सुरुंग : (माइन). भूसुरुंग हे प्लॅस्टिक किंवा लोखंडी वेष्टणात भरलेले स्फोटक असते. त्याच्यावर वजन आल्यावर त्याचा स्फोट होण्यासाठी एक छोटी यंत्रणा त्यात बसवली जाते. हा भूसुरुंग जमिनीत लहानसा खड्डा खोदून वरच्यावर पुरलेला असतो. त्यातील यंत्रणा एकतर वजन आल्यावर म्हणजे त्यावर पाय पडल्यावर किंवा त्यावरुन वाहन गेल्यावर कार्यान्वित होते. त्या यंत्रणेत असलेला स्फोटसहायक (डिटोनेटर) प्रथम उडतो आणि त्याच्या धक्क्याने सर्व स्फोटके उडून मोठा धमाका होतो. ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी वेगवेगळ्या संवेदनांचा प्रयोग केला जातो. उदा., वजन (प्रेशर), ओढ (पुल), लोहचुंबकत्व (मॅग्निटिझम), आवाज (साउन्ड).
भूसुरुंग प्रामुख्याने मानवप्रहारी (अँटीपर्सनल) आणि रणगाडा (वाहन) विरोधी (अँटीटँक) या दोन प्रकारचे असतात. मानवप्रहारी भूसुरुंगात सु. तीस ग्रॅम स्फोटक भरलेले असते. त्यावर ५ किग्रॅ.चे वजन आले तरी त्याचा स्फोट होतो. थोडक्यात माणसाचा किंवा प्राण्याचा पाय त्यावर पडला की तो उडून एकतर पाय जायबंदी होतो किंवा मरणही येऊ शकते. वाहनविरोधी भूसुरुंगात सु. पाच किग्रॅ. स्फोटक भरलेले असते. त्याच्यावरुन १८० ते ३५० किग्रॅ. वजनाचे वाहन गेल्यावरच त्याचा स्फोट होतो. माणसाने पाय दिला तर सर्वसाधारणपणे वाहनविरोधी भूसुरुंगाचा स्फोट होत नाही. त्यावरुन जाणाऱ्या रणगाड्याचे चाक तुटून तो जायबंदी होतो परंतु त्यावर इतर वाहन गेले, तर ते उडून आतल्या प्रवाशांना गंभीर इजा होऊ शकते.
भूसुरुंगाचा प्राथमिक उपयोग युद्घात संरक्षणात्मक डावपेचासाठी करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय सीमेवर शत्रूचे आक्रमण थोपविण्यासाठी जेव्हा संरक्षणफळी उभारण्यात येते, तेव्हा पायदळांच्या मोर्चापुढे भूसुरुंगांच्या रांगांची पेरणी करण्यात येते. त्यात मानवप्रहारी आणि वाहनविरोधी सुरुंगांचा समावेश असतो. जेव्हा शत्रूचे जथे चाल करुन येतात, तेव्हा मोर्चासमोरील भूसुरुंगाच्या क्षेत्रांमधून जाताना आक्रमक पायदळाचे सैनिक जखमी होतात. त्यांची संख्या जरी पेरलेल्या भूसुरुंगांच्या मानाने कमी आली, तरी आक्रमक तुकड्यांच्या मनात भूसुरुंगांच्या संभावित अस्तित्वाबद्दल एक भीती असते आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक सामर्थ्यावर परिणाम होतो. मोर्चांवर चाल करुन येणारे रणगाडे भूसुरुंग क्षेत्रातून जात असता त्यांची चाके तुटून जायबंदी झाली, तर त्यांना रणगाडाविरोधी तोफांनी (अँटीटँक वेपन्स) उद्ध्वस्त केले जाते. त्यामुळे आक्रमक शक्तीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
भूसुरुंगाची उत्पत्ती आशुरनाझिर-पाल (८८४–८५९ इ. स. पू.) याच्या ॲसिरिअन सैन्याच्या वेळेस झालेली असावी. चौदाव्या शतकात कृष्णभुकटी (ब्लॅक पावडर) चा शोध लागल्यावर त्याच्या सैनिकी वापराला अधिक चालना मिळाली. लिओनार्दो दा व्हींची या सुप्रसिद्घ व्यक्तीने ‘फ्लॅडर माइन’चा शोध लावला. त्यानंतर भूसुरुंगाचे स्वरुप बदलत गेले. पूर्वी तीन मीटर खोलीवर तो पुरला जाई. परंतु हळूहळू ती खोली कमी होत जाऊन तो आता जमिनीच्या पातळीवरच पुरला जातो. त्यामुळे त्याला ‘काँटॅक्ट माइन’चे स्वरुप आले आहे.
