गोविंद

स्वरूप, गोविंद : (२३ मार्च १९२९). भारतीय रेडिओ ज्योतिषशास्त्रज्ञ. त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि खगोल भौतिकी या विषयांतील विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी जगातील दोन मोठ्या रेडिओ दूरदर्शकांचे अभिकल्प ( आराखडे ) भारतात तयार केले आणि स्वदेशी सामग्रीचा वापर करून त्यांची उभारणी केली. त्यांचे हे कार्य रेडिओ ज्योतिष-शास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदान आहे.

स्वरूप यांचा जन्म ठाकूरद्वार ( मुरादाबाद, उत्तर प्रदेश ) येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून भौ ति की विषयाच्या बी.एस्सी. (१९४८) व एम्.एस्सी. (१९५०) या पदव्या संपादन केल्या. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळविली (१९६१).

स्वरूप यांनी नवी दिल्ली येथील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (१९५० — ५३१९५५-५६) आणि ऑस्ट्रेलियामधील सीएस्आय्आर्ओ या संस्थेची रेडिओ फिजिस लॅबोरेटरी (१९५३ ५५) या प्रयोगशाळांमध्ये काम केले. ते हार्व्हर्ड विद्यापीठात सहसंशोधक (१९५६-५७) आणि स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन साहाय्यक (१९५७ ६०) व साहाय्यक प्राध्यापक (१९६१ ६३) होते. ते होमी भाभा यांच्या आवाहनावरून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ( टीआय्एफ्आर् ) येथे १९६३ मध्ये अधिव्याख्याता या पदावर रुजू झाले आणि १९९४ मध्ये गुणश्री प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. १९८०-८१ या काला-वधीत त्यांनी मेरिलंड, ग्रोनिंगेन आणि लायडन विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. ते पुण्याजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ( जीएम्आर्टी ) या प्रकल्पाचे संचालक (१९८७ ९३) आणि टीआय्एफ्आर् या संस्थेच्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिस या केंद्राचे संचालक (१९९३-९४) होते.

स्वरूप यांनी १९६० मध्ये ऊटकमंड (ऊटी) येथे ५३० मी. लांब आणि ३० मी. रुंद असा एकमेव अभिकल्प असलेला रेडिओ दूरदर्शक तयार केला. त्यानंतर त्यांनी १९८० . ९० या दरम्यान जीएम्आर्‌टी या रेडिओ दूरदर्शकाची संकल्पना तयार केली व त्यानुसार नारायणगावजवळ (पुण्याच्या उत्तरेला सु. ८० किमी.) त्याच्या उभारणीसंदर्भात मार्गदर्शन केले. जीएम्आर्‍टी हा जगातील सर्वांत मोठा रेडिओ दूरदर्शक असून दीर्घ तरंगलांबींकरिता तो वापरण्यात येतो. त्याचा वापर भारतीय आणि सु. २० पेक्षा जास्त देशांच्या (विशेषतः केंब्रिज, ऑक्सफर्ड, स्टॅनफर्ड व हार्व्हर्ड विद्यापीठांतील) ज्योतिर्विदांकडून केला जातो. विश्वाची उत्पत्ती व उत्क्रांती कशी झाली, यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने जीएम्आर्‍टी रेडिओ दूरदर्शकाचा अभिकल्प तयार करण्यात आलेला आहे. [⟶ रेडिओ दूरदर्शक].

स्वरूप यांची काही महत्त्वपूर्ण संशोधने पुढीलप्रमाणे आहेत : यू--प्रकारच्या सौर रेडिओ स्फोटांचा शोध, सूर्याच्या क्रियाशील भागातील सूक्ष्मतरंग रेडिओ उत्सर्जनाची घूर्णी-प्रारण प्रतिकृती, मोठ्या आकाश- कांच्या कला समायोजनाचे विरूपण तंत्र आणि रेडिओ दीर्घिका व क्वासार यांचा अभ्यास.

ऊटकमंड येथील रेडिओ दूरदर्शकाच्या साहाय्याने १९७० मध्ये चांद्र पिधाने घेऊन स्वरूप यांनी जगात प्रथमच १—१० चाप-सेकंद एवढी उच्च कोणीय विभेदनक्षमता असलेल्या १,००० पेक्षा अधिक रेडिओ दीर्घिका आणि क्वासार यांचा अभ्यास केला. त्यांनी रेडिओ उद्गमांचे कोणीय आकार आणि त्यांची स्रोत घनता यांमधील परस्परसंबंध शोधला आणि त्यामुळे महास्फोट ( बिग बँग ) प्रतिकृतीला स्वतंत्र रीत्या पाठिंबा मिळाला. मात्र, विश्वाच्या स्थिर-स्थिती सिद्धांताविरुद्ध पुरावा उपलब्ध झाला. [ रेडिओ ज्योतिषशास्त्र ].

स्वरूप यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांपैकी काही पुढील-प्रमाणे : क्वासार्स (१९८६), हिस्टरी ऑफ ओरिएंटल ॲस्ट्रॉनॉमी (१९८७), एशिया-पॅसिफिक ॲस्ट्रॉनॉमी (१९९५), द युनिव्हर्स ॲट लो रेडिओ फ्रिक्वेन्सिज (२००३). त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सु. १२५ पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. त्यांनी स्थिर आरसा रेखा केंद्र असलेला सौर आकाशक आणि पूर्वभारित अन्वस्तीय तबकडी असलेला आकाशक या उपकरणांची एकस्वे ( पेटंटे ) घेतलेली आहेत.

स्वरूप यांना रूडकी विद्यापीठाने डॉटर ऑफ एंजिनिअरिंग (१९८७) बनारस हिंदू विश्वविद्यालय (१९९६) आणि रायपूर येथील पंडित रविशंकर विद्यापीठ (२०१०) यांनी डॉटर ऑफ सायन्स या सन्माननीय पदव्या दिल्या. स्वरूप यांना पुढील बहुमान मिळाले आहेत ः शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९७२), पद्मश्री किताब (१९७३), प्रशांत चंद्र महालनोबीस पदक (१९८४), मेघनाद साहा पदक (१९८७), यूएस्एस्आर कॉस्मॉनॉटिस फेडरेशनचे त्सिओलकोव्हस्की पदक (१९८७), इंटरनॅशनल युनियन ऑफ रेडिओ सायन्सचे जॉन हॉवर्ड डेलिंजर सुवर्ण पदक (१९९०), सी. व्ही. रामन पदक (२००३), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे विल्यम हर्शेल पदक (२००५), ऑस्ट्रेलियाचे ग्रोट रेबर पदक (२००७), भारताच्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचा जीवन गौरव पुरस्कार (२००८).

स्वरूप यांची रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेचे फेलो म्हणून १९९१ मध्ये निवड झाली. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस ( अलाहाबाद ), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस ( बंगळुरू ), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी ( नवी दिल्ली ), महाराष्ट्र ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस ( पुणे ), द इंटरनॅशनल ॲकॅडेमी ऑफ ॲस्ट्रॉनॉटिस आणि द पाँटिफिकल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे सदस्य आहेत.

स्वरूप सध्या विश्वस्थितिशास्त्राशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता जीएम्आर्टी या रेडिओ दूरदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षणे घेत आहेत. [⟶ विश्वस्थितिशास्त्र ].

साळुंके, प्रिती म.