्रीय फिल्म या तीन घटकांपैकी मधला घटक स्थिर ठेवून बाकीचे दोन त्याच्याभोवती चित्रण चालू असतानाच फिरविले जातात. या परिभ्रमणामुळे छायाचित्रीय फिल्मला समांतर अशा अनेक प्रतलांपैकी एकाच प्रतलातील ऊतकांचे स्पष्ट चित्र मिळते. त्याच्या खालचे व वरची सर्व प्रतले अस्पष्ट दिसतात (कारण ज्या अक्षाभोवती उपकरणाची हालचाल घडवून आणतात, तो अक्ष त्या विशिष्ट प्रतलातून जात असतो), अशा प्रकारे एकाच प्रतलाची प्रतिमा मिळविण्याची पद्धत संगणकाच्या आगमनापूर्वी प्रचलित होती.

बाहेर पडणारे किरण छायाचित्रीय फिल्मवर पडू देऊन त्यांच्या परिणामाचे मापन (निरीक्षण) नंतर फिल्म धुतल्यावर करण्याच्या या पद्धतीला काही मर्यादा पडतात. त्यातील विलंब हा दोष नाहीसा करण्यासाठी कमी खर्चाची पण मर्यादित संवेदनक्षमतेची अनुस्फुरणलेखन (स्वयंप्रकाशीलेखन) म्हणजे पटवीक्षण (स्क्रीनिंग) ही पद्धत वापरता येते. अंतर्भागांच्या हालचालींचे दर्शन आणि मोठ्या प्रमाणावर अनेक व्यकतींची प्राथमिक चाचणी यांसाठी ती उपयुक्त आहे परंतु विविध छटांच्या कमी-जास्त दाटपणाचे सूक्ष्म निरीक्षण करून प्रतिमेचे अर्थनिर्णयन करणे निरीक्षकाच्या अनुभवी दृष्टीलाही कधीकधी कठीण जाते. छायाचित्रीय फिल्मवर घेतलेल्या छायाचित्रांच्या बाबतीतही ही अडचण येऊ शकते. सोडियम आयोडाइड स्फटिकासारखे क्ष-किरण संवेदक वापरात आल्यावर ही अडचण दूर झाली.


क्ष-किरणाच्या परिणामाने या स्फटिकांमधून फोटॉन कणांच्या (प्रकाशकणांच्या) स्वरूपात ऊर्जापुंज बाहेर पडतात. ही ऊर्जा चमचम – मापनासाठी प्रकाशविद्युत्‌ वर्धकाचा (प्रकाशगुणकाचा) उपयोग केल्यास मापनाची माहिती संगणकात साठविता येते. क्ष-किरण चित्रणाची क्रिया पूर्ण झाल्यावर संगणकीय माहितीचे रूपांतर दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर पुन्हा प्रतिमेचे पुनर्रचन करण्यात होऊ शकते. जास्त स्पष्ट अशी ही प्रतिमा संगणकीय मापनामुळे सूक्ष्मभेदही दाखवू शकते. विविध पातळ्यांवरील छेदांच्या प्रतिमाही संगणक आपणास पुरवू शकतो. अशा प्रकारच्या छेदचित्रणाला संगणकीकृत छेदचित्रण किंवा संगणकीकृत अक्षीय छेदचित्रण (कॉम्प्युटराइज्ड ॲक्सियल टोमोग्राफी, सीएटी) म्हणतात. त्यात मिळणाऱ्या प्रत्येक प्रतलीय प्रतिमेच्या कोणत्याही दोन भागांमधील छटांच्या गडदपणात ०.५ प्रतिशत इतका फरक असला, तरी त्याची नोंद होऊ शकते. क्ष-किरण संवेदकांची मोठी संख्या (सु. १६०) आणि एका वेळी १0 असे जवळजवळ १८० अंशांतून रुग्णाभोवती परिभ्रमण करणारी यंत्रणा यांमुळे छेदचित्रणाची विभेदनक्षमता इतकी मोठी असू शकते.

क्ष-किरणांऐवजी गॅमा किरण, न्यूट्रॉन कण किंवा इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन यांसारखे विद्युत्‌ भारित कण वापरूनही छेदप्रतिमा निर्मिती करता येते. या सर्व प्रकारांमध्ये संगणकाची मदत घेतली जाते. (→वैद्यकीय प्रतिमादर्शन क्ष -किरण वैद्यक).