सांप्रतिक युद्घात वापरल्या जाणाऱ्या भूसुरुंगांचा आधुनिक स्वरुपात प्रयोग १९१६ सालापासून होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्घात त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये साधारण ३०० ते ३५० छोटी-मोठी युद्घे किंवा लढाया झाल्या. त्यात भूसुरुंगांचा सर्रास वापर झाला. अलीकडे दहशतवादी किंवा विप्लववादी गटांसारख्या अराष्ट्रीय शक्ती भूसुरुंगांचा अनिर्बंध आणि अनाठायी प्रयोग करत आहेत. त्यांचे संघर्ष भर वस्तीत घडत असल्याने या स्फोटक वस्तूंमुळे अपरिमित हानी होत आहे. त्याचबरोबर भूसुरुंगांचे एक सुधारित स्वरुप–हंगामी स्फोटक साधन (इंप्रोव्हाइझ्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइस) आय ई डी–शोधून काढण्यात आले आहे. त्यात कितीही आणि कोणतेही स्फोटक वापरुन त्यामध्ये भूसुरुंगासारखीच चलनयंत्रणा बसवली जाते. आय ई डी चा दहशतवादी सर्रास वापर करतात, त्यायोगे सुरुंगाच्या कल्पनेस एक नवीनच परिमाण प्राप्त झाले आहे, ते भयावह आहे.
१९१६ पासून जगाच्या पाठीवर झालेल्या वेगवेगळ्या शस्त्रसंघर्षांत पेरलेले सु. अकरा कोटी भूसुरुंग अजूनही ७० देशांच्या हद्दीत आणि सीमांवर पडून आहेत. भूसुरुंगाचा जीवनकाल सु. ७५ ते ८० वर्षे असावा असा अंदाज आहे. वास्तविक युद्घ संपल्यावर हे भूसुरुंग निकामी करणे वा त्यांचे उच्चाटन करण्याची जबाबदारी ते पेरणाऱ्या देशांवर वा अराष्ट्रीय शक्तींवर आहे पण त्यात त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे भूसुरुंग अजूनही जागृतावस्थेत तसेच पडून आहेत. त्यामुळे जगभरात प्रत्येक महिन्यात त्या भूसुरुंगांशी काहीही संबंध नसणारे २,००० निष्पाप लोक त्यांचे लक्ष्य होतात. म्हणजे जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे तरी प्रत्येकी २० मिनिटात भूसुरुंगाला एक जीव बळी पडतो, त्यातले ४० टक्के प्राणाला मुकतात. जमिनीतील वर पडलेला भूसुरुंग सापडल्यावर तो उचलून खेळणारी मुले त्यात अनेक असतात. सु. अकरा कोटी पेरलेल्या सुरुंगांबरोबर तितक्याच संख्येचे भूसुरुंग वेगवेगळ्या देशांच्या सैन्य कोठारात वापरण्यासाठी ठेवलेले आहेत. यासाठीच राष्ट्रसंघाच्या शब्दावलीत भूसुरुंगाला ‘लपलेले मारेकरी’ (हिडन किलर्स) म्हणून संबोधिले जाते.
भूसुरुंगांमुळे मानवाच्या सुरक्षिततेला एक धोका निर्माण होतो, त्याशिवाय ज्या अपरिमित क्षेत्रांमध्ये ते पेरले गेले आहेत, तेथील शेती, उद्योग वगैरे जीवितसाधनांवरही परिणाम होतो आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचाली सुद्घा संकटमय होऊन जातात.
