त्वचेतील केशपुटक व त्वक्-स्नेह ग्रंथी : (१) बाह्यत्वचा, (२) अंतस्त्वचा, (३) त्वक्‌‌ -स्नेह ग्रंथी, (४) केस, (५) केशपुटक, (६) अधस्त्वचीय संयोजी ऊतक, (७) खालचा स्नायूचा थर.

त्वक्–स्‍नेह ग्रंथि : त्वचेच्या अंतस्त्वचा भागात [⟶ त्वचा] केशपुटकांच्या (केसांची मुळे जेथे असतात त्या त्वचेवरील खोलगट भागांच्या) सन्निध सर्व दूर पसरलेल्या छोट्या लघुकोशमय ग्रंथींना त्वक्‌–स्नेह ग्रंथी किंवा त्वक्‌–वसा ग्रंथी म्हणतात. सर्व सस्तन प्राण्यांपैकी फक्त मानवातच या ग्रंथींचे प्रमाण अधिक असून त्यांचे आकारमानही मोठे असते. शरीराच्या केशरहित भागांमध्ये उदा., तळहात व तळपाय यांमध्ये या ग्रंथी नसतात. याउलट शिरोवल्क (कवटीच्या वरच्या भागावरील आच्छादक केशमय त्वचा) व चेहरा या ठिकाणी त्यांचे प्रमाण अधिक असते. गुदद्वार, नाकाची भोके, तोंड व बाह्यकर्ण या ठिकाणीही त्या अधिक असतात. नवजात अर्भकामध्ये त्या मोठ्या असतात, परंतु बालवयात आकारमानाने कमी होतात. तारुण्यावस्थेपासून त्या आकारमानाने वाढू लागतात व प्रौढावस्थेत त्यांची वाढ पूर्ण होते. स्त्रियांपेक्षा पुरुषांतील ग्रंथी मोठ्या व अधिक उत्पादनक्षम असतात.

प्रत्येक ग्रंथी २ ते ५ लघुकोश मिळून बनलेली असते. कधीकधी ही संख्या वीसही असते. प्रत्येक लघुकोश उपकला कोशिकांचा (अतिशय जवळजवळ असलेल्या पेशींचा) बनलेला असतो. कोशाची पोकळी वसायुक्त (स्निग्ध पदार्थयुक्त) मोठ्या कोशिकांनी भरलेली असते. मध्यभागातील या कोशिकांच्या नाशामुळे तयार झालेले तुकडे व वसा मिळून जो पदार्थ बनतो, त्याला त्वक्‌–वसा म्हणतात. कोशिका जसजशा नाश पावतात तसतशा नव्या कोशिका तयार होत असतात. प्रत्येक ग्रंथीची नलिका केशपुटकास जाऊन मिळते. अधूनमधून एखादी नलिका बाह्यत्वचेतून वर येऊन त्वचापृष्ठावरही उघडते. शिश्नमणी (शिश्नाचा पुढचा भाग), लघुभगोष्ठ [⟶ जनन तंत्र] या ठिकाणी नलिका पृष्ठभागावरच उघडतात. त्वक्‌–वसा हा स्राव केवळ कोशिकांच्या वसायुक्त अपकर्षापासूनच तयार होत असल्यामुळे या ग्रंथींना ‘कोशिकास्त्रावी’ (होलोक्राइन) ग्रंथी म्हणतात. नाक आणि चेहऱ्यावरील ग्रंथी आकारमानाने मोठ्या असतात आणि त्यांमध्ये लघुकोशही अधिक असतात. पुष्कळ वेळा स्त्राव बाहेर न पडून त्या फुगतात. पापण्यांच्या वर्त्मपट्टीतील ग्रंथी (टार्सल ग्रंथी) त्वाक्–स्नेह ग्रंथीच असतात. या ठिकाणी त्या लांबट असून लघुकोशही अधिक असतात.

त्वक्–वसा स्रवणात वैयक्तिक व वांशिक फरक आढळतो. काळ्या त्वचेच्या माणसामध्ये त्वक्‌–वसेचे उत्पादक अधिक असते. शिवाय उष्णता व घाम उत्पादनवाढीस चेतना देतात. तारूण्यवस्थेत, ऋतुकालात आणि गर्भारपणी त्वक–वसेचे उत्पादन वाढते. त्वचा व केसांना त्वक्‌–वसा हे नैसर्गिक वंगण (मऊ ठेवणारा पदार्थ) असते. त्यामुळे बाह्य परिसरातील कोरड्या हवेचे किंवा दमटपणाचे दुष्परिणाम टळतात. त्वक्‌–वसा काही अंशी सूक्ष्मजंतुनाशक असते . या ग्रंथीवर तंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) नियंत्रण नसते. स्रावोत्पादनास हॉर्मोने (वाहिनीविहीन ग्रंथीपासून निघणारे व रक्तात एकदम मिसळणारे उत्तेजक स्राव) विशेषेकरून पौरूषजने (अँड्रोजेन्स) उत्तेजन देतात [⟶ अंत:स्रावी ग्रंथी हॉर्मोने]. हिजड्यांमध्ये या ग्रंथीचे प्रमाण अत्यल्प असते. त्यांना पौरूषजने दिल्यास ते वाढते.

त्वक्–स्नेह ग्रंथींच्या विकारांची माहिती ‘त्वचा’ या नोंदीत दिली आहे.

भालेराव, य. त्र्यं.