किरणोत्सर्गी द्रव्यांचे शरीरात आभरण करण्याची तंत्रे : या तंत्रांमध्ये जलद गतीने उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांना किरणोत्सर्गी समस्थानिकांचे मार्गण अणू खूणचिठ्ठी म्हणून जोडलेले असतात. केवळ काही तासांचे अर्धायुकाल (किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारे काळ) असलेले समस्थानिक यासाठी वापरले जातात. उदा., टेक्नेशियम (९९)–६ तास, आयोडीन (१३१) – ८ दिवस, टेल्यूरियम (२०१)–७३ तास हे समस्थानिकांचे अर्धायुकाल आहेत.

या मूलद्रव्यांपासून बाहेर पडणारे बीटा किंवा गॅमा उत्सर्जन योग्य त्या संवेदक उपकरणांच्या मदतीने बाहेरून सहज मोजता येतात. उदा., इलेक्ट्रॉनग्रास अभिज्ञातक, सर्वांगगणक, गॅमा कॅमेरा.

या मापनाने शरीरातील विशिष्ट प्रकारच्या कोशिका किंवा ऊतक यांमधील रचनात्मक किंवा चयापचयी (शरीरात सतत चालू असणाऱ्या भौतिकीय व रासायनिक घडामोडींमधील) बदलांचा आलेख मिळू शकतो. किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर क्ष-किरणांपेक्षा जास्त हानिकारक असल्याने अशा तंत्रांचा उपयोग मर्यादित प्रमाणावर केला जातो. (→अणुऊर्जेचे शांततामय उपयोग मार्गण मूलद्रव्ये समस्थानिक).

चुंबकीय अनुस्पंदनावर आधारित प्रतिमादर्शन : (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग एमआरआय). किरणोत्सर्गी समस्थानिक आणि क्ष-किरण यांच्या वापरामुळे कोशिकाजलामध्ये आयनीभवन (विद्युत्‌ भारित अणू, रेणू व अणुगट म्हणजे आयन निर्माण होण्याची क्रिया) होऊन अनेक घातक परिणाम होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी पर्यायी पद्धतींचा शोध चालू असता भौतिकीय विश्लेषण क्षेत्रात १९४६ पासून वापरात आलेली अणुकेंद्रीय चुंबकीय तंत्रे वैद्यकात वापरून पाहण्यात आली. जास्त सुरक्षित आणि ऊतकांची त्रिमितीय प्रतिमा देण्याची क्षमता जास्त असलेले यातील एक तंत्र १९७० सालानंतर हळूहळू वापरात येऊ लागले आहे. संगणकाची जोड असल्यमुळे तेही छेदचित्रणाप्रमाणेच यशस्वी ठरले आहे.

ज्या मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन या मूलकणांची संख्या विषम असते, त्यामध्ये चुंबकीय परिबल निर्माण होते व ते अणुकेंद्र एखाद्या सूक्ष्म अशा चुंबकाप्रमाणे नैसर्गिक रीत्या परिवलन करत असते. शरीरातील ऊतकांमधील अणूंपैकी हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस यांची अणुकेंद्रे ही हालचाल दाखवितात. त्याचप्रमाणे अतिसूक्ष्म प्रमाणात असणारे कार्बन (१३), ऑक्सिजन (१७) यांसारखे समस्थानिकही या गुणधर्मांमुळे मापनास उपलब्ध होऊ शकतात.

वैद्यकीय प्रतिमादर्शनासाठी रुग्णाला क्रमवीक्षण कक्षात झोपवून अत्यंत तीव्र अशा चुंबकीय ऊर्जेचा झोत विशिष्ट दिशेने शरीराच्या इच्छित भागावर सोडला जातो. या समांतर किरणांच्या प्रभावामुळे हायड्रोजनासारख्या (शरीरातील द्रव पदार्थातील पाण्याच्या रेणूंमधील हायड्रोजन) अणुकेंद्रांमधील परिवलनाची दिशा बदलून ते निराळ्या फिरत्या अक्षाभोवती होऊ लागते. डोलत राहणाऱ्या फिरत्या भोवऱ्या प्रमाणे हा अक्षीय बदल मूळ अक्षाशी एक विशिष्ट कोन साधून होत असतो. बाह्य विद्युत् चुंबकीय क्षेत्र बंद केल्याबरोबर सर्व केंद्रे आपल्या पूर्वस्थितीकडे परत जाऊ लागतात. ज्या कंप्रतेने केंद्रांचे अनुस्पंदन फिरत्या अक्षाच्या निर्मितीसाठी होत होते त्याच कंप्रतेने आता संकेतनिर्मिती होऊ लागते. चुंबकीय ऊर्जेची दिशा वारंवार बदलून हीच क्रिया वरचेवर घडवून आणली जाते. अशा प्रकारे मिळालेल्या अनेक संकेतांमधून अनुस्पंदन करणाऱ्या केंद्रकांची व्याप्ती किंवा प्रतिघनफळ संख्या मोजली जाऊन शरीराच्या त्या भागाचे त्रिमिती चित्र तयार होऊ लागते. (→वैद्यकीय प्रतिमादर्शन).

