पक्ष्यांचा थाटमाट : (बर्ड डिस्प्ले). काही प्राणी आपल्या भावना, मनातील हेतू अगर काही संदेश द्यावयाचा असल्यास शरीराच्या विशिष्ट हालचालींचे उत्कट प्रदर्शन करून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात. प्राण्यांतील अशा वैशिष्ट्यपूर्ण हालचाली प्रामुख्याने पक्ष्यांत आढळतात. त्यांचे फुगीर शरीर, चोच, पंख, पिसारा व पिसांचे निरनिराळे आकर्षक रंग ह्या सर्वांमुळे पक्ष्यांचे हावभाव फारच सूचक होऊ शकतात. निरनिराळ्या कारणांसाठी केल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या ह्या हालचाली पक्ष्यांच्या वर्तनाचाच एक महत्त्वाचा भाग समजला जातो, त्यास ‘पक्ष्यांचा थाटमाट’ किंवा ‘पक्ष्यांचा दिमाख’ असे म्हटले जाते.

पक्षी एकाकी असो किंवा समूहात असोत ते काही विशिष्ट अर्थ असलेल्या परिपाठीच्या हालचाली, तसेच थाटमाटही करतात. उदा., उन्हे पडू लागताच पक्षी नानाविध आवाज करून, इकडून तिकडे भराऱ्या मारून, अन्न शोधण्यास बाहेर पडण्याची वेळ झाली आहे, असे इतरांना सुचवितात. पोट भरल्यावर पंख व शेपूट पसरून जणू काही स्वस्थ व सुस्तपणे उन्हात बसतात पिसे साफसूफ करू लागतात. अर्थात एखादे उन्हाने अगदी गरम झालेले ठिकाण असेल, तरीही पंख व शेपूट पसरून इतरांना सूचना दिली जाते. ह्या व अशा प्रकारच्या एकासारख्या एक हालचालींमुळे काही वेळा त्यातल्या परिपाठाच्या कोणत्या आणि थाटामाटाच्या कोणत्या हे सांगणे काहीसे अवघड पडते.

प्रकार : पक्ष्यांच्या थाटमाटाचे कारणानुसार पुढीलप्रमाणे काही प्रकार पडू शकतात.

धमकी दाखविण्याचा थाटमाट : ह्या प्रकारात दुसरे पक्षी किंवा प्राणी ह्यांना भीती वाटून ते पुढे येण्याऐवजी परत फिरून जावेत असा हेतू असतो. काही पक्षी (उदा., गॅनेट, बूबी) जवळपास कोणीही फिरकल्यास लहानशा भाल्यासारखी चोच एकदम विस्फारून, पंख पसरून आक्रमक व भीती वाटेल असा देखावा करतात. काही पक्ष्यांत ह्याच बरोबर विविध प्रकारचे आवाज करून, पंख फडफडवून, चोचीची जोरात उघडझाप करून, चोच मिटताना आवाज करून, आक्रमक पवित्रा घेऊन, हल्ला चढविण्याच्या आवेशाने चढाई करतो आहे असे दाखवून परभक्षी (दुसरे प्राणी मारून खाण्याची सवय असलेल्या)प्राण्यास परतविण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषत: घरट्यातील पिलांचे रक्षण करताना असे हावभाव केले जातात. आपल्या निवाऱ्याच्या जागी कोणी येते आहे असे वाटताच घुबड आक्रमक पवित्रा घेते किंवा तसा बहाणा करते व स्वत:चा बचाव करते. त्यासाठी ते लगेच आपले गोल, लालसर नारिंगी डोळे विस्फारून अधिकच मोठे करते. डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या-लहान करते, पिसे आणि पंख अशा तऱ्हेने उंचविते व कमानीसारखे करते की, भीती वाटावी. बाजूच्या फांद्या व पाने हालून सळसळणारा आवाज होत असताना त्यातच घुबडही फुत्कारल्यासारखे ओरडते व चोचीची जोरात उघडझाप करून विचित्र आवाजात भर टाकते. ह्या सर्वांचा परिणाम खचितच भीतिदायक होतो. वॉर्ब्लर, कस्तूर (थ्रश) वगैरे पक्षीही आक्रमक पवित्रा घेतात. नर वॉर्ब्लर तर विणीच्या हंगामात आपला ताबा असलेल्या घरट्याच्या प्रदेशात शिरकाव करणाऱ्या दुसऱ्या नरास अशाच आक्रमक पवित्र्याने परतवितो. एरवी खेळीमेळीने राहणारे एकाच जातीचे पक्षी विणीच्या हंगामात प्रादेशिक हक्कासाठी नुसते धमकीचे आक्रमक पवित्रेच घेतात असे नाही, तर प्रत्यक्ष हल्लेही चढवितात.

गोंधळात टाकण्यासाठी किंवा लक्ष दुसरीकडेच वेधण्यासाठी केलेले प्रदर्शन : ह्या प्रकारात पक्षी आजारी असल्याचे किंवा दुखापत झाल्याचे ढोंग करतात. उदा., किलडीअर प्लव्हर, मॅलार्ड बदक आपल्या घरट्याजवळ किंवा पिलाजवळ कोणी परभक्षी येत आहे असे वाटताच दुखापत होऊन लंगडल्याचा बहाणा करून बाजूला जाऊ लागतात. स्वाभाविकच परभक्षी प्राण्याचे लक्ष पक्ष्याकडे म्हणजे घरटे व पिलांपासून दुसरीकडे वेधले जाते आणि धोका टळू शकतो. जांभळा सँडपायपर हा पक्षी तर पळ काढणाऱ्या लहानशा स्तनी (सस्तन)प्राण्यासारखे सोंग घेतो व कठीण प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतो.

