सोमवार : आठवड्याचा रविवारनंतरचा दुसरा परंतु कामाचा किंवा व्यवहाराचा पहिला दिवस वा वार. या दिवशी सूर्योदयापासून सुरू होणाऱ्या पहिल्या होऱ्याचा अधिपती सोम (चंद्र) ही देवता असल्याने या वाराला त्यावरून सोमवार हे नाव पडले आहे. जगात इतरत्रही हा वार चंद्र याच देवतेचा मानला जातो. हिंदू लोक हा शंकराचा वार मानतात. काही हिंदू सोमवारी, विशेषतः श्रावण व कार्तिक महिन्यांतील सोमवारी, उपवास करतात. याशिवाय काही लोक कडक उपवासाचे सोळा सोमवारांचे व्रत करतात व अखेरीस त्याचे उद्यापन करतात. सोमवारी येणाज्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. सोमवती अमावस्येप्रमाणे सोमवारी येणारा प्रदोष हा इतर प्रदोषांहून महत्त्वाचा मानतात. सूर्यास्तानंतर रात्रीचा प्रारंभ होण्याच्या काळाला प्रदोष वा रजनीमुख म्हणतात.

सप्टेंबर महिन्याचा पहिला सोमवार अमेरिकेत कामगार दिन म्हणून पाळतात. ख्रिश्‍चनांच्या नाताळ सणानंतर १२ दिवसांनी एपिफनी हा चर्चचा उत्सव साजरा करतात. (या दिवशी म्हणजे ६ जानेवारीला पूर्वेकडील सूज्ञ मंडळींना येशू ख्रिस्ताचे दर्शन झाल्याच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा करतात). यानंतरचा सोमवार हा मध्ययुगीन इंग्लंडमध्ये प्लाऊ मंडे (हल वा नांगर दिन) म्हणून साजरा करीत असत. या सोमवारी लंडनचा महापौर त्याच्या कौन्सिलच्या निवडणुकीचा दिवस जाहीर करीत असे. राजे तिसरे एडवर्ड यांचे पॅरिसभोवतीच्या वेढ्यातील शेकडो सैनिक थंडीमुळे व भुकेमुळे मरण पावले. काहीतर घोड्यावर बसलेल्या स्थितीतच मरण पावले. त्यांच्या स्मरणार्थ या दिवसाला काळा सोमवार म्हणतात. १४ एप्रिल १३६० रोजी असलेल्या ईस्टरच्या सोमवारलाही काळा सोमवार म्हणतात. अमेरिकेत अशुभसूचक दिवस सूचित करण्यासाठी ब्ल्यू मंडे ही संज्ञा वापरतात. तेथे सोमवार हा परंपरागत रीतीनुसार कुटुंबाचा कपडे धुण्याचा दिवस मानला जातो.

पहा : आठवडा.

ठाकूर, अ. ना.