शरीराच्या अंतर्भागाचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारी उपकरणे : (अंतर्दर्शके). नाक, कान, घसा, बृहदांत्र (मोठे आतडे) किंवा योनिमार्ग यासारख्या क्षेत्राची तपासणी करण्यासाठी बाहेरून प्रकाशाची शलाका टाकण्यासाठी अनेक उपकरणे उपयोगात आणली जातात परंतु काही ठराविक अंतरापर्यंतच ती पोहोचू शकतात. लांब नलिका असलेली दरदर्शकासारखी उपकरणे त्यांच्या ताठर रचनेमुळे इजा पोहोचवू शकतात व लवचिक नलिकांमधून प्रकाश झोत आत पोहोचत नाही व आतील पृष्ठभाग दृश्यमान होत नाही. या सर्व मर्यादांमुळे अनेक वर्षे अंतर्दर्शनाचे क्षेत्र श्वसनमार्गाचा वरचा भाग (स्वरयंत्रदर्शन, श्वसनीदर्शन), मूत्राशय आणि मूत्रवाहिनीदर्शन, योनिमार्गदर्शन, बृहदांत्र दर्शन यांसारख्या तंत्रांपुरतेच मर्यादित होते. प्रकाशवाहक तंतूंच्या शोधामुळे आता ते विस्तारले आहे.

आधुनिक अंतर्दर्शकांमध्ये लवचिक प्रकाशवाहक तंतूंच्या साहाय्याने आतील पृष्ठभाग बाहेरून स्पष्ट दिसू शकतो किंवा त्याचे चित्रण दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर करता येते. आतील इंद्रियाला दृश्यमान करण्यासाठी आवश्यक तो प्रकाश नलिकेच्या टोकाशी असलेल्या छोट्याशा विद्युत्‌ घटमाला (विजेरी) दिव्यातून बाहेर पडत असतो. याशिवाय नलिकेत द्रव पदार्थ आत सोडण्यासाठी किंवा आतील द्रव बाहेर शोषून घेण्यासाठी स्वतंत्र मार्ग असतो. आवश्यकता पडल्यास आतील ऊतकाचा छेद घेण्यासाठी किंवा तपासणीसाठी नमुना गोळा करण्याकरिता आवश्यक असे उपकरण (कातरी किंवा सुरी) टोकाला बसवून त्याचे नियंत्रण बाहेरून करता येते. या सर्व सोयींमुळे आतील कोणत्याही पोकळ इंद्रियाचे किंवा उदरपोकळीसारख्या बंदिस्त जागेचे परीक्षण आणि शल्यकर्म चिकित्सकाला प्रत्यक्ष तो भाग डोळ्यासमोर असताना करणे शक्य झाले आहे. (→प्रकाशकी).

उपचारासाठी उपकरणे : वैद्यकीय क्षेत्रात उपचारासाठी वापरली जाणारी उपकरणे विविध आहेत. त्यांची तांत्रिक दृष्ट्या बदलती रूपे सतत विकसित होत असतात. स्थूलमानाने त्यांचे पुढील गटांमध्ये उल्लेख करता येतील. सविस्तर माहिती संबंधित तंत्रावरील नोंदीत अथवा स्वतंत्रपणे इतरत्र आली आहे.

गट एक : शरीराच्या एखाद्या भागाचे प्रमुख कार्य काही काळ पूर्णपणे पार पाडणारी यंत्रे यात येतात. मूळ इंद्रियाचे काम पूर्ववत सुरू होईपर्यंत किंवा शस्त्रक्रियेने योग्य ते बदल घडवून आणण्याकरिता अशा यंत्रांचा उपयोग केला जातो. यांचा दीर्घकाळ उपयोग खर्चिक व गैरसोयीचा ठरतो.

