सेकंद : हे ⇨कालमापना चे मूलभूत एकक असून एककांच्या सर्व पद्धतींमध्ये काळासाठी ते वापरले जाते. व्यवहारात सेकंद हा ⇨मिनिटाचा १/६०, ⇨ तासाचा १/३,६०० किंवा ⇨ दिवसाचा १/८६,४०० वा भाग मानतात. पुष्कळ वर्षे सेकंद हा माध्य सौरदिनाचा ( पृथ्वीला सूर्यसापेक्ष एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या सरासरी काळाचा) १/८६,४०० एवढा भाग मानीत असत. यामुळे दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या बदलांचे परिणाम टाळता आले. मात्र पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाच्या गतीत चिरकालिक, अनियमित व आवर्ती बदल होत असल्याचे लक्षात आल्यावर माध्य सौरदिनाच्या कालावधीवर आधारलेला सेकंदाचा कालावधी एकक म्हणून मानणे शक्य नव्हते. शिवाय विसाव्या शतकाच्या मध्यापासून अधिक अचूकतेने कालमापन करण्याची गरज भासू लागल्याने सेकंदाची व्याख्या सुधारण्याची गरज वाटू लागली. त्यामुळे १९५५ मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेने डब्लिन येथे नवी व्याख्या सुचविली. १९५६ मध्ये इंटरनॅशनल कमिटी ऑन वेट्स अँड मेझर्स या संस्थेने ही व्याख्या स्वीकारली आणि पॅरिसला झालेल्या वेट्स अँड मेझर्स परिषदेत तिला मान्यता देण्यात आली. या व्याख्येनुसार १ डिसेंबर १८९९ रोजी मध्यरात्री संपलेल्या सांपातिक वर्षाचा [⟶ वर्ष ]१/३१, ५५६, ९२५·९७४७ एवढा भाग म्हणजे सेकंद असे ठरविण्यात आले. याला ग्रहपंचांगी सेकंद म्हणतात. या पद्धतीत ग्रहांच्या कक्षीय भ्रमणावरून काळ काढतात. सेकंदाचा एकक काळ ठरविण्यासाठी एक विशिष्ट वर्ष विचारात घेतल्याने सौरवर्षात होणाऱ्या बदलांमुळे उत्पन्न होणारे प्रश्न टाळता आले परंतु यामुळे वैज्ञानिक कार्यात दुसऱ्याच समस्या उद्‌भवल्याचे लक्षात आले. म्हणजे ग्रहपंचांगी काल एकविध मानता येत असला, तरी त्यात पुढील दोन उणिवा आहेत: (१) खस्थ पदार्थांच्या चंद्राच्या (ग्रहणे, चंद्राने केलेली ताऱ्यांची पिधाने इ.) निरीक्षणाद्वारेच ग्रहपंचांगी काळ ठरवावा लागतो आणि चंद्राची आगामी काळातील स्थाने गणिताने अगदी बिनचूक सांगणे कठीण असते. (२) वस्तुस्थिती वा घटना घडून गेल्यावर त्या वेळी घेतलेल्या वेधांवरून ग्रहपंचांगी काळ निश्चित करावा लागतो. तो तात्काळ समजू शकत नाही.

 

सेकंदाच्या निश्चितीमधील अशा प्रकारच्या उणिवा १६५६ नंतर झालेल्या तांत्रिक प्रगतीच्या साहाय्याने दूर करणे शक्य झाले. १९६४ मध्ये पॅरिसला झालेल्या बाराव्या वेट्स अँड मेझर्स परिषदेने सेकंदाची व्याख्या पुन्हा केली आणि तीच व्याख्या आंतरराष्ट्रीय एकक पद्धतीसाठी स्वीकारण्यात आली. नवीन संशोधनात सिझियम-१३३ या समस्थानिकाच्या (अणुक्रमांक तोच परंतु अणुभार भिन्न असलेल्या मूलद्रव्याच्या प्रकारच्या) नैसर्गिक अनुस्पंदनी आंदोलनास लागणारा कालावधी कित्येक हजार वर्षे जवळजवळ तेवढाच राहतो, असे आढळून आले आहे. त्यामुळे १९६४ सालच्या सेकंदाच्या व्याख्येनुसार सिझियम १३३ अणूच्या विशिष्ट प्रारणाच्या ९, १९२, ६३१, ७७० ± २० आंदोलनांना लागणारा काळ म्हणजे सेकंद असे ठरविण्यात आले. याला आणवीय सेकंद म्हणतात. सिझियम आंदोलकाची आंदोलने इलेक्ट्रॉनीय तंत्राने मोजण्यात येत असल्याने हा काळ लगेच कळतो [⟶ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय]. अशा तऱ्हेने ग्रहपंचांगी कालमापनाच्या एककाचे (सेकंदाचे) स्थित्यंतर आणवीय अचल मानकात (एककात) झाले आहे. आणवीय सेकंदामुळे काल-मापनाच्या सध्याच्या सर्व गरजा भागविणे शक्य झाले आहे. अर्थात याला काही अपवाद असून त्या अपवादांच्या बाबतींत ग्रहपंचांगी सेकंद अत्यावश्यक ठरतो.

 

कोन मोजण्याच्या एककालाही सेकंद किंवा विकला म्हणतात. कोनमापनाच्या षष्टिकमान पद्धतीमध्ये मिनिटाचा (किंवा कलेचा) १/६०, अंशाचा १/३,६०० अथवा पूर्ण वर्तुळाचा १/१२,९६,००० एवढा भाग म्हणजे सेकंद होय. कोनमापनाच्या शतमान पद्धतीत काटकोनाचे १०० अंश, एका अंशाची १०० मिनिटे व एका मिनिटाचे १०० सेकंद मानतात. म्हणून या पद्धतीत सेकंद म्हणजे काटकोनाचा १/१०,००,००० किंवा पूर्ण वर्तुळाचा १/४०,००,००० एवढा भाग होय [⟶ कोन]. परंतु प्रत्यक्षात ह्या दोन्ही पद्धती वापरात नाहीत.

 

वैज्ञानिक किंवा अभियांत्रिकी पूर्ण वर्तुळाचा कोन (१) ३६० अंश किंवा (२) २ अरीये (रेडीयन्स) हे मापक मानक म्हणून वापरतात.

पहा : एकके व परिमाणे कालमापन.

ठाकूर, अ. ना.