मलक्कुरवन : भारतातील एक वन्य आदिवासी जमात. यांची वस्ती तमिळनाडू व केरळ राज्यांत आढळते केरळ राज्यात मुख्यतः क्विलॉन, त्रिवेंद्रम व कोट्टयम या जिल्ह्यांत तसेच पांबा नदीकाठी यांची वस्ती विशेषत्वाने आढळते. त्यांची लोकसंख्या २७४ (१९७१) होती. के कुरू, कुवा किंवा कोबा या नावांनीही ओळखले जातात. ‘कु’ म्हणजे डोंगर आणि ‘कर’ किंवा वन म्हणजे डोंगरात राहणारा. कुरूक्षेत्र येथे झालेल्या कौरव-पांडव युद्धात कौरव पराजित झाले, तेव्हा त्यांना हस्तिनापूर सोडावे लागले. तेथून त्यांच्यापैकी जे दक्षिणेकडे आले, त्यांचेच वंशज आपण आहोत, असे मलक्कुरवन समजतात. त्यांच्या चार पोटजमाती आहेत : (१) कुणकुरवन, (२) कुमकुरवन, (३) कक्काकुरवन आणि (४) पंडीकुरवन.

उंच बांधा, काळा वर्ण, काळेभोर डोळे आणि कुरळे केस ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्री-पुरूष दोघेही आपला उरोभाग उघडाच ठेवतात. पुरूष कानात मोठी कर्णभूषणे घालतात. ते मांसाहारी असून गोमांस खातात व मद्यही पितात. ते मलयाळम्‌ची तमिळ शब्दमिश्रित अपभ्रष्ट बोली वापरतात.

मलक्कुरवन ही अत्यंत मागासलेली आदिम जमात असल्यामुळे पूर्वी ते भटके जीवन जगत होते. सांप्रत ते पोडू पद्धतीची शेती करतात, तसेच शिकार व डोंगराळ भागांतील मध, मुळे व मोळ्या गोळा करून विकतात. शिकारीसाठी हे लोक ठेचायच्या बंदुका, धनुष्यबाण, पिंजरे, जाळी, फास यांचा वापर करतात. यांपैकी काही लोक भविष्यकथनही करतात. यांची घरे बांबू व झाडांच्या फांद्यांपासून बनविलेली असतात. घर दोन खोल्यांत विभागलेले असते.

मुले-मुली वयात आल्यावर बहिर्विवाही कुळीत विवाह होतात. पूर्वी यांत बालविवाह रूढ होता. विवाहात मामेबहिणीस अग्रक्रम दिला जातो पण आतेबहिणीशी विवाह निषिद्ध मानतात. त्यांच्यात क्रयविवाहपद्धती रूढ असून विवाहविधी वधूच्या घरी होतो. सुरूवातीस मुलीच्या गळ्यात ताली बांधण्याचा विधी आवश्यक मानला जाई पण ही प्रथा आता बंद पडली आहे. त्यांच्या प्रचलित लोकनृत्यातून तसेच संगीतातून अपहरण विवाह रूढ असावा, असे दिसते. घटस्फोट जमात-प्रमुखाच्या सल्ल्यानुसार दिला जातो. पुनर्विवाह मान्य असूनबहुपत्नीकत्वाची चाल आहे. या जमातीत पूर्वी मातृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित होती, असे म्हटले जाते परंतु विद्यमान पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ झाली आहे.

रजस्वला मुलीस पाच दिवस, स्त्रीस तीन दिवस, तर प्रसुतीनंतर सोळा दिवस वेगळ्या झोपडीत ठेवतात. स्त्री गरोदर असताना सातव्या महिन्यात ‘पुल्लीकुडी’ नावाचा विधी करतात. या वेळी तिला चिंचेचा रस आणि एक अंगठी देतात. नामकरणविधी वीस दिवसानंतर करतात. नामकरण पिता करतो. या जमातीत दत्तकाची प्रथा रूढ आहे.

मलक्कुरवनांत वडिलधाऱ्‍या माणसांची एक पंचायत असते. पंचायत प्रमुखाला उरळी (कणी) म्हणतात. त्याला व त्याच्या पत्नीस जमातीत आदराचे स्थान असते. जमात प्रमुखपद वंशपरंपरागत असते. जमात-प्रमुखास मुलगा नसेल, तर पुतण्यास ते पद देतात. जमात-प्रमुखाला शिकारीतील काही भाग द्यावा लागतो. त्याचा सल्लान मानल्यास जमातींबाहेर काढतात. जमातीतील सर्व धार्मिक विधींत त्याला महत्वाचे स्थान असते.

ही जमात जडप्राणवादी असून त्यांच्यात दैवक-पूजा महत्वाची मानली जाते तथापि हे हिंदूंच्या देवतांनाही भजतात. पूर्वजपूजेस महत्वाचे स्थान असून आप्पुपन−पूर्वजांचा देव−अत्यंत लोकप्रिय मानला जातो. ‘कल्लडी’ हा यांच्यातील लौकिक उत्सव असून तो रात्री साजरा करतात. यावेळी लोकनृत्य व संगीताचा कार्यक्रम करतात. पुजाऱ्यासही जमातीत महत्वाचे स्थान असते. तो मंत्रवदी किंवा जादूगार म्हणून ओळखला जातो. मलक्कुजरवनांचा जादूटोण्यावर, देववाणी व शकुन-अपशकुन यांसारख्या कल्पनांवर विश्वास आहे.

मृत व्यक्तीस वस्तीपासून दूरवर खड्डा खणून त्यात पुरतात. पुतण्या हाच खरा शोक करतो आणि सर्व अंत्यविधी गंभीरपणे पार पाडतो. पुरलेल्या ठिकाणी स्मारक बांधतात. सोळा दिवस सुतक पाळतात. सोळाव्या दिवशी ज्ञातिभोजन ऐपतीप्रमाणे घालतात.

संदर्भ : 1. Iyer, L.A. Krishna, Social History of Kerala: the Pre-Dravidians, Madras, 1968.

2. Luiz, A. A.D. Tribes of Kerala, New Delhi, 1962

शेख, रूक्साना