कृत्रिम मूत्रपिंडाचे कार्य अपोहनाच्या तत्त्वावर चालते. या यंत्रातून आठवड्यातून दोनतीन वेळा सु. तीन तास रक्ताचे अभिसरण करून रक्तातील उत्सर्जनयोग्य घटक काढून टाकले जातात. उदा., क्रिअटिनीन, यूरिया, यूरिक अम्ल. विषारी औषधांची विषाक्तता कमी करण्यासाठी देखील ते वरदान ठरते. अपोहनाच्या प्रक्रियेमध्ये रक्तजलातील ग्लुकोज, सोडियम, पोटॅशियम यांसारख्या आवश्यक घटकांचे उत्सर्जन होऊ नये म्हणून विशेष प्रकारचा अपोहन द्रव वापरावा लागतो. त्याच्या खर्चामुळे आणि संक्रमणाच्या धोक्यामुळे कृत्रिम मूत्रपिंडाच्या उपयोगावर मर्यादा पडतात. तरीही आता रुग्णाने घरच्या घरी वापरण्याची सुटसुटीत यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांच्यामुळे रुग्णालयात राहण्याचा खर्च वाचू शकतो. मूत्रपिंड आरोपणाच्या प्रतीक्षेत असणारे अनेक रुग्ण कृत्रिम मूत्रपिंडाचा दीर्घकाळ वापर करताना आढळतात. (→अपोहन वृक्क).

मेंदूतील श्वसनकेंद्राचे कार्य विषाक्ततेमुळे मंदावल्यास कृत्रिम श्वसनयंत्राचा उपयोग केला जातो. शस्त्रक्रियेसाठी शुद्धिहरण केले असता श्वसनाच्या स्नायूंचा (बरगड्यांचे स्नायू व मध्यपटल) अंगघात झाल्यावरदेखील हे यंत्र वापरता येते. फुफ्फुसांच्या नैसर्गिक हालचालींना पर्यायी हालचाल घडवून आणणारे पहिले श्वसनयंत्र (पोलादी किंवा लोह फुफ्फुस) १९२९ मध्ये फिलिप ड्रिंकर यांनी तयार केले होते. रुग्णाचे संपूर्ण शरीर, फक्त डोके बाहेर काढून, एका हवाबंद धातूच्या दंडगोलाकृती पात्रात ठेवले जाई. या पात्रातील हवेचा दाब नियमितपणे कमीजास्त करता येई व त्यामुळे फुफ्फुसांचे प्रसरण व आकुंचन अशा हालचाली घडत. आधुनिक श्वसनयंत्रे पंपाच्या मदतीने सौम्य दाबाने हवेचा प्रवाह श्वसनीमधून थेट फुफ्फुसांमध्ये सोडतात. प्रत्येक आवर्तनामध्ये हवा आत ढकलण्याची क्रिया थांबल्यावर छातीच्या व फुफ्फुसांच्या प्रतिक्षिप्त आकुंचनामुळे ती परत बाहेर फेकली जाते. आवर्तनांचा वेग कमीजास्त करून तो नैसर्गिक श्वसनाइतकाच ठेवता येतो. श्वसनीमधून नलिका आत घालण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया करून छेद घ्यावा लागतो. त्यामुळे नलिका घट्ट बसते.

हृदय आणि इतर तंत्रांच्या कार्यात काही बाधा नसल्यास अशा श्वसन यंत्रांच्या (पुनरुज्जीवन यंत्र) मदतीने रुग्णाला कित्येक आठवडे जिवंत ठेवता येते. या सुटसुटीत उपकरणाचा उपयोग अतिदक्षता विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे. यंत्र बंद केल्यास काही रुग्णांमध्ये नैसर्गिक श्वसनक्रिया पुन्हा सुरू होत नाही. अशा वेळी कृत्रिम श्वसन किती काळ चालू ठेवायचे ही वैद्यकीय नीतिमत्तेची समस्या आता उद्‌भवू लागली आहे. (→ श्वसन, कृत्रिम).

फुफ्फुसे आणि हृदय यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी संपूर्णपणे रक्तहीन आणि स्पंदनविरहीत क्षेत्र तयार करणे अत्यंत कठीण असते. कारण शरीरातील सर्व ऊतके (विशेषत: मेंदू) रक्तातून मिळणाऱ्या ऑक्सिजनाशिवाय दीर्घ काळ राहू दिली, तर त्यांच्यात कायमस्वरूपी (अपरिवर्तनीय) विघातक बदल घडून येतात. ही अडचण दूर करण्यासाठी १९५३ मध्ये जॉन गिबन (फिलाडेल्फिया) यांनी हृदय- फुफ्फुस यंत्र (रक्ताभिसरण – श्वसन यंत्र) हे यंत्र तयार केले. महानीलांमधून स्वीकारलेले रक्त या यंत्रामध्ये ऑक्सिजनयुक्त आणि कार्बन डाय – ऑक्साइडमुक्त केले जाते. नंतर ते पंपाने महारोहिणीत परत ढकलले जाते. या क्रियेमुळे हृदय व फुफ्फुसे दीर्घ काळ कार्यमुक्त राहतात. चक्रीपंपाच्या मदतीने रक्ताची हालचाल विनास्पंदन आणि रक्तलयन न होता घडून येते. आवश्यक तेव्हा रक्ताचे तापमान शीतनाने कमी करता येते. रक्तक्लथन (रक्त गोठण्याची क्रिया) टाळण्यासाठी हेपारीनचा वापर केला जातो. (→ हृदयविकार).

