मॅसिंजर, फिलिप : (१५८३– मार्च १६४०). इग्रंज नाटककार. जन्म सॉल्झबरीचा. ऑक्सफर्ड येथील सेंट ऑल्बन हॉल ह्या शिक्षणसंस्थेत त्याने शिक्षण घेतले. सुमारे १६१३ पासून ⇨ जॉन फ्लेचर (१५७९–१६२५) सारख्या समकालीन नाटककारांच्या सहकार्याने त्याने नाटके लिहावयास सुरुवात केली. द फॉल्स वन, द एल्डर ब्रदर आणि द कस्टम ऑफ द कंट्री ही नाटके मॅसिंजरने फ्लेचरच्या सहकार्याने लिहिली. आज शेक्सपिअरच्या म्हणून गणल्या जाणाऱ्या हेन्री द एट्थ आणि द टू नोबेल किन्समेन ह्या नाटकांतही मॅसिंजरचा सहभाग आहे. मॅसिंजरने स्वतंत्रपणे लिहिलेल्या नाटकांत द मेड ऑफ ऑनर (सु. १६२१), द ड्यूक ऑफ मिलान (१६२३), द रोमन ॲक्टर (१६२६), द सिटी मॅडाम (१६३२) आणि ए न्यू वे टू पे ओल्ड डेट्स (१६३३) ह्या नाट्यकृतींचा समावेश होतो. त्यांपैकी ए न्यू वे …………….. ही त्याची सर्वांत लोकप्रिय नाट्यकृती होय.

शोकात्मिका (द ड्यूक ऑफ मिलान आणि द रोमन ॲक्टर), सुखात्मिका (ए न्यू वे टू पे ओल्ड डेट्स आणि द सिटी मॅडाम) हे दोन्ही नाट्यप्रकार मॅसिंजरने हाताळले. सामाजिक वास्तवाचे काही भान, संविधानकाची कौशल्यपूर्ण रचना, निर्यमक छंदाचा सफाईदार वापर व प्रभावी उपरोधप्रचुर शैली ही मॅसिंजरच्या नाट्यलेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. असे म्हणता येईल आचारविनोदिनी (कॉमेडी ऑफ मॅनर्स) ह्या नाट्यप्रकाराचा वापर कायम ठेवून मॅसिंजरने ह्या नाट्यप्रकाराचे सातत्य राखले. नाट्याच्या सर्व घटकांना सारखेच महत्त्व देऊन एक शक्य तितकी सर्वांगपरिपूर्ण कलाकृती निर्माण करणाऱ्या शेक्सपिअरकालीन नाटककारांच्या पिढीतील मॅसिंजर हा अखेरचा नाटककार. त्याच्या नाट्यसंविधानकात शिथिलता दिसते. काही घटना मात्र अत्यंत कौशल्याने आणि नाट्यपूर्णतेने चित्रित केलेल्या दिसतात. त्याची पुरुष पात्रे स्त्रीपात्रांपेक्षा अधिक प्रभावी वाटतात हेही त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या स्वभावचित्रणात सूक्ष्मता नाही. परंतु ह्या सर्व मर्यादा लक्षात घेऊनही त्याच्या नाट्यकृतींत उल्लेखनीय नाट्यगुण निश्चित दिसतात. लंडन येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Cruickshank, A. H. Philip Massinger, Oxford, 1920.

             2. Cunningham, F. Ed. The Plays of Philip Massinger, London, 1868.

             3. David, L. Frost, The School of Shakespeare, the influence of Shakespeare on English    Drama 1600-42, Cambridge, 1968.

             4. Dunn, T.A. Philip Massinger, London, 1958.

भागवत, अ. के.