केशवाहिनी : (केशिका). रक्तपरिवहन आणि लसीका तंत्रातील [रक्तद्रवाशी साम्य असलेला लसीका नावाचा द्रव वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या तंत्रातील, → लसीका तंत्र] सूक्ष्मतम वाहिन्यांना केशवाहिन्या अथवा केशिका असे म्हणतात.

रोहिणिका (लहान रक्तवाहिनी) आणि नीलिका (लहान नीला) यांना जोडण्याऱ्या या सूक्ष्म नळ्या असून त्यांचा व्यास ०.०००८ मिमी. पासून ०·००१२ मिमी. पर्यंत असतो. केशवाहिन्यांच्या भित्ती अगदी पातळ, एकाच कोशिकाथराच्या (पेशींच्या थराच्या) असतात. रोहिणिकांच्या शेवटी केशवाहिन्यांच्या उगमापाशी असलेल्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे केशवाहिन्यांतील रक्तप्रवाहाचे नियंत्रण होत असते. ज्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचे) कार्य वेगाने चालू असते, तेथील केशवाहिन्यांचे स्नायू प्रसारित झाल्यामुळे त्या केशवाहिन्यांतून रक्तप्रवाह अधिक प्रमाणात चालतो. ज्यावेळी ऊतककार्य थंडावलेले असते त्यावेळी ते स्नायू आकुंचित झाल्यामुळे केशवाहिन्यांतून रक्तप्रवाह कमी होतो अथवा बंद पडतो. 

रक्तातील अन्नद्रव्यांचा ऊतकांना पुरवठा करणे, तेथील चयापचयामुळे (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींमुळे) उत्पन्न होणारे निरूपयोगी पदार्थ वाहून नेणे आणि रक्त व ऊतक यांच्यामध्ये वायूंची देवघेव घडविणे ही कार्य केशवाहिन्या करीत असतात.

केशवाहिन्यांच्या भित्ती अगदी पातळ एककोशिकात्मक असल्यामुळे त्या पारगम्य असतात. रक्तातील अन्नपदार्थ त्या भित्तीतून बाहेर पडू शकतात. अशा पातळ भित्तीतून उच्चसंहती असलेले (विरघळवलेल्या पदार्थाचे प्रमाण अधिक असलेले) विद्राव कमी संहती असलेल्या विद्रावाकडे जाऊ शकतात आणि द्रव पदार्थ उलट दिशेने जातो. या क्रियेला ‘तर्षण क्रिया’ असे म्हणतात. ज्या जोराने द्रव पदार्थ अधिक संहत विद्रावाकडे आकर्षिला जातो त्याला ‘तर्षण दाब’ असे म्हणतात. हा दाब जितका अधिक तितकी तर्षण क्रिया अधिक वेगाने होते. केशवाहिन्यांच्या भित्तीमधून अन्नपदार्थ बाहेर पडण्याला तर्षण क्रियेचे साहाय्य होते.

केशवाहिन्यांच्या भित्तीला पातळ कोशिका एकमेकींस जेथे चिकटलेल्या असतात तेथे कोशिकासंधान (कोशिकांना सांधणारा) पदार्थ असून तो कॅल्शियम प्रोटिनेटाचा बनलेला असतो. या पदार्थामध्ये कमीजास्त आकाराची सूक्ष्म छिद्रे उत्पन्न होऊन त्यांमधून कमी जास्त आकाराचे रेणुमय पदार्थ केशवाहिन्यांच्या बाहेर पडून ऊतकाकडे जाऊ शकतात.

रक्तदाब, तर्षण दाब, संधान पदार्थांमधील छिद्रांचा आकार, पदार्थांची विद्राव्यता (विरघळण्याचे प्रमाण) वगैरे अनेक गोष्टींवर केशवाहिन्यांतून पदार्थ बाहेर पडण्याची क्रिया अवलंबून असते.

ढमढेरे, वा. रा.