अपुऱ्या दिवसांच्या नवजात अर्भकांमध्ये अपरिपक्वतेमुळे श्वसन आणि ऊष्णतानिर्मिती समाधानकारक प्रमाणात नसतात. अशा अर्भकांना काही दिवस उबवण यंत्रात (उष्ण पेटीत) ठेवले जाते. तापमान नियंत्रण, ऑक्सिजनपुरवठा आणि संक्रामणापासून संरक्षण अशी तीनही कार्ये हे यंत्र करते. नवजात मृत्यूचे प्रमाण अशा यंत्रामुळे बरेच कमी झाले आहे. (→ नवजात अर्भक).

गट दोन : एखाद्या अवयवाचे कार्य सुधारण्यासाठी वापरली जाणारी कायमस्वरूपी उपकरणे या गटात येतात. अशी उपकरणे त्या व्यक्तींची वैयक्तिक उपयोगाची साधने असल्यामुळे ती त्यांची उपांगेच होतात. या गटात कृत्रिम हात किंवा पाय, दाताची कवळी, चष्मा, श्रवणयंत्र, अपंगाची चाकाची खुर्ची, शस्त्रक्रिया करून बसविलेले कृत्रिम सांधे, स्वरयंत्र किंवा अन्नमार्गाचा एखादा भाग काढून टाकल्यावर तेथे बसविलेली पर्यायी द्वारे यांचा यात समावेश होतो. नैसर्गिक अवयवांच्या कार्यामागचे भौतिक सिद्धांत समजावून घेऊन त्यांच्या आधारे ही उपांगे वैयक्तिक मोजमापानुसार तयार केली जातात. त्यांच्या रचनेमध्ये दोषनिवारणाबरोबरच शारीरिक सुखदता, विजातीय पदार्थांच्या ॲलर्जीप्रतिक्रियांपासून मुक्तता आणि सौंदर्यदृष्टी यांचा विचार केला जातो. (→ अवयव, कृत्रिम).


