विल्यम्स पोर्ट : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया राज्याच्या उत्तरमध्य भागातील लायकोमिंग परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३१,९३३ (१९९०). हॅरिसबर्ग या राज्याच्या राजधानीपासून उत्तरेस सु. १२० किमी. वर हे शहर असून ॲलेगेनी पर्वतपायथ्याच्या टेकड्यांमध्ये १६१ मी. उंचीवर, सस्क्वेहॅना नदीच्या तीरावर विल्यम्सपोर्ट वसलेले आहे.

इ. स. १७९६ मध्ये मायकेल रॉस याने विल्यम्सपोर्टची स्थापना केली. विल्यम रसेल याच्या नावावरून शहराला हे नाव दिलेले असावे. याचे १८०६ साली बरोमध्ये, तर १८६६ मध्ये शहरात रूपांतर झाले. वसाहतकालात येथे अनेक अमेरिकन इंडियनांच्या कत्तली झाल्या. १८६० च्या दशकात हे लाकूड कापण्याच्या उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उद्योगाच्या विस्ताराबरोबरच या शहराचाही विकास झाला. दहा तासांचा दिवस या कामगारांच्या मागणीतूनच येथे ‘सॉडस्ट वॉर’ उद्‌भवले होते (१८७२). विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र स्थानिक अरण्ये संपुष्टात येऊन लाकूडतोड व्यवसाय कमी झाला आणि तेथे इतर उद्योगधंदे वाढीस लागले.

सांप्रत हे कारखानदारी, व्यापार व वितरणाचे एक प्रमुख केंद्र आहे. हलक्या व अवजड मालनिर्मितीचे कारखाने येथे स्थापन झालेले आहेत. वस्त्रोद्योग, तारदोर, बॉयलर, चामडी व धातुउत्पादने, लाकडी सामान, यंत्रे, विमानांची एंजिने व सुटे भाग, इलेक्ट्रॉनिकी व छायाचित्रण साहित्यनिर्मिती इ. उद्योगधंदे येथे आहेत. शहराच्या पश्चिम भागात विस्तृत असा औद्योगिक विभाग वसविण्यात आला आहे (१९५६). शहराच्या जवळच लायकोमिंग परगण्याचा विमानतळ आहे. त्याशिवाय प्रमुख महामार्ग व लोहमार्ग येथे येऊन मिळतात.

लायकोमिंग कॉलेज (१८१२) व विल्यम्सपोर्ट एरिया कम्यूनिटी कॉलेज (१९२०) येथे आहे. ग्रिट हे देशातील सर्वाधिक खपाचे साप्ताहिक येथूनच निघते. लायकोमिंग काउंटी हिस्टॉरिकल म्यूझीयम येथे असून त्यात प्रादेशिक इतिहास आणि कला प्रदर्शनविषयक वस्तूंचा संग्रह आहे. विल्यम्सपोर्ट हे लिट्‌ल लीग बेसबॉलचे मुख्य ठिकाण असून लीगचे राष्ट्रीय कार्यालयही येथेच आहे. दरवर्षीच्या ऑगस्टमध्ये भरणाऱ्या लिट्‌ल लीग वर्ल्ड सीरीजचे यजमानपद या शहराकडेच असते. दरवर्षीच्या वसंत ऋतूमधील एका आठवड्याचा कम्यूनिटी आर्ट्स महोत्सव येथे भरतो.

चौधरी, वसंत