यिस्येन्यिन, स्यिरग्येई अल्यिक्सांद्रव्ह्यिच : (३ ऑक्टोबर १८९५−२८ डिसेंबर १९२५). थोर सोव्हिएट कवी. रशियातील र्‌यझान प्रांतात कॉस्टंटिनोवो (आता यिसेन्यिनो) या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मला. त्या गावातील शाळेतच त्याचे आरंभीचे शिक्षण झाले. पुढे मॉस्कोच्या शान्याव्हस्की मुक्त विद्यापीठात तो शिकू लागला. मॉस्कोला आला, तेव्हा तो सतरा वर्षांचा होता. बालपणापासूनच तो कविता लिहू लागला होता. रशियाच्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि लोककाव्याच्या परंपरेशी निकटचे नाते असलेल्या यिस्येन्यिनचे मॉस्को, पेट्रोग्राड (आताचे लेनिनग्राड) ह्यांसारख्या शहरांतील वाङ्मयीन वर्तुळांत स्वागत झाले. अल्यिक्सांडर ब्लॉक, न्यिकलाय क्‌ल्यूयेव्ह ह्यांसारख्या कवींशी त्याचा परिचय झाला. ‘डे ऑफ द डेड’ (१९१६, इं. शी.) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्याच्या ‘अदरलँड’ (१९१८, इं. शी.) या काव्यात त्याने १९१७ साली झालेल्या बोल्शेव्हिक क्रांतीचे स्वागत केले. १९२२ साली विख्यात अमेरिकन नर्तिका इझाडोरा डंकन हिच्याशी त्याने विवाह केला. तिच्याबरोबर त्याने यूरोप-अमेरिकेचा दौरा केला. यिस्येन्यिनचा हा विवाह यशस्वी झाला नाही आणि दोघांनी फारकत घेतली. त्यानंतर यिस्येन्यिन रशियात परतला. मद्यपानाच्या तो बराच आहारी गेला होता. शिवाय क्रांत्युत्तर रशियातील औद्योगिकीकरण व शहरीकरण ह्यांमुळे बदललेले ग्रामीण जीवन पाहूनही त्याची निराशा झाली होती. लेनिनग्राड येथील एका हॉटेलात त्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी निरोपाची एक कविता त्याचे स्वतःच्या रक्ताने लिहून ठेवली होती.

पारंपरिक ग्रामीण कृषिक जीवन आणि समाज ह्यांबद्दल यिस्येन्यिनला प्रेम होते. त्या जीवनांचे रंग त्याच्या मनात भिनले होते. यिस्येन्यिनच्या आरंभीच्या कवितेतून नादमधुर शब्दरूप घेऊन हे रंग उमटले आहेत. विलोभनीय भावगेयता हे ह्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. ‘इमॅजिनीझम’ ह्या नावाचा जो एक काव्यसंप्रदाय १९१९ नंतर रशियात उदयास आला होता, त्याचा प्रभाव यिस्येन्यिनवर होता. आत्मनिष्ठ अभिव्यक्तीचे वाहन आणि काव्यनिर्मितीचे मूलतत्त्व म्हणून ह्या संप्रदायातील कवींनी प्रतिमेला महत्त्व दिले. समकालीन सामाजिक-राजकीय प्रश्नांबाबतची उदासीनता आणि भूतकालाचे आदर्शीकरण ही ह्या संप्रदायाची अन्य वैशिष्ट्ये होती. ‘कन्फेशन्स ऑफ ए हूलिगन’ (१९२४, इं. शी.) आणि ‘मॉस्को ऑफ द टॅव्हर्न्‌स’ (१९२४, इं. शी.) ह्या यिस्येन्यिनच्या विशेष उल्लेखनीय काव्यकृती. महान ऑक्टोबर क्रांतीनंतरचा रशिया जे नवे रूप धारण करीत होता, त्याच्याशी जुळवून न घेता आल्यामुळे यिस्येन्यिनला व्यापून राहिलेली निराशा त्यांतून प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. १९२४ मध्ये त्याने पर्शियाला भेट दिल्यानंतर काही कविता लिहिल्या [‘पर्शियन थीम्‌ज’ (इं. शी.) १९२-४२५]. हकल्या फुलक्या लयतालांनी बांधलेल्या ह्या कविता मात्र एका वेगळ्या भाववृत्तीच्या द्योतक आहेत. भयनिराशेची छाया ह्या भाववृत्तीवर दिसत नाही पण ‘द ब्लॅक मॅन’ (१९२५, इं. शी.) सारख्या त्याच्या काव्यकृतीतून त्याच्या मनाची उद्‌ध्वस्तता पुन्हा व्यक्त होऊ लागली. बरीच वर्षे सोव्हिएट रशियातील समीक्षकांची आणि राज्यकर्त्यांची यिस्येन्यिनच्या कवितेबाबतची भूमिका फारशी अनुकूल नव्हती. १९५६ नंतर त्याच्या काव्यकृतींच्या आवृत्त्या उपलब्ध होऊ लागल्या आणि त्याला लोकप्रियता प्राप्त झाली. १९६६−६८ ह्या कालखंडात त्याची संपूर्ण कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कळमकर, य. शं.