गट तीन : उपचारास उपयुक्त अशा शरीरबाह्य घटकांचे प्रदान किंवा वितरण करणारी उपकरणे यात येतता. उपचारक घटकाची तीव्रता किंवा संहती (प्रमाण), प्रदानाचा कालावधी, वारंवारता, मात्रा यांसारख्या गोष्टींचे गरजेनुसार तंतोतंत नियंत्रण करण्याचे कार्य अशा उपकरणांद्वारे होऊ शकते. उदा., (१) बॉइल बधिरीकरण यंत्र ऑक्सिजन, नायट्रस ऑक्साइड, ईथर इत्यादींचे प्रदान आवश्यक तशी मिश्रणे करून श्वसनावाटे देण्यासाठी वापरले जाते. (२) शिरेतून (नीलामधून) मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ देणे, अतिसंथ गतीने प्रभावी औषधांचे अंत:क्षेपण करणे आणि कर्करोगावरील औषधे नीलेतून किंवा अर्बुदाला रक्तपुरवठा करणाऱ्या विशिष्ट रोहिणीतून देणे या कामांसाठी विशेष रचना असलेले पंप किंवा अंत:क्षेपक वापरले जातात. (३) विद्युत्‌ आवेगाने उत्तेजन देण्यासाठी विविध उद्दीपन यंत्रे वापरण्यात येतात. स्नायूच्या तंत्रिकेस इजा झाली असता ती पूर्ण भरून येईपर्यंत स्नायूची ⇨अपपुष्टी होण्याची शक्यता असते. नीच कंप्रतेच्या विद्युत्‌ प्रवाहाने स्नायूचे थेट उद्दीपन नियमितपणे करीत राहिल्यास ही अपपुष्टी टाळता येते. मनोरुग्णावरील उपचाराचा एक प्रकार म्हणून ७० व्होल्ट ६० हर्ट्‌झ कंप्रतेचा विद्युत्‌ प्रवाह सु. ०.१ सेकंद डोक्याच्या दोन्ही बाजूंस टेकविलेल्या विद्युत्‌ अग्रांमधून सोडला जातो. त्यामुळे आकडी आल्यासारखे झटके येऊन काही काळ शुद्ध हरपते. नंतर या अनुभवाची स्मृती मात्र शिल्लक राहत नाही. हृदयामधील नैसर्गिक स्पंदनाला चालना देणारा गतिकारक ऊतक जेव्हा विकारग्रस्त होते, तेव्हा त्याचे काम करण्यासाठी गतिकारक उपकरण (पेसमेकर) वापरता येते. यामध्ये रुग्णाच्या शरीरात आरोपण केलेली एक दीर्घजीवी विद्युत्‌ घटमाला असते. आवश्यक तेव्हा, नैसर्गिक स्पंदन बंद पडल्यास, या विद्युत्‌ घटमालेतून बाहेर पडणारा आवेग हृदयास चालना देऊ लागतो. या सर्व उत्तेजकांमध्ये कमी कंप्रतेचे विद्युत्‌ प्रवाह निर्माण होतात. हीच कंप्रता १०,००० हर्ट्‌झपेक्षा जास्त वाढविली तर ऊतकांचे विद्युत्‌ उत्तेजन न होता त्याच ऊर्जेचे रूपांतर उष्णतेत होते. अशी उष्णता डायाथर्मी म्हणजे ऊतकतापन तंत्रात खोलवर शेक देण्यासाठी वापरता येते. विद्युत्‌ शल्यकर्मामध्ये तापून विनाशकारक झालेल्या विद्युत्‌ अग्राने ऊतकाचा नाश करता येतो. (→ ऊतकतापन चिकित्सा). (४) किरणोपचाराच्या उपकरणांपैकी जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांचा उपयोग मुडदूसामध्ये त्वचेतील डी जीवनसत्त्वाच्या सक्रियणास उत्तेजन देण्यासाठी करता येतो. हे किरण निर्माण करणाऱ्या सूर्यदीप नावाच्या एका उपकरणाचा उपयोग त्यातील लघुजंबुपार तरंगांच्या मदतीने त्वचेवरील व्रण (उदा., शय्या व्रण) निर्जंतुक करण्यासाठी होऊ शकतो. प्रकाशाच्या वर्णपटाच्या दुसऱ्या टोकाला असलेले अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरण निर्माण करणारा दिवा स्नायूंना किंवा सांध्यांना खोलवर पोहोचविणारा शेक देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

  क्ष-किरणांचा उपयोग कर्करोगांच्या कोशिकांचा नाश करण्यासाठी केला जातो. कोशिकाजलात आयनीभवनाची प्रक्रिया सुरू करून हे किरण आपले कार्य पार पाडतात. अशाच प्रकारची क्रिया असणारे बीटा आणि गॅमा किरण या उपचारांसाठी आता जास्त प्रभावी ठरले आहेत. किरणोत्सर्गी समस्थानिक (उदा., आयोडीन (१३१) किंवा कोबाल्ट (६०) ) किंवा रेडियमाच्या सुया यांचा वापर हे किरण प्राप्त करण्यासाठी केला जातो. न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यांसारख्या इतर कणांचा मारा करणारी यंत्रेही आहेत.

अशा प्रकारच्या सर्व किरणोपचारांचा वापर करताना त्यांचे निरोगी ऊतकावरील (विशेषत: रक्तोत्पादक अवयवावरील) घातक परिणाम टाळण्यासाठी वारंवार वैद्यकीय तपासणी आणि संबंधित तंत्राच्या कार्यक्षमतेची चाचणी करणे आवश्यक ठरते. किरणोत्सर्गाची संपूर्ण मात्रा ठरविण्यासाठी आणि तिचे वेळापत्रक आखण्यासाठी संगणकाचे साहाय्य उपयुक्त ठरते. (→ प्रारण चिकित्सा क्ष-किरण वैद्यक).

