मम्मट : (इ. स. सु. ११००). संस्कृत साहित्यशास्त्रकार. काव्यप्रकाश ह्या विख्यात ग्रंथाचा कर्ता. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. सतराव्या शतकात होऊन गेलेल्या भीमसेन दिक्षीताने सुधासागर ह्या आपल्या ग्रंथात मग्मटासंबंधी काही माहिती दिली आहे. ती थोडक्यात अशी : मग्मट हा काशमीरात जन्मला. त्याच्या पित्याचे नाव जैयट असे होते. काशीला जाऊन त्याने अध्ययन केले. कैयट आणि उवट (औवट व उव्वट हे ह्या नावाचे दोन पर्याय) असे दोन कनिष्ठ बंधू त्याला होते. ह्या दोन बंधूंना त्यानेच विद्या शिकवली. कैयट हा पतंजलीच्या महाभाष्यावरील प्रदीप ह्या टीकेचा कर्ता असून उवट हा शुक्ल यजुवेंदाच्या वाजसनेयी संहितेवरील भाष्याचा कर्ता म्हणून ओळखला जातो. मग्मट आणि भीमसेन दीक्षित ह्यांच्या कालखंडांत सहा शतकांचे अंतर असल्यामुळे भीमसेनाने दिलेली माहिती म. म. पां. वा. काणे ह्यांच्यासारख्या विद्वानांना फारशी विश्वासार्ह वाटत नाही. भीमसेनाने ही माहिती देताना, मग्मट हा साक्षात सरस्वतीने पुरूषरूपात घेतलेला अवतार होता. मुळात सर्व शास्त्रांचे ज्ञान त्याला होतेच, परंतु केवळ जनरीत पाळण्यासाठी तो काशीला अध्ययनार्थ गेला, अशा आशयाची विधाने केलेली आहेत.त्यामुळे ऐतिहासिक माहिती देण्यापेक्षा मग्मटाबद्दलचा आपला आदरभाव व्यक्त करण्याचाच त्याचा मुख्य हेतू दिसतो. शिवाय उवटाने आपण आनंदपुरचे रहिवासी  असून आपल्या पित्याचे नाव वज्नट असल्याचे सांगितले आहे. उपर्युक्त वाजसनेयी –संहिता भाष्याच्या उपसंहारात उवटाने तो आणि भोज हे समकालीन असल्याचा निर्देश केला आहे. (… महीं भोजे प्रशासति). मग्मटाने विद्याप्रेमी भोजनाच्या औदार्याचा उल्लेख केलेला आहे. तथापि संबंधित श्र्लेक हा भोजाच्या ह्यातीत लिहिला गेला किंवा काय, हे सांगता येत नाही. तसा तो लिहिला गेलाच असेल, तर तो भोजाच्या कारकीर्दीच्या उत्तरकालात लिहिला गेला असावा. कारण भोजाची किर्ती त्याच्या राज्याबाहेर पसरण्यास काही काळ जावा लागणारच. त्यामुळे भोजाहून मग्मट हा अर्वाचीन असावा, असे दिसते. धाकटा भाऊ भोजाचा समकालीन आणि जेष्ठ भाऊ त्या राजाहून अर्वाचीन असे होणार नाही. उवटकृत वाजसनेयी – संहिता भाष्याच्या काही हस्तलिखित पोथ्यांतून वज्नटाऐवजी जव्यटाचे नाव उवटाचा पिता म्हणून आढळते. अशा परिस्थितीत भीमसेननाने दिलेली माहिती नि:संवेहपणे स्वीकारणे कठीण आहे. मग्मटच्या नावाचे वळण मात्र काशमिरी आहे. नैपधीयचरित ह्या ग्रंथाचा कर्ता श्रीहर्ष ह्याचा मग्मट हा मामा होता, असेही म्हटले जाते.

नाट्यशास्त्रातील काही कारिका –विशेषत: रससूत्र-काव्यप्रकाशात आढळतात. तसेच काव्यप्रकाशात पहिल्या कारिकेवर जी वृत्ती दिली आहे, तीत वृत्तीकाराने कारिकाकाराचा उल्लेख तृतीय पुरूषी केला आहे. ह्यांसारखी काही कारणे दाखवून महेश्वरासारख्या काही भष्यकारांनी असे मतव्यक्त केले आहे, की काव्यप्रकाशातील कारिका ह्या भरतमुनींच्या आहेत मग्मट फक्त वृत्तीकार आहे. परंतु हे मत टिकवण्यासारखे नाही, कारण नाट्यशास्त्रातील फक्त सहा कारिका काव्यप्रकाशात आलेल्या आहेत. याशिवाय मग्मटाने अन्य ग्रंथकारांच्या काही कारिकाही मूळ निर्देशावाचून काव्यप्रकाशात अंतर्भूत केल्या आहेत. आपली मते व्यक्त  करताना तृतीय पुरूषी निवेदन ठेवणे ही प्राचीनांची प्रवृत्ती होती. काव्यप्रकाश ह्या ग्रंथाचा बहुतेक भाग मग्मटानेरचिलेला असला, तरी अखेरच्या, म्हणजे दहाव्या उल्लासातील परिकर ह्या अलंकारानंतरचा अवशिष्ट भाग अलकनामक कोणा अन्य लेखकाने लिहिला आहे, हे दाखविणारा पुरेसा पुरावा मात्र आज उपलब्ध आहे. अलट व अल्लट ही ह्या अलकाची  पर्यायी नावे होत. निदर्शन व्याख्याकार राजानक आनंद ह्याने तसेच आमरूशतकावरील रसिकसंजीषनीनामक व्याख्येचा कर्ता अर्जुनवर्मदेव ह्याने अलकाचा  उल्लेख काव्यप्रकाशाचा सहलेखक म्हणून केलेला आहे. काव्यप्रकाशाच्या रचनेत अन्य लेखकाचा हात असल्याचे रूय्यक माणिक्यचंद्र नमूद केले आहे. अर्जुनवर्मदेवाने केलेल्या काही उल्लेखांवरून तर काव्यप्रकाशाच्या सातव्या उल्लासाच्या रचनेतही अलकाचा सहभाग असावा असे दिसते.