निराश किंवा हताश झाल्याचे प्रदर्शन : ह्या प्रकारात परिपाठातील हालचालींशी खूपच साम्य आढळते. उदा., घरट्याकडे परतण्याची ओढ असलेल्या पक्ष्याच्या वाटेत मनुष्य किंवा इतर कोणी येऊन अडथळा निर्माण झाला की, पक्षी चटकन इतर काही तरी हालचालीत मग्न असल्याचे भासवितो. अशा वेळी चोचीने अन्न टिपत आहे किंवा पिसे साफसूफ करीत आहे किंवा चोच पंखात खुपसून झोपी गेला आहे असा बहाणा करून तो वेळ मारून नेतो. कारण नाइलाज व निराशेपोटी त्याला परिपाठातील काही तरी करतो आहोत, असे भासविण्याखेरीज अन्य मार्ग उरत नाही.


प्रियाराधनासंबंधीचे थाटमाट : सहचारिणी निवडणे, तिला निरनिराळे हावभाव करून रंगीत पिसाऱ्याचा भपकेदार पोशाखासारखा वापर करून आपल्याकडे आकृष्ट करणे, बोलावणे, निरनिराळ्या प्रकारांनी आगतस्वागत करणे अशा अनेक तऱ्हांनी प्रियाराधनासाठी पक्षी थाटमाट करीत असतात. ह्यात बरेच प्रकार असले, तरी सर्वांचा उद्देश लैंगिक स्वरूपाचा असतो. प्रजोत्पादनाचा हेतू बाळगून हे सर्व थाटमाट केले जातात. ह्या प्रकारांत सामान्यत:  नर पुढाकार घेताना आढळतात.

पक्ष्यांच्या थाटमाटाचे विविध प्रकार : (१) गॅनेट-चोच विस्फारून व पंख पसरून आक्रमक पवित्रा घेताना (२) बूबी-हा सागरी पक्षी चोच विस्फारून व पंख पसरून पिलांचे संरक्षण करताना (३) हंस-प्रियाराधनात जोडीदाराचे स्वागत करताना (४) किलडीअर प्लव्हर-दुखापत होऊन लंगडल्याचा बहाणा करताना (५) वॉर्ब्लर-आपल्या प्रदेशात शिरकाव करणाऱ्या दुसऱ्या नरास परतविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेताना (६) कुररी-प्रियाराधनात जोडीदाराचे स्वागत करताना (७) सेज ग्राऊझ- शेपटीचा पिसारा फुलवून व वायुकोश फुगवून माद्यांकडे दिमाखाने जाण्याच्या तयारीत असताना (८) मोर-आकर्षक रंगांचा पिसारा उंचावून थाटमाट करताना.

विणीच्या हंगामाच्या वेळी मोर मुद्दाम वाढविलेल्या, अत्यंत आकर्षक रंगाच्या शेपटीच्या पिसांचा सुंदर पिसारा उंचावून नाचल्यासारखे हावभाव करून लांडोरीस बोलावताना आढळतो. नीळकंठ अथवा चास पक्षी (नर) मादीच्या समोर भराऱ्या मारून दाखवितो. कधी कधी तो खूप उंच उडतो आणि डोके खाली करून व एकदम पंख मिटून खाली सूर मारतो पण जमिनीजवळ आल्याबरोबर पुन्हा पंख पसरून वर उडतो. त्याच्या या सगळ्या कसरती मादीला खूष करण्याकरिता असतात. उत्तर अमेरिकेतील सेज ग्राउझचा नर हा आपल्या शेपटीचा पिसारा तर फुलवतोच पण गळ्याजवळील दोन वायुकोश तो खूपच फुगवतो पंख विशिष्ट पद्धतीने दुमडून पुढे आणतो व अगदी दिमाखाने चालत माद्यांकडे जातो, जाता जाता वायुकोशातील हवा बाहेर सोडून नानाविध, चित्रविचित्र आवाज करण्यासही तो कमी करीत नाही. कित्येक पक्षी हरतऱ्हेचे आवाज करून, गोड गाणी गाऊन सहचारिणीस बोलावतात. त्यानंतर हंस, कुररी (टर्न) इ. पक्षी जोडी ठरली की, एकमेकांचे स्वागत करण्यासाठी सुंदरसुंदर हावभाव करतात. उदा., एकमेकांना मानेने कवटाळणे, पंख घासणे, चोचींनी एकमेकांना डोक्यावर, मानेखाली गमतीने टोचणे वगैरे प्रकारांनी जोडी मीलनास उद्युक्त होते.

ह्या सर्व प्रकारांनी प्रियाराधन व मीलन होते. त्यानंतर जोड्या-जोड्यांनी वास्तव्य, घरटी बांधण्यास मदत, प्रदेशाचे, अंड्यांचे, पिलांचे रक्षण करणे इत्यादींसाठी परत थाटमाटाचे प्रकार अवलंबिले जातात.

संदर्भ: 1. Armstrong, E. A. Bird Display and Behaviour, New York, 1965.

   2. Paul Hamlyn ltd. (Publisher) Birds, Birds, Birds, Birds, London, 1966.

परांजपे, स. य.