गट चार : शस्त्रक्रिया अथवा शरीरांतर्गत इतर काही हस्तक्षेपाचे व्यवहार करण्यासाठी उपयोगी साधने यात येतात. अवयवांचे छेदन, उत्पाटन, जोडणी, दाहकर्म यांसारख्या शल्यकर्मांसाठी सामान्य माणसाला परिचित असणाऱ्या सुरी, कात्री, चिमटा, सुईदोरा यांसारख्या यांत्रिक साधनांचा उपयोग वैद्यकशास्त्रात मोठ्या प्रमाणात होतो. त्यांच्या जोडीला अनेक प्रगत तंत्रे वापरून शल्यविशारदाचे कौशल्य आणि अचूकपणा वाढविणारी उपकरणे प्रचारात आहेत. त्यांत विशेष उल्लेखनीय म्हणजे, पुढील उपकरणे आहेत : (१) अंतर्दर्शकाला जोडलेली छेदन यंत्रे (२) श्राव्यातीत ध्वनितरंग, विद्युत्‌ प्रवाह किंवा ⇨लेसर किरण यांच्या अचूक माऱ्याने मूत्रमार्गातील खडे, अनावश्यक ऊतक किंवा अर्बुदे यांचे तुकडे करणारी उपकरणे (३) महावाहिन्या आणि हृदयाच्या झडपा आणि कप्पे यांच्यापर्यंत पोहोचून तेथे शल्यकर्म करणारी नलिकासदृश उपकरणे एखाद्या मोठ्या शिरेचा छेद घेऊन त्यातून आत घातलेले नलिकेचे टोक क्ष-किरण मार्गदर्शनाखाली इष्ट स्थळापर्यंत सरकवीत नेले जाते. छातीचा छेद न घेता, कमीत कमी बधिरीकरण वापरून हे हृदीय सुषिरी उपकरण वापरता येते (४) गोठण शस्त्रक्रिया यंत्र. या शीतन तंत्रात द्रव नायट्रोजनाचा प्रवाह नियंत्रित वेगाने वापरून ऊतकाचे संदमन वा अवसादन करता येते. मेंदूतील योग्य ते ऊतक सापडल्यावर शीतनाची तीव्रता वाढवून त्याचे रूपांतर गोठणात केले जाते. गोठणामुळे ऊतकात अपरिवर्तनीय बदल घडून येतात व ऊतकनाशनासारखाच परिणाम दिसू लागतो. तंत्रिका तंत्रावरील शस्त्रक्रियांसाठी गोठण तंत्र विशेष साह्यभूत झाले आहे. उदा., पार्किनसन रोगात मेंदूच्या तळाशी असलेले तंत्रिकागुच्छ या पद्धतीने कार्यहीन करता येतात. [→ शल्यतंत्र व शालाक्यतंत्र शस्त्रक्रिया तंत्र] .

प्रयोगशाळेतील उपकरणे : रोगनिदानासाठी किंवा प्रागनुमानासाठी शरीरातील जैवद्रव्ये प्रयोगशाळेत तपासली जातात. चयापचयी रोगांमुळे घडून येणारे जीवरासायनिक बदल, संक्रामणाचे अस्तित्व सिद्ध करणारे प्रतिरक्षा तंत्रीय (रोगप्रतिकारदर्शक) प्रतिसाद, अर्बुदजन्य कोशिकांचे अस्तित्व दाखविणारे ऊतकांमधील बदल [→ अर्बुदविज्ञान], औषधे आणि विषारी पदार्थांचे शरीरातील प्रमाण इत्यादींच्या अभ्यासासाठी काही विशेष उपकरणांची मदत घेतली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही रासायनिक प्रयोगशाळेत आढळणारी सामान्य उपकरणे सोडली, तर वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये पुढील प्रकारची उपकरणे वापरली जातात.

जीवरासायनिक उपकरणे : रासायनिक चाचण्यांचे अंतिम परिणाम मापण्यासाठी वर्णमापक, वर्णपट – प्रकाशमापक, जंबुपार आणि अवरक्त वर्णपट – प्रकाशमापक, प्रथिनांच्या पृथक्करणासाठी ⇨विद्युत्‌ संचारण उपकरण, रक्तातील वायूंचे पृथक्करण करणारे यंत्र, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादींच्या मापनासाठी ज्योत प्रकाशमापक, किरणोत्सर्गी – प्रतिरक्षा तंत्रीय पद्धतीवर आधारित हॉर्मोनांचे मापन करण्यासाठी किरणोत्सर्गाचे मापन करणारे उपकरण, याशिवाय जैवसंवेदन पद्धतीवर आधारित (जैवग्राहीला जोडलेली इलेक्ट्रॉनीय ऊर्जापरिवर्तक यंत्रणा ज्यात बसविली आहे असा संवेदक) उपकरणेही आता विशिष्ट पदार्थाच्या मापनासाठी विकसित होत आहेत उदा., ग्लुकोजमापक. (→ जीवरसायनशास्त्र).

सूक्ष्मजीववैज्ञानिक उपकरणे : सूक्ष्मदर्शक, अनुस्फुरण, कृष्ण क्षेत्र दीप्ती यांसारख्या विशेष तंत्रांनी सूक्ष्मदर्शकाची उपयुक्तता वाढविणारी पूरक साधनसामग्री, सूक्ष्मजीवसंवर्धनासाठी उष्ण पेटी, संवर्धांच्या गणनासाठी समूहगणक, प्रतिजन – प्रतिपिंड प्रक्रियांच्या निरीक्षणासाठी विशेष नलिका आणि मापन यंत्र, प्रायोगिक प्राण्यांमध्ये द्रव्य टोचून संक्रामणाची चाचणी घेण्यासाठी आवश्यक अशी उपकरणे वगैरे. [→ सूक्ष्मजीवविज्ञान].