मग्मटाच्या  काव्यप्रकाशाची विभागणी दहा उल्लासांत करण्यात आलेली असून प्रथम कारिका (म्हणजे सूत्र), नंतर कृती आणि उदाहरणे असे विवेचणाचे तीन टप्पे ठेविलेले आहेत. काव्यप्रकाशात एकून १४३ कारिका आहेत. मग्मटाने नवे असे काही सांगितले नाही. तथापि त्याच्या  पूर्वी, काव्यशास्त्राच्या क्षेत्रात अनेक शतके जे विचारमंथन झाले, त्याचा सारांश आपल्याला काव्यप्रकाशात पाहावयास मिळतो. त्याचबरोबर काव्यशस्त्रविषयक नवीन विचारांचा काव्यप्रकाश हा प्रारंभबिंदू ठरला. वेदान्तात शारीरक भाष्याचे किंवा व्याकरणाच्या क्षेत्रात महाभाष्याचे जे स्थान, तेच काव्यशास्त्राच्या संदर्बात काव्यप्रकाशाचे आहे, असे म्हटले जाते. काव्य, काव्याचा हेतू, उत्तम, मध्यम आणि अधम काव्ये, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंडूग्यार्थ, तात्पर्यार्थ असे शब्दार्थाचे प्रकार, स्वतंत्र व्यापार म्हणून व्यञ्जनेचीसिद्वी, ध्वनीचे दोन प्रमुख प्रकार ( अविवक्षितवाच्या आणि विवक्षितान्यपरिवाच्य) व त्यांचेअनेक उपभेद, रस स्थायिभाव, विभाव आमि व्यभिचारिभाव इ. रस व ध्वनिविषयक विवेचन गुण-दोषविचार इ. प्रतिपादन मग्मटाने केले असून ६ सब्दालंकार व ६१ अर्थालंकार त्याने वर्णिले आहेत. आपल्या विवेचनाच्या ओघात,उदाहरणे म्हणून अन्य साहित्यकारांची सु. ६२० पद्ये त्याने उद् धृत केली आहेत. नाटय सोडून इतर सर्वच काव्यांगांचा विचार मग्मटाने केला आहे.

मग्मटाला ध्वनिसंप्रदायाचा पुरस्कर्ता म्हणून मानले जाते. ध्वनितत्वाची संस्थापना आनंदवर्धनाने ध्वन्यालोक या ग्रंथात केली आणि अभिनवगुप्ताने आपल्या लोचन टीकेतून या काव्यशास्त्रीय तत्वाला बळकटी आणली. या दोन विचारवंतांनी व्यञ्जना – व्यापाराची स्वतंत्रपणे सिद्धी करण्यासाठी आणि मीसांसक, नैमामिक इ. ध्वनिविरोधकांचे आक्षेप दूर करण्यासाठी जी विचारधारा मांडली, युक्तिपाटव केले, त्या सर्व विवेचनाचे सार मग्मटाने मोजक्या शब्दांमध्ये काव्यप्रकाशात आणून आपल्या कारणसरणीची जोडही दिली आहे. मग्मट सूत्ररूपाने, त्रोटक शैलीत लिहितो. पण त्याच्या लेखणाला तत्वग्रहणाचे वजन आहे, त्याने तत्वप्रकाशासाठी जागोजाग दिलेली उदाहरणे अचूक, काही ठिकाणी मार्मिक आहेत. म्हणूनच काव्यशास्त्रचा मौलिक ग्रंथ नसूनही काव्यप्रकाशाला संस्कृत साहित्यशास्त्रात मोलाचेस्थान लाभले आहे.

काव्यप्रकाशावर अनेक व्याख्या आहेत, त्यांतगोविंद ठक्कुरांची प्रदिप, विद्यानाथ तत्सत् यांची प्रभा, नागोजी भट्टाचा उद्योत या विशेष प्रसिद्ध आहेत. शिवाय व्याख्या लिहिणार्‍यांत माणिक्यचंद्र (संकेत), जयंत भट्ट (दिपिका किंवा जयंती), सोमेश्वर (काव्यादर्श), राजानक आनंद (निरदर्शना) ह्यांचाही समावेश होतो. काव्यशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे विश्वनाथ, रूय्यक यांनाही काव्यप्रकाशावर व्याख्या लिहावीशी वाटली, यातच या ग्रंथाची लोकप्रियता आणि शास्त्रीय महत्व दिसून येते. काव्यप्रकाशखेरीज शब्दव्यापारपरिचय हा एक ग्रंथही मग्मटाने रचिला.

संदर्भ:  1. De, S. K. Sanskrit poetics, Calcutta, 1960.

           2. Gajendragadker, A. B. Kavyaprakash of Mammata, Bombay. 1939.

           3. Kane, P. V. History of Sanskrut Poetics, Delhi. 1961.

           ४. अर्जुनवाढकर, कृ. श्री. , मंगरूळकर, अरविंद, संपा. मम्मटमट् ट विरचित काव्यप्रकाश, पुणे, १९६२.

कुलकर्णी, अ. र. भट, गो. के.