व्हाँडेल, योस्ट व्हान डेन : (१७ नोव्हेंबर १५८७ – ५ फेब्रुवारी १६७९). थोर डच नाटककार व कवी. कॉल्न (जर्मनी) येथे जन्म. अँटवर्पमधील धार्मिक छळामुळे त्याचे आईवडील कॉल्न येथे परागंदा जीवन जगत होते. पुढे ते ॲम्स्टरडॅम येथे राहू लागले (१५९६). व्हाँडेल स्वयंशिक्षित होता. वयाच्या सतराव्या वर्षापासून तो कविता लिहू लागला. डच नाट्य आणि रंगभूमीशी संबद्ध अशा ‘द व्हाइट लव्हेंडर’ (इं.शी.) ह्या वाडमयीन वर्तुळात त्याला प्रवेश मिळाला. परिणामी व्हाँडेलने नाट्यलेखन सुरू केले. ‘पॅसोव्हर’ (प्रयोग १६१०, प्रकाशन १६१२, इं.शी.) ही त्याची पहिली नाट्यकृती. तिच्यावर फ्रेंच नव-अभिजाततावादी नाटकांचा प्रभाव जाणवतो. रूपांतरित-भाषांतरित नाटके धरून त्याने एकूण ३१ नाटके लिहिली. त्यातून ख्रिस्ती पुराणकथांचा त्याने प्रभावीपणे उपयोग करून घेतला.

‘द डिस्ट्रक्शन ऑफ जेरूसलेम’ (प्रयोग १६२०, इं.शी.) व ‘पॅलेमीडीज, ऑर मर्डर्ड इनोसन्स’ (प्रकाशित १६२५, इं.शी.) ही त्याची आरंभीची दोन नाटके. त्यांतून राजकीय आणि धार्मिक स्वातंत्र्याचा प्रखर पुरस्कर्ता योहान व्हान ऑल्डेनबॉरनव्हेल्ट ह्याला देण्यात आलेल्या अन्याय्य मृत्युदंडाबद्दलचा आपला निषेध त्याने सूचित केलेला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा रोषही त्याला सहन करावा लागला. पुढे तो मनाने रोमन कॅथलिक पंथाच्या जवळ गेला. ‘मेडन्स’ (१६३९, इं.शी.), ‘द ब्रदर्स’ (१६४०, इं.शी.), ‘मेरी स्टयूअर्ट, ऑर मॉर्टर्ड मॅजेस्टी’ (१६४६, इं.शी.) अशा काही नाट्यकृतींतून ही जवळीक दिसून येते. १६४१ साली त्याने रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केला. ल्युसिफर (१६५४) ही त्याचे सर्वश्रेष्ठ नाट्यकृती मानली जाते. ‘जेफथा, ऑर प्रॉमिस्ड सॅक्रिफाइस’ (१६५९, इं.शी.) हे त्याचे आणखी एक उल्लेखनीय नाटक. माणसांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांची मुळे बाह्य घटनांत नसून ती त्यांच्यातच असलेल्या काही दोषांमध्ये असतात, असे ह्या नाटकांतून व्हाँडेलने दाखविले आहे. उदा., ल्युसिफर हा देवदूत माणसांचा मत्सर करतो. देवाविरुद्ध बंड करणाऱ्या देवदूतांना तो साथ देतो आणि त्यांचा नेता होतो. अखेरीस त्याचा पराभव होतो. मिल्टनच्या पॅरडाइज लॉस्ट मध्येही हाच विषय हाताळलेला आहे.

व्हाँडेलच्या नाट्यलेखनावर फ्रेंच, इटालियन आणि ग्रीक नाटककारांचा प्रभाव असला, तरी त्याचा गाभा डचच राहिला. त्याच्या नाटकांतून त्याच्यातला भावकवीच विकसत गेल्याचे जाणवते. त्यामुळे नाट्यपरिणाम साधण्यासाठी नाट्यात्म कृतीपेक्षा काव्यमय लय साधणारी शैली त्याला अधिक उपयुक्त ठरली असा काही समीक्षकांचा अभिप्राय आहे. मात्र डच साहित्याच्या सुवर्णकाळातील थोर नाटककार म्हणून व्हाँडेलचे स्थान अढळ राहिलेले आहे.

व्हाँडेलची कविता Poezy (१६४७) आणि Poezy of Verscheide gedichten (१६८२) ह्या कवितासंग्रहात अंतर्भूत आहे. संसृतिटीका व उत्कट धर्मभावना यांचाही प्रत्ययकारी अविष्कार त्याच्या काव्यातून आढळतो. महाकाव्य लिहिण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. ॲम्स्टरडॅम येथे तो निधन पावला.

पोळ, मनीषा