वासुकी : (जलसर्प). खगोलीय विषुववृत्ताजवळ असणारा सर्वात मोठ्या विस्ताराचा तारकासमूह. त्याचा विस्तार साधारणमानाने होरा ८ तास ते १५ तास व क्रांती + १०º  ते – ३० º पर्यंत आहे [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. हा समूह तेरा भिन्न तारका समूहांनी वेढलेला आहे. याची आकृती सर्पाची असून सर्पाचे तोंड आश्लेषा नक्षत्रात आणि शेपूट हस्त नक्षत्रापाशी आहे. या नक्षत्राच्या मध्यभागी किंवा हृदयात ॲलफार्ड (होरा ९ तास २५.१ मिनिटे, क्रांती – ८º २६’, अंतर ८१५ प्रकाशवर्षे) हा सर्वांत तेजस्वी [प्रत २.३⟶ प्रत] व सूर्याहून मोठा तारा असून याखेरीज या समूहात तिसऱ्या प्रतीचे सहा तारे, चवथ्या प्रतीचे अनेक तारे त्याचप्रमाणे रूपविकारी वा चल व युग्म तारे बहुसंख्येने असून रक्तवर्णी ताऱ्यांचे प्रमाण बरेच आहे [⟶ तारा]. अरबी भाषेत ॲलफार्ड याचा अर्थ एकांतात राहणारा असा आहे. आकाशाच्या या भागात फारसे तारे दिसत नाहीत म्हणून हे नाव पडले असावे.

वासुकी तारकासमूहाच्या शेपटीजवळील रूपविकारी तारा ‘आर R’ (होरा १३ तास २७ मिनिटे क्रांती – २३º.१) हा आपली तेजस्वितेची प्रत सु. ४०० दिवसांत ४ पासून १० पर्यंत बदलताना दिसतो. या समूहात एन्‌जीसी  २५४८ व एन्‌जीसी  ३२४३ या प्रमुख   दीर्घीका, एन्‌जीसी २४४८ हा गोलाकार गुच्छ, एन्‌जीसी ३२४२ ही बिंबाभ्रिका इ. उल्लेखनीय खगोलीय घटक आहेत. हा समूह उत्तर गोलार्धाच्या हिवाळ्यात व वसंत ऋतूत पूर्वरात्री दिसतो.

हायड्रा या अनेक डोकी असलेल्या भयंकर जलसर्पाला हर्क्यूलीझने ठार करून दुसरे साहस केले, अशी एक ग्रीक कथा या संदर्भात आहे. भारतीय पुराणकथेनुसार हा नाग कश्य व कद्रू यांचा एक पुत्र मानतात.

ठाकूर, अ. ना.