कारू, टॉमस : (१५९५ ? — मार्च १६४०). इंग्रज कवी. जन्म केंट परगण्यातील वेस्ट विकम या गावी. शिक्षण ऑक्सफर्डला. लंडनच्या ‘मिड्‌ल टेंपल’ चा सदस्य. काही काळ सर डड्‌ली कार्लटन ह्या राजदूताचा सचिव म्हणून नोकरी. कार्लटनची निंदा केल्याच्या आरोपावरुन त्याला या नोकरीस मुकावे लागले. त्यानंतर सर एडवर्ड हर्बर्ट (लॉर्ड हर्बर्ट ऑफ शेरबरी) ह्याच्याकडे नोकरी. पुढे त्याचा राजदरबारात शिरकाव झाला आणि पहिल्या चार्ल्सची मर्जी त्याने संपादन केली. Coelum Britannicum (१६३४) हे मुखवटा-नाट्य (मास्क) आणि काही सुंदर भावकविता त्याने लिहिल्या आहेत. त्याच्या काव्यातील कल्पनाचमत्कृती आणि विचारप्रधानता ह्यांतून ðजॉन डनचा परिणाम जाणवतो. जॉन डनच्या निधनावर त्याने लिहिलेली विलापिका प्रसिद्ध आहे. बेन जॉन्सनप्रमाणेच कवितेच्या रचनेकडे तो अतिशय बारकाईने लक्ष पुरवीत असे. ‘द रॅप्चर’ सारख्या कवितेतून त्याने केलेला प्रणयभावनेचा आविष्कार उत्तानतेकडे – क्वचित अनैतिकतेकडे – झुकलेला दिसतो.

भागवत, अ.के.