बिल्हण : (अकरावे शतक). काश्मीरी कवी. संस्कृतातील विक्रमांकदेवचरित ह्या प्रसिद्ध महाकाव्याचा कर्ता. काश्मीरमधील प्रवरापूरनजीकच्या कोणमुख (खोनमुख असाही ह्या गावाचा उल्लेख केला जातो) ह्या गावी एका धर्मपरायण ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव ज्येष्ठकलश आईचे नागदेवी. कोणमुख ह्या त्याच्या गावीच त्याचा विद्याभ्यास झाला. वेद, वेदांगे, व्याकरण व अलंकारशास्त्र ह्या विषयांवर त्याने प्रभुत्व मिळविले. बिल्हणाचे वडील स्वतःच एक उत्तम वैयाकरणी होते आणि पतंजलीच्या महाभाष्यावर त्यांनी टीका लिहिली होती. विद्या पूर्ण झाल्यावर तरुण वयात, घर सोडून बिल्हण भ्रमंती करू लागला. कीर्ती-संपत्तीचा मोह. केवळ धाडसीपणा किंवा ⇨ बाणभट्टाने केला होता, तसा पुष्कळ प्रवास करण्याची इच्छा अशी काही कारणे ह्या भ्रमंतीच्या मागे असावीत. मथुरा, कान्यकुब्ज, प्रयाग, वाराणसी आदी ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर कल्याण (णी)चा चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य त्रिभुवनमल्ल (कार. १०७६-११२६) ह्याच्या दरबारी राजकवी म्हणून ते राहिला. ह्या राजाने बिल्हणाला ‘विद्यापति’ ही पदवी दिली होती.

कल्याण (णी)च्या चालुक्य राजांचा –विशेषतः सहावा विक्रमादित्य त्रिभुवनमल्ल ह्याच्या कर्तृत्वाचा–इतिहास हा बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरिताचा (अठरा सर्ग) विषय आहे. विक्रमादित्याचा पिता सोमेश्वर आहवमल्ल ह्याच्या निधनानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र द्वितीय सोमेश्वर ह्याला झालेली सत्ताप्राप्ती द्वितीय सोमेश्वराच्या कारकीर्दीत विक्रमादित्याने केलेले पराक्रम चोल राजा वीरराजेंद्र ह्याच्या मुलीशी विक्रमादित्याचा झालेला विवाह दक्षिण भारतातील त्याच्या मोहिमा आपल्या वडील भावाचा-द्वितीय सोमेश्वराचा-पराभव करून विक्रमादित्याने राजसत्ता मिळविणे आपला धाकटा भाऊ जयसिंह ह्याचा त्याने केलेला पाडाव आदी घटना ह्या महाकाव्यात वर्णिलेल्या आहेत. बिल्हणाने निवेदिलेल्या घटना ऐतिहासिक असल्याचे शिलालेखांच्या आधारे सिद्ध होत असले, तरी इतिहासनिवेदनाच्या दृष्टिकोणातून पाहता, हा ग्रंथ अपुरा आणि असमाधानकारक आहे. ह्याचे मुख्य कारण, बिल्हणाची ह्या ग्रंथाच्या रचनेमागील भूमिका इतिहासकाराची नसून मुख्यतः एक उत्कृष्ट काव्यकृती निर्माण करण्याची होती, हे आहे. देवांचा पूर्ण अनुग्रह लाभलेला राजा, अशी विक्रमादित्याची प्रतिमा ह्या काव्यातून उभी करण्याचा बिल्हणाचा प्रयत्न आहे. विक्रमादित्याचा जन्मही शंकराच्या दैवी प्रसादाने झाला, असे बिल्हणाने ह्या काव्यात दाखविले आहे. बिल्हणाच्या निवेदनात अतिशयोक्तीचा दोषही आढळतो. उदा., विक्रमादित्याने चोलांचा संपूर्ण विनाश घडवून आणल्याचे बिल्हण सांगतो. परंतु ‘संपूर्ण नाश पावलेले’ हेच चोल पुनःपुन्हा नव्या उमेदीने युद्धास सज्ज झालेले दिसतात आणि हेही बिल्हणच सांगतो ! या काव्याच्या अठराव्या सर्गात बिल्हणाने स्वतःची चरित्रात्मक माहिती दिलेली आहे.

एक उत्तम इतिहासग्रंथ म्हणून जरी नाही, तरी एक दर्जेदार काव्यकृती आणि इतिहासविषयक महाकाव्य म्हणून बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरिताला संस्कृत साहित्याच्या इतिहासात निश्चित स्थान आहे. काव्यरचनेची तत्कालिन सांकेतिक चौकट स्वीकारून तिच्या मर्यादेत त्याने आपल्या कविप्रतिभेचे विलोभनीय असे दर्शन घडविले आहे. भारदस्त, परंतु प्रासादिक काव्यशैलीचा मनोहर विलास ह्या रचनेत आढळतो. ह्या काव्यकृतीचे जर्मन भाषांतर १८९७ मध्ये झालेले आहे.

ह्या काव्यकृतीखेरीज बिल्हणाने कर्णसुंदरी हे चार अंकी प्रणयप्रधान नाटकही लिहिले आहे. अनहिलवाडचा राजकुमार कर्णदेव ह्याचे एका विद्याधर कन्येशी गुप्त मीलन आणि विवाह हा त्या नाटकाचा विषय आहे. ही नाट्यरचना सांकेतिक आहे परंतु बिल्हणाचे काव्यगुण येथे दिसतात. ‘चौरीसुरत पंञ्चाशीका’ हे बिल्हणाने रचिलेले प्रसिद्ध प्रेमकाव्य. वियोगाच्या पार्श्वभूमीवर गुप्त प्रेमाच्या धुंद, पण करुण आठवणी येथे ५० पद्यांत ग्रंथित केलेल्या आहेत. बिल्हणाच्या आणखी काही रचनांचा शोध अलीकडे लागला आहे. ‘बिल्हणस्तव’ किंवा ‘शिवस्तुती’ हे एक काव्य आणि निरुक्तिप्रकाश हा न्यायशास्त्रावरील ग्रंथ. बिल्हण केवळ ललितकवीच नव्हे, तर शास्त्रग्रंथ रचणारा विद्वान लेखकही होता हे निरुक्तिप्रकाशावरून दिसते.

कुलकर्णी, अ. र. भट, गो. के.