आलेक्सांड्री, व्हासीले : (२१ जुलै १८२१–२२ ऑगस्ट १८९०). रूमानियन भावकवी व नाटककार. मॉल्डेव्हियातील बाकऊ येथे जन्म. प्रारंभीचे शिक्षण याशी येथे झाले. १८३४–१८३९ या काळात वैद्यकशास्त्र व कायदा या विषयांचे शिक्षण घेण्यासाठी तो पॅरिसला गेला तथापि साहित्याचे विशेष आकर्षण वाटून त्याने ते शिक्षण अर्धवट सोडले व तो याशीला परतला. त्याने रूमानियन लोकगीतांचे व वीरगीतांचे काही संग्रह प्रसिद्ध केले (१८४४, १८५२, १८५३). त्याच्या साहित्यनिर्मितीत सु. तीनशे कविता व पन्नास नाटके यांचा अंतर्भाव होतो. Doine si Lacramioare (१८५३) हा भावकवितांचा संग्रह व Pasteluri (१८६७) हा निसर्गकवितांचा संग्रह हे उल्लेखनीय आहेत. त्याने काही सुखात्मिका लिहिल्या असल्या, तरी त्याची काव्यात्म नाटके रंगभूमीवर अधिक महत्त्वा ची ठरली. त्यांत Despot Voda (१८७९), Fantana Blanduziei (१८८४) व Ovidiu (१८८५) ही विशेष महत्त्वा ची आहेत. आधुनिक रूमानियन साहित्याय त्याचे स्थान मोठे आहे. साहित्यनिर्मितीखेरीज रूमानियाच्या राजकीय क्षेत्रातही त्याने विशेष कामगिरी केली. रूमानियातील लहान लहान संस्थानांचे एकीकरण करण्याच्या चळवळीतील तो एक प्रमुख नेता होता. याशी प्रांतातील मीर्चेश्ट या गावी त्याचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.