ड्वाईट आयझन हौअर

आयझन हौअर, ड्वाईटडेव्हिड : (१४ ऑक्टोबर १८९० – २८ मार्च १९६९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा चौतिसावा अध्यक्ष आणि उत्कृष्ट सेनापती. डेनिसन (टेक्सस) येथे जन्मला. १९१५ मध्ये अमेरिकेच्या लष्करी अकादमीतून पदवी घेतली व लष्करात सातत्याने काम केले. दुसऱ्या महायुद्धात त्याची अमेरिकेच्या यूरोप खंडातील फौजांचा मुख्य सेनानी म्हणून नेमणूक झाली (१९४२). तेथे असताना उत्तर आफ्रिकेच्या स्वारीच्या वेळी त्याने दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचे नेतृत्व केले. याशिवाय इंग्लिश खाडीतून जर्मनीकडे सैन्य उतरविणाच्या मोहिमेचे नेतृत्वही त्यानेच केले. जॉर्ज मार्शलनंतर आलेले सैन्याचे प्रमुखपद त्याने केवळ कोलंबिया विद्यापीठाच्या अध्यक्षपदासाठी सोडले (१९४८). त्यानंतर १९५१ मध्ये नाटो करारान्वये सेनाधिपत्य करण्यासाठी त्याची नेमणूक झाली. १९५३ मध्ये त्याने ह्या पदाचा राजीनामा दिला व रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षीय निवडणूक लढवून तो यशस्वी झाला. १९५३ ते १९६१ पर्यंत तो अमेरिकेचा अध्यक्ष होता. परराष्ट्रीय धोरणात परराष्ट्रमंत्री डल्लेस तर अंतर्गत राजकारणात उपाध्यक्ष निक्सन यांच्यावर त्याची भिस्त हो ती. त्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला. कोरियामध्ये शांतता स्थापण्यासाठी तो झटला. नि:शस्त्रीकरणासाठी त्याने रशिया व इतर देशांशी वाटाघाटी केल्या. नाटो, सीटो इ. करार केले. साम्यवादाच्या प्रसाराविरुद्ध त्याने मध्यपूर्वेकडील देशांना लष्करी आणि आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. त्यास आयझनहौअर जाहीरनामा म्हणतात. या जाहीरनाम्यानुसार अमेरिकेने लेबाननला जुलै १९५८ मध्ये मदत पाठविली. अंतर्गत राजकारणात देशव्यापी कार्यक्रम आखून निग्रोंचा प्रश्न हाताळला. बेकारी निवारणासाठी प्रकल्पांची आखणी केली.

सेनापती या दृष्टीने ‘आईक’ दूरदृष्टीचा होता. विसाव्या शतकातील नामांकित सेनानींमध्ये त्याचे स्थान महत्वपूर्ण आहे. राजकारणात तो संयमी वृत्तीचा होता आणि हाती घेतलेल्या कार्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची त्याची तयारी असे. त्याचे ग्रंथ व स्फुट लेखन प्रसिद्ध असून त्यांपैकी क्रुसेड इन यूरोप (१९४८), द व्हाइट हाऊस इअर्स – २ खंड (१९६३), ॲट ईझ (१९६८) ही पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. वॉशिंग्टन डी. सी. येथे तो मरण पावला.

संदर्भ :  1. Larson, A. Eisenhower, London, 1969.

             2. McCann, K. Man from Abilene, New York, 1952.

देशपांडे, सु. र.