विकृतिवैज्ञानिक उपकरणे : रक्तामधील कोशिकांचे गणन करण्यासाठी रक्तकोशिकामापक, हीमोग्लोबिनमापक, रक्तकोशिका अवसादन वेगमापनाच्या नलिका, ऊतक परीक्षेसाठी मेणाचे ठोकळे तयार करण्याची आणि त्यांचे पातळ छेद करणारी साधने, ऊतकांचे त्वरित निरीक्षण करण्यासाठी संशीतक सूक्ष्मछेदक इत्यादी.

मोठ्या रुग्णालयांत सर्व प्रकारच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या तपासणीसाठी केवळ सूक्ष्म प्रमाणात द्रव्य घेऊन त्याचे स्वयंचलित उपकरणांच्या मदतीने विश्लेषण करण्याची आणि संगणकाच्या मदतीने सर्व माहिती भविष्यकालीन उपयोगासाठी साठविण्याची आता प्रवृत्ती वाढत आहे. मानवी हाताळणीचा तंत्रज्ञांना होऊ शकणारा धोका कमी करणे आणि अचूकपणा वाढविणे ही उद्दिष्टेही आधुनिक उपकरणांनी साधली जातात. [→ विकृतिविज्ञान विकृतिविज्ञान, उपरुग्ण].

पहा : अवयव, कृत्रिम जीवोतक परीक्षा तुंबडी लावणे प्रारण चिकित्सा रोगनिदान विद्युत् मस्तिष्कालेखन विद्युत्‌ हृल्लेखन वीर्यसेचन, कृत्रिम वैद्यकीय प्रतिमादर्शन श्रवण साहाय्यक श्वसन, कृत्रिम स्टेथॉस्कोप क्ष-किरण वैद्यक.

संदर्भ : 1. Foster, E. Equipment for Diagnostic Radiography, Lancaster, England, 1985.

           2. Khandpur, R. S. Handbook of Biomedical Instrumentation, Bombay, 1987.

           3. Webster, J. G. Encyclopedia of Medical Devices and Instrumentation, Vol. 1 to 4, New York, 1988.

श्रोत्री, दि. शं.

नवजात अर्भकासाठी सूक्ष्मप्रक्रियक नियंत्रित 'कृत्रिम श्वसन यंत्र' कमी वजनाच्या अर्भकासाठी सूक्ष्मप्रक्रियक नियंत्रित 'उबवण यंत्र' (पुनरुज्जीवनकारी उपकरण)
पूर्ण वेशुद्धवस्था किंवा शस्त्रक्रियेसाठी शुद्धीहरण करताना श्वसन क्रिया तात्पुरती बंद पडल्यास उपयुक्त असलेले 'कृत्रिम श्वसन यंत्र' नाडीची गती व ताकद आणी रक्तातील ऑक्सिजनाचे प्रमाण सतत दर्शविणारे व धोक्याची सूचना देणारे सूक्ष्मप्रक्रियक नियंत्रित 'नाडी-ऑक्सिजनमापक उपकरण'
बॉईलचे बहुउद्देशीय व बहुउपयोगी सुटसुटीत 'बधिरीकरण उपकरण' हृदयक्रिया अनियमित झाल्यास किंवा बंद पडल्यास विद्युत झटके देऊन हृदयाचे ठोके नियमित करणारे उपकरण
संगणक नियंत्रित 'विद्युत मस्तिष्कालेखन उपकरण' संपूर्ण शरीराच्या प्रतीमादर्शनासाठी व पुनारावलोकनासाठी संगणक नियंत्रित 'श्राव्यातील-ध्वनि-प्रतिमादर्शन उपकरण'
डॉपलर परिणामावर आधारित रंगीत प्रतिमा देणारे व संगणक नियंत्रित 'श्राव्यातील-ध्वनि-रंग-प्रतिमादर्शन उपकरण' अनुरूपुरण लेखन (स्वयंप्रकाशी लेखन) उपकरण
अनुसूचित प्रतिमादर्शन व क्ष-किरण छायाचित्र लेखनासाठी उपयुक्त 'क्ष-किरण उपकरण' संगणकी अक्षीय छेदचित्रण (CAT,कॅट स्कॅन)उपकरण