विश्वगुणादर्शचंपू : संस्कृतातील एक प्रसिध्द ⇨ चंपूकाव्य. गद्यपद्यमय अशा या काव्याचा प्रकार दक्षिणेकडे फार लोकप्रिय होता. श्रीवेंकटाध्वरी हा विश्वगुणादर्शचंपूचा कर्ता. ह्या चंपूकाव्याच्या काही प्रतींत वेंकटाचार्य असाही त्याचा निर्देश आढळतो. हा कांचीवरम्‌चा रहिवासी. ह्या चंपूकाव्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकांत श्रीवेंकटाध्वरीची काही चरित्रात्मक माहिती सापडते. आपल्या वडिलांचे नाव त्याने रघुनाथ दीक्षित आईचे नाव सीताम्बा आणि आजोबांचे श्रीनिवास तथा अप्पय्यगुरू असे दिले आहे. हे अप्पय्यगुरू सुप्रसिध्द पंडित पंचमतमंजन ताताचार्य यांचे पुतणे. ह्यांखेरीज अन्य साधनांवरून मिळणारी माहिती अशी : हा विशिष्टाद्वैतवादी व वेदान्तदेशिकाचार्याचा अनुयायी होता. नीलकंठविजय वा नीलकंठचंपू लिहिणाऱ्या नीलकंठ दीक्षितांचा श्रीवेंकटाध्वरी हा सहाध्यायी होता. सतराव्या शतकाचा उत्तरार्ध हा त्याचा काळ दिसतो. वेंकटाध्वरीने पुष्कळ ग्रंथ लिहिले. त्यांपैकी यादवराघवीयम् हे काव्य असे आहे, की डावीकडून उजवीकडे वाचले असता कृष्णचरित्र व उलट वाचले असता रामचरित्र मिळते. हा अत्यंत विद्वान साहित्यिक होता. ‘महाकवी’ ही पदवी त्याला मिळाली होती.

ह्या चंपूला त्याच्या कर्त्याने संवादाचे स्वरूप दिले आहे. हा संवाद दोषदर्शी कृशानू आणि गुणग्राही विश्वावसू ह्या दोन गंधर्वात होतो. हे दोघेही विमानातून प्रवास करीत असून भारतातील तीर्थक्षेत्रे व विविध प्रदेश पाहत चालले आहेत. ते पाहता पाहता त्यांच्या (त्या प्रदेशांच्या व तीर्थक्षेत्रांच्या) गुणदोषांचे वर्णन केले जाते. सूर्याचे वर्णन, भूलोकाचे वर्णन, तसेच बद्रिकाश्रम, अयोध्या, गंगा नदी, काशी, समुद्र इत्यादींच्या वर्णनांबरोबरच गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक ह्यांचेही वर्णन ह्या चंपूत आलेले आहे. एकूण ५२ठिकाणे, प्रसंग व व्यक्ती यांचे वर्णन या चंपूकाव्यात येते. आधी दोष सांगायचे आणि नंतर स्तुतीचे वा गौरवाचे मुद्दे मांडायचे, ही पद्धत ह्या चंपूतील विविध वर्णनांत दिसून येते. उदा., सूर्यासंबंधी बोलताना दोषदर्शी कृशानू म्हणतो, की सूर्याला नमस्कार कशाला करायचा ? तो पृथ्वी शुष्क करून टाकतो. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे प्रवासी मूर्च्छित पडतात, थंड झरे कोरडेठाक होतात वगैरे. त्यानंतर विश्वावसू मात्र सूर्यस्तुती करतो. म्हणजे भगवंतांची स्तुती करताना सूर्याची प्रशंसा करतो. ईश्‍वराचा प्रकाश सूर्यबिंबात असल्याचे सांगतो. विश्वगुणादर्शचंपूत जवळजवळ सहाशे श्लोक व गद्यवाक्ये आहेत.

सर्वत्र दोष पाहत बसल्यामुळे वेंकटाध्वरीला अंधत्व आले आणि लक्ष्मी व श्रीनिवास ह्यांच्या स्तुत्यर्थ त्याने दोन सहस्त्रके लिहिल्यानंतर त्याची दृष्टी त्याला पुन्हा प्राप्त झाली, अशी एक आख्यायिका आहे. श्यामराव विठ्ठल, महादेव गंगाधर बाक्रेआणि जयशंकर पाठक ह्यांनी ह्या चंपूकाव्याचे संपादन केले आहे.

संदर्भ : श्यामराव विठ्ठल, संपा. विश्वगुणादर्शचंपू, मुंबई, १८८९.

कुलकर्णी, अ. र.