जीन्स, जेम्स हॉपवुड : (११ सप्टेंबर १८७७–१६ सप्टेंबर १९४६). इंग्रज ज्योतिर्विद. गणित, ज्योतिषशास्र, भौतिकी, विश्वोत्पत्तिशास्र आणि गतिशास्त्र या विषयांत विशेष कार्य. त्यांचा जन्म साउथपोर्ट येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये होऊन तेथेच त्यांना फेलो नेमण्यात आले. १८९८ मध्ये ते रँग्‍लर झाले व १९०० मध्ये त्यांना स्मिथ पारितोषिक मिळाले. १९०४ मध्ये अनुप्रयुक्त गणिताचे व्याख्याते, १९०५ ते १९०९ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक, १९०६ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो, १९१०–१२ अनुप्रयुक्त गणिताचे स्टोक्स व्याख्याते इ. पदांवर त्यांनी काम केले. त्यांना रॉयल सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले होते. पुन्हा केंब्रिजला परत आल्यावर १९१७ मध्ये विश्वोत्पत्तिशास्र व खगोलीय गतिशास्त्र यांतील कार्याबद्दल त्यांना ॲडम्स पारितोषिक मिळाले. त्यानंतर १९१९–२९ रॉयल सोसायटीचे चिटणीस, १९२३ साली विल्सन वेधशाळेचे सहयोगी संशोधक आणि १९२५–२७ रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष अशा विविध कामगिऱ्या त्यांनी केल्या. त्यांना १९२८ मध्ये ‘सर’ हा किताब आणि १९३९ मध्ये ऑर्डर ऑफ मेरिटचा बहुमान मिळाला.

त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि विश्वोत्पत्तिशास्र या विषयांवर सामान्य वाचकांकरिता सुबोध पुस्तके लिहून व व्याख्याने देऊन या विषयांची आवड निर्माण केली. गणिताचा उपयोग करून भौतिक व ज्योतिषशास्त्रातील बऱ्याच प्रश्नांचा त्यांनी उलगडा केला. वायूच्या गत्यात्‍मक सिद्धांतात [→ द्रव्याच्या गत्यात्मक सिद्धांत] रेणूच्या वेगाच्या विभागणीसंबंधीचा मॅक्सवेल यांचा नियम व गतिमान रेणू कल्पनेतील उर्जेच्या समवाटपासंबंधीचा नियम हे त्यांनी सिद्ध केले. कृष्ण पदार्थाच्या (जो पदार्थ तापविल्यावर दीप्तिमान होऊन अखंड वर्णपट देतो अशा आदर्श पदार्थाच्या) वर्णपटातील प्रारणाच्या ऊर्जेच्या वितरणासंबंधीचे सूत्र त्यांनी मांडले [→ उष्णता प्रारण]. प्रचलित गणिती पद्धतीनेच त्यांनी लॉर्ड रॅली यांच्या फक्त दीर्घ तरंगलांबीबाबत लागू पडणाऱ्या सूत्रासारखे दुसरे तत्सम सूत्र बनविले. प्रारण व मुक्त इलेक्ट्रॉन यांमधील परस्परक्रिया यासारख्या प्रारणाच्या इतर अंगोपांगांसंबंधी बरेच निबंध त्यांनी लिहिले. ज्योतिषशास्त्रात गणिताचा वापर करून विश्वोत्पत्तिशास्राचे कित्येक स्वतंत्र सिद्धांत त्यांनी मांडले. उदा., नासपतीच्या आकाराच्या आकृतीच्या स्थैर्यासंबंधीचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. या आकृती असंकोच्य द्रायूमध्ये (द्रवात वा वायूत) अक्षीय भ्रमण करतात असे प्रथम मानून नंतर तो द्रायू संकोच्य मानला. याच गणिती विश्लेषण पद्धतीने अक्षीय भ्रमण करीत असलेल्या एका गोलाजवळून दुसरा गोल गेला, तर पहिल्या गोलाला भरती येऊन त्यातील काही भाग फुटून नवीन गोलाची निर्मिती होते, असे त्यांनी दाखविले आणि लाप्लास व चेंबरलेन-मोल्टन यांची सूर्यकुलोत्पत्तीची मीमांसा चुकीची होती, असे जीन्स यांनी ठरविले. ताऱ्यांच्या गतीवर होणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचा त्यांनी अभ्यास केला. युग्मताऱ्यांची उत्पत्ती, सर्पिल अभ्रिका, महातारे व लघुतारे, खगोलीय ऊर्जेचे उगमस्थान व वायुरूप ताऱ्यांची उत्क्रांती व प्रारण यांसंबंधी त्यांनी निबंध लिहिले. जीन्स यांची डायनॅमिकल थिअरी ऑफ गॅसेस (१९०४), मॅथेमॅटिकल थिअरी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्‍नेटिझम (१९०८), प्रॉब्‍लेम्स ऑफ कॉस्मॉगॉनी अँड स्टेलर डायनॅमिक्स (१९१९), द युनिव्हर्स अरांउड अस (१९१९), ॲस्ट्रॉनॉमी अँड कॉस्मॉगॉनी  (१९२८), न्यू बॅकग्राउंड ऑफ सायन्स (१९३३), थ्रू स्पेस अँड टाइम (१९३४) इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते डॉर्किंग येथे मृत्यू पावले

नेने, य. रा.