नागोजी भट्ट : (इसवी सनाच्या सतराव्या शतकाची अखेर ते अठराव्या शतकाचा मध्य). संस्कृत व्याकरणशास्त्रातील एक प्रसिद्ध महाराष्ट्रीय पंडित. नागेशभट्ट ह्या नावानेही तो ओळखला जातो. त्याचे उपनाव काळे. काही हस्तलिखितांत ते ‘उपाध्याय’ असेही आढळते. वडिलांचे नाव शिवभट्ट आईचे सती. विख्यात वैयाकरण भट्टोजीदीक्षित ह्याचा नातू हरिदीक्षित हा नागोजी भट्टाचा गुरू. काशी येथे ह्या गुरूजवळ नागोजी भट्टाने व्याकरणाबरोबरच अन्य शास्त्रांचाही अभ्यास केला. काशीला जाण्यापूर्वी वाई येथे त्याने साहित्यशास्त्राचे अध्ययन केले होते, असेही म्हटले जाते. शृंगवेरपूरच्या बिसेन घराण्यातील रामराजाचा तो आश्रित होता आणि तसा उल्लेख त्याने आपल्या अनेक ग्रंथांत केलेला आहे.

नागोजी भट्टाची ग्रंथरचना विपुल आहे. सु. ४७ग्रंथ त्याच्या नावावर मोडतात. व्याकरण हा त्याच्या विशेष आस्थेचा विषय. तथापि साहित्यशास्त्र, धर्मशास्त्र, योग ह्यांसारख्या विषयांवरही त्याने ग्रंथ रचिले. व्याकरणावरील त्याच्या ग्रंथांत ⇨परिभाषेंदुशेखर हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. पाणिनीय संप्रदायातील व्याकरणपरिभाषांच्या स्पष्टीकरणार्थ त्याने तो लिहिला. ना. दा. वाडेगावकर ह्यांनी ह्या ग्रंथाचा उत्तम मराठी अनुवाद केलेला आहे. परिभाषेंदुशेखरासारख्या व्याकरणावरील स्वतंत्र ग्रंथाखेरीज अवघड व्याकरणग्रंथांवर त्याने उद्योतटीकेसारख्या टीकाही लिहिल्या. प्राचीन पंडितांचे खंडन-मंडन करून व्याकरणात त्याने एक नवी परंपरा निर्माण केली. त्यामुळेच त्याला व त्याच्या शिष्यांना ‘नव्य वैयाकरण’ असे संबोधिले जाते. वैद्यनाथ पायगुंडे हे त्याचे प्रमुख शिष्य.

धर्मशास्त्रावर त्याने आचारेंदुशेखर, श्रार्द्धेंदुशेखर, आशौचनिर्णय,सापिंड्यनिर्णय ह्यांसारखे ग्रंथ लिहिले. योगशास्त्रावर योगवृत्ति नावाचा ग्रंथ त्याने लिहिला रसगंगाधर, कुवलयानंद, रसमंजरी ह्यांसारख्या ग्रंथांवर टीका लिहून अलंकारशास्त्रातील अनेक विषयांचे पांडित्यपूर्ण विवेचन केले. वयाच्या अखेरीस त्याने क्षेत्रसंन्यास घेतला होता. काशीक्षेत्रीच त्याचा अंत झाला.

भिडे, वि. वि.