रॉय, शरच्चंद्र : (४ नोव्हेंबर १८७१−३० एप्रिल १९४२). भारतातील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म सधन बंगाली कायस्थ कुटुंबात करपाडा (खुलना जिल्हा, बांगला देश) या खेड्यात झाला. वडील पूर्णचंद्र रॉय हे मुन्सफ होते. त्यामुळे शरदच्चंद्राचे प्राथमिक व सुरुवातीचे माध्यमिक शिक्षण बदलीच्या विविध ठिकाणी झाले. ते कॉलीडिएट हायस्कूल (कलकत्ता) मधून मॅट्रिक झाले (१८८८) आणि पुढे कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी बी. ए. (१८९२), एम्. ए. (१८९३) आणि बी. एल्. (१८९५) या पदव्या संपादन केल्या. या सुमारास त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा (रमेशचंद्र) आणि मुलगी (मीरा) झाली.

प्रारंभी ते मैमनसिंग येथील धल्ला विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून नोकरीस लागले (१८९५). नंतर रांची येथे ते मिशन स्कूलचे मुख्याध्यापक झाले. १८९८ मध्ये त्यांनी अध्यापन व्यवसाय सोडून वकिलीस प्रारंभ केला आणि रांची ते स्थायिक झाले. अल्पकालातच त्यांचा जम बसला. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा आदिवासींच्या, विशेषतः मुंडा जमातीच्या चालीरीती, रूढी यांच्याशी संबंध आला. त्यामुळे त्यांचे लक्ष छोटा नागपूर येथील मुंडांच्या खडतर जीवनाकडे गेले. या लोकांना पाश्चात्य अभ्यास करीत असलेले पाहून त्यांच्यासाठी आपण काही उपाय शोधावा, असे त्यांना वाटू लागले. परिणामतः त्यांनी मुंडांची भाषा, चालीरीती, राहणीमान आणि रूढी यांच्या अभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी १९१२ ते १९३९ दरम्यान ओरिसा-बिहारमधील विविध आदिम जमातींचा अभ्यास करून विपुल लेखन केले. त्यांत शंभराहून अधिक शोधनिबंध असून सु. सात अभ्यासपूर्ण ग्रंथ आहेत. त्यांनी मुंडांसंबंधी अभ्यास करून द मुंडाज अँड देअर कंट्री (१९१२) हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला. यानंतर त्यांनी द ओराओंज ऑफ छोटा नागपूर (१९१५), द प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ फिजिकल अँन्थ्रपलॉजी (१९२१), बिऱ्होर्स (१९२५), ओराओं रिलिजन अँड कस्टम्स (१९२८), द हिल भुइयाज ऑफ ओरिसा (१९१५), द खरियाज (१९३७−सहलेखक−रमेशचंद्र रॉय) वगैरे ग्रंथ लिहिले. त्यामुळे मानवशास्त्रज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली. मानवशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी मॅन इन इंडिया हे त्रैमासिक सुरू केले (१९२१). त्यांच्या विद्वत्तापूर्ण लेखनामुळे त्यांना ब्रिटिश शासनाने कैसर-इ-हिंद हे रौप्यपदक (१९१३) आणि रायबहादूर हा किताब दिला (१९१९). पाटणा विद्यापीठात त्यांना सलग तीन वर्षे प्रपाठक म्हणून काम करण्याची संधी लाभली (१९१९−२१). १९२० च्या भारतीय विज्ञान परिषदेत ते मानवशास्त्र विभागाचे अध्यक्ष होते. बिहार व ओरिसा कायदेमंडळावर सदस्य म्हणूनही ते निवडून आले (१९२१ ते १९३६). कलकत्ता विद्यापीठात त्यांच्या प्रयत्नांनी मानवशास्त्राच्या अभ्यासास प्रारंभ झाला. (१९२१).

राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी भारतीय आदिवासींच्या अभ्यासाद्वारे केले. रॉयनी मुंडा. भुईया. बिऱ्होर आदी जमातींचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे प्रथम दर्शन आपल्या ग्रंथाद्वारे घडविले. आदिमांच्या युवागृहांकडे लोकांचे लक्ष त्यांनी वेधले. मुंडा, बिऱ्होर, भुईया, ओराओं इ. जमातीतील गिटिओरा, धनगरबासा, धुमकुरिया वगैरे अनुक्रमे युवागृहांविषयी त्यांनी प्रथम माहिती उजेडात आणली आणि युवागृहे किंवा शयनगृहे ही केवळ मनोरंजनाची स्थळे नसून ती शिक्षण देणारी सामाजिक-सांस्कृतिक केंद्रे आहेत. पूर्व भारतातील ओराओं या जमातींत आजोबाने आपल्या नातीशी लग्न केल्याचे उदाहरण शरच्चंद्र रॉय यांनी सलगी संबंधाच्या संदर्भात निदर्शनास आणले.

त्यांनी मतदारांविषयी एक विस्तृत अहवाल सादर केला आणि त्यातून अल्पसंख्याकांच्या स्वतंत्र मतदारसंघास विरोध दर्शविला कारण भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना त्यामुळे लोप पावेल, असे त्यांचे मत होते.

त्यांनी राजकारणात सक्रिय भाग घेतला नाही परंतु सर्व जातिजमातींमध्ये सलोखा असावा, या मताचे ते होते आणि घटनात्मक शासनाचा त्यांनी पुरस्कार केला, ते रांची येथे मरण पावले.

संदर्भ : 1. Bose, N. K. Ed. Man in India: Sarat Chandra Roy, Vol. 51, No. 4. Ranchi, 1971.

2. Mills, J. P. Ed. Essays in Anthropology: On the Life and Work of Sarat Chandra Roy, Lucknow, 1942.

3. Vidyerthi, L. P. Rise of Anthropology in India, Vol. ll. Delhi, 1979.

4. Vidyarthi, L. P. Makhan, Jha, Ed. Growth and Development of Anthropology in Bihar, New Delhi, 1979.

देशपांडे, सु. र.