नीलगाय : याला रोहू किंवा रोही आणि नराला नील असेही म्हणतात. हा प्राणी गो-कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस असे आहे. हा फक्त भारतातच आढळतो. आसाम व मलबार वगळून तो सर्वत्र आढळतो. विरळ झाडे असणाऱ्या टेकड्या, सपाट वा चढउतार असणारे गवताळ आणि झुडपे असलेले मैदानी प्रदेश ही यांची राहण्याची ठिकाणे होत. दाट अरण्यात तो नसतो.

नीलनीलगायीची डोक्यासकट लांबी २ मी., शेपटी ४५ – ५५ सेंमी. व खांद्याजवळ उंची १ – १·५ मी. असते. खांद्याकडचा भाग उंच आणि ढुंगणाकडचा बसकट असतो. मादी नरापेक्षा ठेंगणी असते. नराचा रंग काळसर करडा असतो घोट्याच्या खाली एक पांढरे वलय व प्रत्येक गालावर दोन पांढरे ठिपके असतात. ओठ, हनुवटी आणि कानांची आतली व शेपटीची खालची बाजू पांढरी असते गळ्यावर काळ्या ताठ केसांचा झुबका असतो. मादीचा आणि लहान नरांचा रंग पिंगट असतो. फक्त नरांना शिंगे असतात. शिंगांची सरासरी लांबी २० सेंमी. असते. नर आणि मादी दोघांनाही काळ्या रंगाची आयाळ असते.

नीलगायींचे १० – २० प्राण्यांचे कळप असून त्यांत माद्या, पिल्ले व लहान नर असतात. प्रौढ नर एकेकटे किंवा त्यांची लहान टोळकी असतात.

सकाळी बराच वेळ व संध्याकाळी ह्या चरत असतात. नीलगायी गवत व पाने खातात त्याचप्रमाणे त्या बोरे आणि इतर फळेही खातात. मोहाच्या झाडाची गळून पडलेली फुले त्यांना आवडतात. नीलगायी पिकात शिरून बरीच नासाडी करतात. त्या पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतात उन्हाळ्यात सुद्धा त्या नेमाने पाणी पीत नाहीत. त्यांची दृष्टी आणि घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. संकटाच्या वेळी त्या वेगाने पळून आपला बचाव करतात. चपळ घोड्यालाही वेगात त्यांची बरोबरी करता येत नाही.

नीलगायी गरीब असतात. शिकारी त्यांची फारशी शिकार करीत नाहीत. हिंदू हिला एक प्रकारची गायच समजून पवित्र मानतात. ही लवकर माणसाळते असे म्हणतात.

नीलगायींचा प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसतो. आठ किंवा नऊ महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात. नीलगायी सु. १५ वर्षे जगतात.

भट, नलिनी