हार्वी, विल्यम : (१ एप्रिल १५७८–३ जून १६५७). प्रख्यात इंग्रज वैद्य. त्यांनी रक्ताभिसरणाच्या खऱ्या स्वरूपाचा आणि हृदय पंपासारखेकार्य करीत असल्याचा शोध लावला.

 

विल्यम हार्वीहार्वी यांचा जन्म फोक्‌स्टन (केंट) येथे झाला. त्यांचे प्राथमिकशिक्षण कँटरबरी येथील कॅथीड्रलशी संलग्न असलेल्या किंग्ज स्कूलमध्ये झाले (१५८८–९३). नंतर त्यांनी केंब्रिज येथील गॉनव्हिले आणिकेझ महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १५९७ मध्ये बी.ए. पदवी मिळविली. त्यांनी इटलीमधील पॅड्युआ विद्यापीठात वैद्यकाचे अध्ययन करून एप्रिल १६०२ मध्ये वैद्यक विषयातील पीएच्.डी. पदवी संपादन केली. लंडनला परत आल्यानंतर १६०७ मध्ये ते रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे फेलो झाले. १६०९ मध्ये ते सेंट बार्थॅा-लोम्यूज हॉस्पिटलमध्ये सहायक वैद्य झाले आणि नंतर त्यांनी वैद्य या पदावर १६४३ पर्यंत काम केले.

 

हार्वी यांची १६१८ मध्ये राजवैद्य म्हणून नेमणूक झाली. त्यांनीराजा जेम्स पहिला यांची आजारपणात चांगली देखभाल केली म्हणून १६२५ मध्ये राजा चार्ल्स पहिला यांनी हार्वी यांची वैयक्तिक वैद्य म्हणून नेमणूक केली. तसेच त्यांना संशोधनाकरिता राजाच्या उद्यानातील हरिणांचा उपयोग करण्यास परवानगी दिली. हार्वी यांनी विकसित केलेल्या अचूक पद्धतीमुळे पुढील पिढ्यांकरिता वैज्ञानिक संशोधनाचा साचा तयार झाला. 

 

हार्वी यांनी १६२८ मध्ये रक्त शरीरातून अभिसरित होते, हे प्रथम दाखविले. त्यांनी बारीकसारीक निरीक्षणे व सोपे प्रयोग यांच्या मदतीने आजचा रक्ताभिसरणाचा मार्ग सिद्ध केला. त्यांनी आपले संशोधननीलांना असणाऱ्या झडपा गृहीत धरून केले होते. या झडपा रक्ताला एका दिशेने जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देतात, तर विरुद्ध दिशेनेयेणाऱ्या रक्तप्रवाहास विरोध करतात. हार्वी यांनी असे दाखवून दिले की, या प्रक्रिया हृदयाच्या कार्याशी निगडित असतात जरी खाली डोके केले, तरी मानेच्या नीलेतील रक्त डोक्याकडे जाण्याऐवजी गुरुत्वाकर्षणाच्या बलाला प्रतिबंध करीत हृदयाच्या दिशेलाच जाते.

 

हार्वी यांच्या मुख्य प्रयोगात हृदयाकडे वाहणाऱ्या रक्ताचे प्रमाण हा महत्त्वाचा भाग होता. किती प्रमाणात रक्त वाहून नेले जाते, यावरून निलयाच्या घनफळाचे काही प्रमाण त्यांनी निश्चित केले होते. दरमिनिटाला हृदयाचे ठोके किती पडतात यावरून हृदय दर मिनिटाला०.५ ते १ लि. रक्त पंप करते, असे मूल्य हार्वी यांनी नमूद केले होते.त्यांनी हृदय स्पंदनाच्या प्रकृतीचा देखील शोध लावला होता. तसेचत्यांनी आयुष्यातील शेवटच्या काही वर्षांत प्राण्यांमधील प्रजननाचा देखील अभ्यास केला.

 

हार्वी यांनी रक्ताभिसरणासंबंधी Exercitatio anatomica de Motu Cordis et Sanguinis in Animalibus(१६२८ इं. भा. ॲनॅटॉमिकल एक्झरसाइझ कन्सर्निंग द मोशन ऑफ द हार्ट अँड ब्लडइन ॲनिमल्स, १६५३) आणिExercitationes de Generatione Animalium(१६५१ इं. शी. ‘एक्झरसाइझेस कन्सर्निंग द जनरेशनऑफ ॲनिमल्स ङ्ख) हे ग्रंथ लिहिले.

 

यादवी युद्धामध्ये हार्वी हे चार्ल्स राजाच्या बाजूने उभे राहिले(१६४२–४६). पार्लमेंटच्या सैन्याने १६४२ मध्ये हार्वी यांच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लिखाण नष्ट व गहाळ झाले. त्यांनी कीटकांच्या प्रजननावर अपार कष्ट घेऊन केलेले संशोधन तसेच रुग्णांवर केलेल्या नोंदी, शवविच्छेदनाची निरीक्षणे आणि प्राण्यांच्या विच्छेदनावरील नोंदी हे देखील नष्ट झाले. हार्वी यांनी आपले संपूर्ण संशोधनात्मक संग्रह असलेले ग्रंथालय व इमारत ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स’ या महाविद्यालयास दान केले. १६६६ मध्ये लंडन येथे लागलेल्या आगीत हे उर्वरित साहित्यही नष्ट झाले.

 

हार्वी यांचे लंडन येथे निधन झाले.

 

पहा : रक्ताभिसरण तंत्र.

 

वाघ, नितिन भरत