वाचस्पतिमिश्र  : (नववे शतक). पाच आस्तिक दर्शनांवर विद्वत्ताप्रचुर टीका लिहिणारे आणि ‘सर्वतंत्रस्वतंत्र’ असे बिरुद प्राप्त झालेले संस्कृत ग्रंथकार. ‘नृग’ ही उपाधी धारण केलेला मिथिलेचा देवपाल हा राजा त्यांचा आश्रयदाता होता. त्यांच्या गुरूंचे नाव त्रिलोचन असे होते. न्यायमंजरीकार जयंतभट्ट हे त्यांचे गुरू होत, असेही एक मत होते पण आता त्यास विद्वन्मान्यता राहिली नाही. वैशेषिक दर्शन वगळून इतर पाचही आस्तिक दर्शनांवर वाचस्पतींचे स्वतंत्र वा ग्रंथवितरणात्मक लिखाण आहे. त्या त्या दर्शनाची सखोल जाण येण्यास त्यांचे ग्रंथ अतिशय उपयोगी आहेत. मूळ ग्रंथातील मताची मांडणी अत्यंत निःपक्षपातीपणाने, त्यात (मुळात नसली तरीही) तार्किक सुसंगती आणून, अतिशय प्रसन्न शैलीत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सर्व दर्शनांत त्यांचा अप्रतिहत संचार होता. इतकेच नव्हे, तर त्या त्या दर्शनाच्या रीतीने जाऊनही स्वप्रतिभेने त्यांना नवेनवे उन्मेष सुचावयाचे. म्हणून ‘सर्वतंत्रस्वतंत्र’ अशी उपाधी त्यांच्या नावास चिकटली.  

त्यांच्या ग्रंथांची यादी अशी : (१) न्यायकणिका : भाट्ट मीमांसेवरील मंडनमिश्राने लिहिलेल्या विधिविवेक या पुस्तकावरील ही टीका आहे. (२) तत्त्वबिंदु : वाक्यार्थ-ज्ञानाची प्रक्रिया सांगणारा हा स्वतंत्र ग्रंथ आहे. (३) न्याय-वार्तिक-तात्पर्य-टीका : गौतमाच्या न्यायसूत्रावर वात्स्यायनाने भाष्य लिहिले. त्यावर उद्योतकराने वार्तिक लिहिले. या वार्तिकावर वाचस्पतींनी लिहिलेली टीका म्हणजे न्याय-वार्तिकतात्पर्य-टीका ह ग्रंथ होय. यांत दिङ्नाग, धर्मकीर्तिप्रभृति बौद्ध तर्कपंडितांशी खूप झटापट आहे. वेदप्रामाण्यावादी आणि बौद्ध यांच्यात नवव्या शतकात चालू असलेल्या वैचारिक संघर्षाची या ग्रंथावरून चांगली कल्पना येते. न्यायदर्शनाच्या अभ्यासकांत हा ग्रंथ फारच लोकप्रिय आहे. नैयायिक मंडळी भामतीकरांना ‘तात्पर्याचार्य’ असे संबोधतात. (४) सांख्यतत्त्वकौमुदी : ⇨ ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकेवरील ही टीका होय. (५ व ६) न्यायसूचिनिबंध व न्यायसूत्राद्वारे असे दोन स्वतंत्र ग्रंथ वाचस्पतींनी न्यायदर्शनावर लिहिले आहेत. (७) तत्त्ववैशारदी : पतंजलीच्या योगसूत्रावर व्यासभाष्य आहे. त्यावरील ही टीका. (८) भामती : ब्रह्मसूत्रावरील शंकराचार्यांच्या भाष्यावरील ही सर्वांत महत्त्वाची टीका होय. शांकर वेदान्त समजून घेण्यासाठी हा ग्रंथ फार उपयोगी पडतो. सर्वदर्शनसंग्रहातील शांकर दर्शन हे शेवटचे प्रकरण लिहिताना माधवचार्यांनी भामतीचे अनुसरण केले आहे. शांकर वेदान्तात उत्तरकाली तीन मुख्य संप्रदाय अथवा प्रस्थाने निर्माण झाली. त्यांतील भामती–प्रस्थान हे एक होय. ब्रह्म व जीव यांच्यातील संबंधाविषयी यात अवच्छेदवादाचा पुरस्कार केलेला आहे. अंतःकरणाच्या उपाधीने अवच्छिन्न झालेले शुद्ध ब्रह्म म्हणजेच जीव होय, असा हा सिद्धांत आहे. महाकाशात घट अथवा मठ यांसारख्या उपाधींमुळे घटाकाश, मठाकाश या प्रकारचे भेद भासतात. ते वास्तविक नव्हेत. त्या उपाधी असताना आणि काढून टाकल्यावरसुद्धा महाकाश हे स्वरूपाने विद्यमान असतेच. त्याचप्रमाणे जीवाचे ब्रह्मत्व हीही नित्यसिद्ध वस्तू आहे, असे वाचस्पतींचा अवच्छेदवाद सांगतो. अज्ञानाचा आश्रय कोण? या जटिल प्रश्नास ‘जीव हा आश्रय होय’, असे वाचस्पतींचे उत्तर आहे. भामतीवर अमलानंदांनी कल्पतरू नावाची टीका लिहिली (१२५०) व या टीकेवर अप्पय्य दीक्षित यांनी परिमल ही टीका लिहिली (१५५०). (९) मंडनमिश्रांच्या ब्रह्मसिद्धीवर तत्वसमीक्षा नावाची टीका वाचस्पतींनी  लिहिली, असा उल्लेख आहे पण तो ग्रंथ उपलब्ध नाही.  

उपर्युक्त भामती ग्रंथाविषयी एक आख्यायिका आहे. वाचस्पतिमिश्र अपत्यहीन होते. सतत विद्याव्यासंगात मग्न असल्यामुळे त्यांना पत्नीकडे लक्ष देता आले नाही. झाल्या चुकीचे आंशिक परिमार्जन व्हावे, म्हणून आपल्या सर्वांत महत्त्वाच्या ग्रंथाला आपल्या पत्नीचे भामती हे नाव त्यांनी दिले.  

वाचस्पतिमिश्र हे केवळ दार्शनिक विद्वान नसून आध्यात्मिक वृत्तीचे साधक होते, असे त्यांच्या विविध मंगलचरणांवरून आणि भामतीच्या अखेरच्या भागावरून वाटते.

वाचस्पतिमिश्र नावाचे आणखीही एक संस्कृत ग्रंथकार असून ते पंधराव्या शतकात मिथिलेत होऊन गेले. त्यांनी दार्शनिक ग्रंथरचना केली असली, तरी त्यांचे लिखाण प्रामुख्याने धर्मशास्त्रावर आहे. विवादचिंतामणी हा त्यांचा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे.  

दीक्षित, श्री. ह.