ग्लटकॉव्ह, फ्यॉडर : (९ जून १८८३–२० डिसेंबर १९५८). सोव्हिएट कादंबरीकार.जन्म चेरनाव्हका येथे. शिक्षक व युद्धवार्ताहर म्हणून कामे केली. १९०० पासून त्याच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. ग्लटकॉव्हच्या आरंभीच्या कथांवर गॉर्कीचा प्रभाव आहे. त्सेमेंत (१९२५, इं. शी. सिमेंट) ह्या कादंबरीमुळे तो प्रसिद्धीस आला. यादवी युद्धानंतरच्या रशियातील औद्योगिकीकरणाचे आणि कामगारवर्गाचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. पूचिना (१९२३, इं. शी. द डीप) आणि एनेर्गीया (१९३२–३८, इं. शी. एनर्जी) ह्या त्याच्या आणखी काही उल्लेखनीय कादंबऱ्या.

पोवेस्त ओ द्येत्‌स्वे (१९४९, इं. शी. द स्टोरी ऑफ चाइल्डहूड), व्होलनित्सा (१९५०, इं. शी. द फ्री मेन), लीखाया गोदिना (१९५४, इं. शी. हार्ड टाइम्स) आणि मित्सेझ्‌नाया यूनस्त (१९५६, इं. शी. इनसर्जंट यूथ) ह्या त्याच्या कादंबऱ्या आत्मचरित्रात्मक आहेत. त्याच्या कादंबऱ्या भावनाप्रधान असून शैली आलंकारिक आहे.

सोव्हिएट टीकाकार ग्लटकॉव्हला श्रमजीवी वर्गाचा एक खराखुरा प्रातिनिधिक लेखक समजतात. १९५० व ५१ साली त्याला शासकीय पुरस्कारही मिळाले. मॉस्को येथे तो निधन पावला.

पांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)