भूसुरुंगांच्या वापरावर जगभर बंदी घालण्यासाठी १९८० मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम हाती घेण्यात आली. त्या चळवळीचे नाव इंटरनॅशनल कँपेन फॉर बॅनिंग ऑफ लँड माइन्स (आय सी बी एल.) होते. ब्रिटनमधील राजपत्नी लेडी डायना या चळवळीची अध्वर्यू होती. या मोहिमेला १९९७ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. केवळ सात वर्षात या चळवळीने लोककल्याणाचे शिखर गाठले होते. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसच्या झेंड्याखाली सुरु केलेल्या या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्राने दखल घेतल्यावर १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसमोर (यू एन जनरल असेंब्ली) मानवप्रहारी सुरुंगांचा वापर, साठा, निर्मिती आणि स्थलांतरविरोधी प्रस्ताव (कन्व्हेंशन ऑन प्रोहिबिशन ऑफ यूज, स्टॉकपायलिंग, प्रॉडक्शन अँड ट्रँन्स्फर ऑफ अँटीपर्सनल माइन्स) ठेवण्यात आला.‘ओटावा कन्व्हेंशन’ या नावाचा हा प्रसिद्घ प्रस्ताव डिसेंबर १९९७ मध्ये प्रविष्ट झाला आणि १ मार्च १९९९ पासून कार्यान्वित झाला. जगाच्या पाठीवरुन मानवविरोधी भूसुरुंग नामशेष करण्याच्या उदात्त हेतूने प्रविष्ट केलेला प्रस्ताव बऱ्याच लहान-मोठ्या राष्ट्रांनी स्वीकृत करुनही अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, इटली, भारत, पाकिस्तान, श्रीलंका वगैरे राष्ट्रे अजूनही तो पारित करण्यास तयार नाहीत, त्याचे कारण स्पष्ट आहे. भूसुरुंग आजही युद्घाच्या डावपेचाचे एक अविभाज्य अंग आहे आणि जोपर्यंत आपला प्रतिस्पर्धी देश त्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत एकतर्फी त्याला मान्यता देणे हे सैन्याला एक हात पाठीमागे बांधून लढाई करावयास सांगण्याजोगेच आहे. तरीही याबाबत सर्व राष्ट्रांची संमती मिळवण्याचे प्रयत्न अविरत चालू आहेत.
दरम्यान पृथ्वीतलावर पेरलेले आणि पुढील युध्दांमध्ये निरुपयोगी असलेले भूसुरुंग निकामी करण्याचे एक जगव्यापी अभियान संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रगत आणि प्रगतिशील राष्ट्रे आर्थिक साहाय्य देऊ करत आहेत. ‘माइन ॲक्शन’ या राष्ट्रसंघाच्या अभियानाची प्रामुख्याने पाच उद्दिष्ट आहेत पहिले, पृथ्वी-तलावरील पेरलेल्या अवस्थेत असलेल्या भूसुरुंगांना निकामी करणे (ह्यूमॅनिटेरिअन डिमायनिंग) दुसरे, भूसुरुंगानी ग्रासलेल्या क्षेत्रातील जनतेला त्याबाबतीत जागृत करणे (माइन अवेअरनेस अँड रिस्क रिडक्शन एज्युकेशन, एम् आय ई) तिसरे, भूसुरुंगांमुळे जखमी झालेल्या नागरिकांना वैद्यकीय आणि अवयवप्ररोपणासाठी मदत करणे (व्हिक्टिम असिस्टन्स) चौथे, मानवप्रहारी भूसुरुंगांचे साठे नष्ट करणे आणि पाचवे, भूसुरुंगांच्या दुष्परिणामांबद्दल जगभर प्रचार करुन त्यांच्या वापरावर अडून बसलेल्या देशांचे मन वळवणे.
यातील पेरलेल्या भूसुरुंगांना निकामी करण्याचे उद्दिष्ट सर्वांत महत्त्वाचे आहे. निकामी करण्याचे हे काम अत्यंत जोखमीचे, कष्टप्रद, वेळखाऊ आणि खर्चिक आहे. उदा., एका भूसुरुंगाची किंमत आणि तो लावण्यासाठी केवळ तीन डॉलर लागतात, तर तो शोधून निकामी करण्यासाठी एक हजार डॉलर लागतात, यावरुन सु. अकरा कोटी भूसुरुंग निकामी करण्यासाठी लागणाऱ्या वेळ आणि धनराशीची कल्पना यावरुन येईल. वेगवेगळी धनिक प्रगत राष्ट्रे यासाठी प्रचंड आर्थिक साहाय्य देत आहेत आणि हे मानवी सत्कार्य राष्ट्रसंघाच्या झेंड्याखाली १९९९ पासून अविरत सुरु आहे. भारतानेही श्रीलंकेतील प्रकल्पांसाठी २००९–११ मध्ये आर्थिक साहाय्य देऊ केले.
हे काम वेगवेगळ्या देशांची सैन्यदले करतातच परंतु जगातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सेवाभावी संस्था या अत्यंत दुष्कर आणि आणि संकटप्रवण जनकार्यात गुंतल्या आहेत. त्यात ‘होरायझन’ आणि ‘सर्वत्र’ या दोन भारतीय संस्थांचा समावेश आहे. होरायझन ही यूनोस्थित भूतपूर्वसैनिकांची सेवाभावी संस्था २००३ पासून श्रीलंका व जॉर्डनमध्ये कार्यरत आहे आणि जून २०११ पर्यंत या संस्थेने १,५०,००० भूसुरुंग व इतर युद्घजन्य स्फोटकांना निकामी करुन जवळजवळ एक हजार चौ. किमी. क्षेत्र पुनर्वसनासाठी उपलब्ध करुन दिले आहे.
पित्रे, शशिकांत
“