श्रीहर्ष : (बारावे शतक). एक संस्कृत महाकवी. प्राचीन संस्कृत साहित्यात श्रीहर्ष हा मुख्यत्वे ⇨नैषधीयचरित या महाकाव्याचा कर्ता म्हणून ओळखला जातो. श्रीहर्षाविषयीची विश्वसनीय माहिती त्याच्या नैषधीयचरित गंथांतर्गत, विशेषत: या काव्याच्या प्रत्येक सर्गाच्या अखेरीस आणि गंथसमाप्तीनंतर कवीने स्वत: दिलेल्या चरित्रात्मक तपशिलांवरून ज्ञात होते. विजयचंद्र (कार. ११५६-६८) आणि जयंतचंद्र (कार. ११७०-८९) या गाहढवाल राजपूत राजांचा त्यास आश्रय होता. जयंतचंद्राच्या (इतिहासात जयचंद राठोड या नावाने प्रसिद्ध) दरबारात तर तो राजपंडित होता. त्याच्या आज्ञेने श्रीहर्षाने नैषधीयचरित हे महाकाव्य लिहिले, असे जैन कवी राजशेखर सांगतो. या राजाच्या तामपटांतूनही श्रीहर्षाविषयी काही माहिती मिळते.

श्रीहर्षाच्या पित्याचे नाव श्रीहरी (श्रीहीर या नावानेही प्रसिद्ध) व आईचे मामल्लदेवी. विख्यात संस्कृत अलंकारशास्त्रज्ञ ⇨मम्मट याचा हा भाचा होता, असेही म्हटले जाते. त्याचे वडील विजयचंद्राच्या दरबारी कवी होते. त्यांचा उदयन नावाच्या कवीकडून काव्यरचनेच्या चढाओढीत पराभव झाला होता. त्याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत डाचत राहिले, म्हणून त्यांनी श्रीहर्षाला तू उदयनाचा पराभव कर असे सांगितले व ते त्याने मान्य केले, अशी वदंता आहे. श्रीहर्षाने परप्रांती जाऊन अनेक गुरूंजवळ अनेक शास्त्रांचे अध्ययन केले. गंगातीरी एका गुरूकडून चिंतामणी मंत्र आत्मसात केला आणि त्यानंतर त्याने खंडनखंडखाद्य नावाचा उदयनाची मते खंडन करणारा गंथ लिहिला. कनौजच्या (कान्यकुब्ज) गाहढवाल राजांच्या दरबारी तो कवी होता. शृंगार महाकाव्य नैषधीयचरिता खेरीज त्याने आणखी काही गंथ लिहिले : त्यांत खंडनखंडखाद्य, विजयप्रशस्ति, गौडोर्वीशकुलप्रशस्ति (गौडोर्वीश- प्रशस्ति हेही एक पर्यायी नाव), अर्णववर्णन, छिन्दप्रशस्ति, शिवशक्ति-सिद्घी, नवसाहसांकचरितचम्पू , स्थैर्य विचारणप्रकरण इ. गंथांचा समावेश होतो. श्रीहर्षाच्या नऊ गंथांपैकी नैषधीयचरितखंडनखंडखाद्य हे दोनच उपलब्ध असून उर्वरित गंथ अद्यापि मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या शीर्षकावरून विद्वानांनी काही अनुमाने काढली आहेत. विजयप्रशस्ति हा गंथ म्हणजे कनौजचा राजा विजयचंद्र ह्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रशस्तिपर आलेख होय. खंडनखंडखाद्य हा वेदान्तशास्त्राच्या युक्तिवादाचा मूर्धन्य गंथ आहे. हा गंथ अव्दैत द्वंद्ववादावरील समीक्षात्मक गंथ असून ह्यात श्रीहर्षाने न्यायमतांचे खंडन केले आहे. अर्णववर्णन या गंथात श्रीहर्षाने अर्णवराज-अर्णोराज राजाचे वर्णन केले आहे. हा राजा चाहमान वंशातील त्याचा समकालीन होता. छिन्दप्रशस्ति म्हणजे गयेच्या इ. स. ११७६ मधील छिन्द राजाचे वर्णन असून गौडोर्वीशकुलप्रशस्ति या गंथामध्ये श्रीहर्षाने कोणा एका विशिष्ट गौड राजाची स्तुती केली असावी. नवसाहसांकचरितचम्पू या गंथाविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. या सर्व प्रशस्तींतील एकही पूर्णत: उपलब्ध नाही तथापि नवसाहसांकचरितचम्पू या गंथाबद्दल काही विद्वान ती एक जयंतचंद्राचीच प्रशस्ती असावी, असे म्हणतात. शिवशक्तिसिद्धी हा काश्मीरच्या शैव तत्त्वज्ञानाबद्दलचा गंथ असावा व स्थैर्य विचारणप्रकरण हे बौद्धांच्या क्षणिक वादाचे निराकरण असावे. मम्मटाने नैषधीयचरिता त सर्व प्रकारचे काव्यदोष असल्याची टीका केल्याने ‘ नैषधम् विद्वदौषधम् ’ हे वचन प्रसिद्घ झाले, अशी एक दंतकथा आहे.

श्रीहर्ष एक प्रकांड पंडित, योगी, साधक आणि वेदान्ती होता. उज्ज्वल कवित्वाबरोबर त्याच्या पांडित्याला तत्त्वज्ञान आणि तर्क यांची एक झालर होती. त्याचे खंडनखंडखाद्य पांडित्याचे व वेदान्तनिष्ठेचे साक्षीदार आहे. त्याच्या काव्यात श्लेष, यमक आणि अनुप्रास यांवर भर आहे. शिवाय विविध अर्थालंकार, रस, ध्वनी, वकोक्ती इ. काव्यजीविते वैदयक, कामशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, ज्योतिष, व्याकरण इ. परंपरागत शास्त्रीय ज्ञान त्याच्या गंथांत भरपूर आहे.

संदर्भ : १. करंबेळकर, वि. वा. संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास, पुणे, १९५४.

२. वाटवे, के. ना. संस्कृत काव्याचे पंचप्राण, पुणे,१९४७.

पोळ, मनीषा